Thursday, 26 November 2015

नुसता अभ्यास उपयोगाचा ठरत नाही...


(पात्र परिचय...
 
 
स्पाइक- कॅन्टीन बॉय, भडक टीशर्ट, बर्म्युडा, खांद्यावर फडक, केसाचे स्पाइक/ कॅप (उलट)
प्रकाश - कॉलेजचा विद्यार्थीइन शर्ट ...लाइट रंग, बेल्ट (फारच सभ्य पेहराव)
ज्योती - कॉलेजची विद्यार्थीनी, एक सैल लाम्ब वेणीलाल सलवार कमीज )

(
समोर स्टेजवर एक कॉलेज कॅन्टीन च दृश .....
मागे " N A U T N कॉलेज कॅन्टीन " अशी पाटी, एक टेबल, दोन खुर्च्या...एक खुर्ची प्रेक्षकांकडे तोंडकरुन टेबलाच्या मागे, दुसरी खुर्ची  टेबलाच्या उजवीकडे टेबलाकडे पाठकरुन आणि जरा लाम्ब)

                                                                                                                    
                            
दृश्य एक

(
स्पाइक नवीन सिनेमातल गाण गुणगुणत किव्वा शिट्टी वाजवत टेबल खुर्ची पुसत असतो. प्रकाश दोन जाडजुड पुस्तक हातात घेउन, खाली मान घालुन डावीकडुन सावकाश येतो आणि टेबलामागच्या खुर्चीत उदास चेहराकरुन बसतो. स्पाइक त्याच हे वागण न्यहाळत असतो. )
 
स्पाइक:- हाय! आपण स्पाइक ( स्पाइक नीट करत )
               
आणि  तू ?

प्रकाश:- (फारशी उत्सुकता न दाखवता) प्रकाश

स्पाइक:- ( प्रकाशच्या जवळ जाउन ..त्याच्या शर्टला न्यहाळत आणि हात लाउन बघत) कुठली शाळा म्हणायची?...कि मंदिर??

प्रकाश:- होविद्या मंदिर, डोम्बिवली इस्ट ( आता आश्चर्याने आणि प्रमाणिकपणे) ....तुम्हाला कस कळल?

स्पाइक:- तुम्हाला?! ( एकदम खुशीत येउन ...कॉलर ताठ करत ) राव हे तुमच म्हणजे अस झाल ना की ...

भांड्याला माझ्या हाए होल
तरी  तुम्ही मला सांगा पाणी किती खोल ?!!!

प्रकाश:- ( काहिच न कळल्या सारख बघत ) काय म्हणालात.

स्पाइक:-( प्रकाशच्या "म्हणालात " वर अस्वस्थ होउन)
अरे  यार.....तुला तर चांगलाच घुसळावा लागणार

प्रकाश:- काय?

स्पाइक:- अरे ब्रेन वॉश रे!!!....चल सोड ..  तू काय पहिल्याच दिवशी नापास झाला का नाय बोल?
 
 
प्रकाश:- ( किंचीत वैतागुन) नापास! मी ??? ....बोर्डात राज्यात पाचवा आणि जिल्ह्यात पहिला होतो मी. शाळेचा प्रत्येक वर्षीचा आदर्श विद्यार्थी. शाळेची दहाही वर्ष वर्गप्रमुख होतो. नुसत्या सायंस टलेंट एक्झाम्सची पाच गोल्ड मेडल मिळवली आहेत. आणि नुसताच अभ्यास नाही बर खेळातही पुढे होतो मी. बुद्धीबळात शाळेच प्रतिनिधित्व करायचो. आता तू बोल....
 (
खुर्ची पुसत आपल भाषण ऐकत असलेल्या स्पाइक ला ....)

स्पाइक:- (लहान मुलाला विचारतात तस )आपल्या कॉलेजच नाव काय सांग?

प्रकाश :- ( प्रामाणिकपणे)  N A U ...

स्पाइक:- ( झिडकारुन) अरे ते नाय पूर्न

 
प्रकाश:- नानासाहेब अप्पाजी....
 
स्पाइक:- अरे हट!  ( पाटीकडे बघत ...टेबलाकडे आणि प्रकाशकडे पाठकरुन ठेवलेल्या खुर्चीवर तसाच उलट बसत )  N A U T N म्हणजे ...

नुसता ...अभ्यास ...उपयोगाचा ...ठरत ...नाही

प्रकाश:- ( बुचकळ्यात पडुन) कोण म्हणत ?

स्पाइक:- अरे मी म्हणतो. हा स्पाइक म्हणतो ( स्पाइक नीट करत ) उगाच नाय ....पाच वर्षांचा अनुभव आहे. पाच टाइपची शीट्टी वाजवता येते का? बोल येते ???( प्रकाश नकारार्थी मान हालवतो)

 
अरे ..मग काय कामाची ती पाच मेडल?
 
 (
तेवढ्यात ज्योती उजवीकडुन येउन कॅन्टीन समोरून चालत निघुन जाते. तिच्याकडे मोट्ठे डोळे करुन तोंडाचा आ करुन  बघत जागेवरच उभा राहीलेला प्रकाश, स्पाइकच ते शेवटच वाक्य ऐकतही नाही)

 
प्रकाश:- ( तसाच उभा राहुन स्वप्नात असल्यासारखा ) कोण रे ती. लाल कुर्तालाम्ब शेपटा, मगाशी वैतागुन वर्गातुन बाहेर पडलो तेव्हा दिसली.
 
स्पाइक:- एकशे सत्रा

 
प्रकाश:- काय ???
 
स्पाइक:- रूम नम्बर एकशे सत्रा...
(
स्पाइक आणखी काही माहिती पुरवतो का या अपेक्षेने प्रकाश त्याच्याकडे बघत रहातो....त्याच्या डोळ्यातली चमक बघुन स्पाइक आणखीच उत्साहात..),

स्पाइक:- अरे वा पाणी मुरतय म्हणायच (प्रकाश थोडासा ओशाळतो )माझी टेक्निक वापर.

प्रकाश:- टेक्नीक?

स्पाइक:- टेक्नीक नाय ..तुला तर चांगला टॉनिकच दिला पाहिजे
अरे इस स्पाइक के पास हे हर मर्ज की दवा
तुला आधी लागायला हवी या कॉलेज ची हवा

(आपल्यावरच खुश होत.)
दहा दिवसात काम होणार. शम्भर काय एकशे सत्रा टक्के होणार आणि काम झाल कि या स्पाइक कडुन तुला एक वडापाव फ्री........
 
(
हसत डावीकडुन आत जातो )
 
(
प्रकाश त्याच्याकडे बघुन, त्याच थोडफार पटल्यासारख हसत आपली दोन पुस्तक घेउन उजवीकडुन निघुन जातो)
 
                              
दृश्य दोन

(
सेट तसाच. स्पाइक गुणगुणत खुर्ची पुसतो आणि उजवीकडची खुर्ची डावीकडे टेबलाकडे तोंडकरुन नीट ठेवतो. तेव्हाच प्रकाश ( आता जॅकेट आणि कॅप घालुन  हातात एक जाड पुस्तक घेउन) नेहमीच्याच सहजतेने चालत स्पाइककडे हसुन बघत, पुस्तक टेबलावर ठेवत , टेबला मागच्या खुर्चीत बसतो. )

(
स्पाइक प्रकाशकडे न पटल्यासारख बघत प्रकाशची कॅप उलट फिरवतो आणि खूश होतो .....प्रकाश शांतपणे ती परत सरळ करतो त्यावर वैतागुन स्पाइक काही बोलणार ....इतक्यात डावीकडुन ज्योती आत येते )

(
प्रकाश कुठे बसला आहे ते एकदा बघुन खाली मान घालुन उगाचच गोड हसत .....तिच्या हातात एक जाड पुस्तक आणि खांद्याला लावलेली सुंदर पर्स ( पर्स मधे एक पेन ))
 
(
दोघांचही लक्ष तिच्याकडे )
 
स्पाइक:- ( मोठ्ठे डोळे आणि आवासुन बघत )
 
आयला एकशे सत्रा !!!! दहा दिवसाच काम दोन दिवसात???!!
(
अस म्हणुन तो उजवी कडुन त्याच आश्चर्यात निघुन जातो)

 
ज्योती:- ( डावीकडच्या खुर्चीकडे उभी राहुन ...आता उगाचच पुस्तक वाचत असल्याचा आव आणणार्या प्रकाशला )
हाय ! मी ज्योती. एकशे सत्रा....

 
प्रकाश:- ( दचकुन चोरी पकडली गेल्याची शंका येउन ) काय ?!!

 
ज्योती:- रूम नम्बर एकशे सत्रा हो. तुम्ही प्रकाश ना? तुमच्या शेजारच्या क्लास रूम मधे आहे मी. हे.....( पुस्तक पुढे करत)
 
 
प्रकाश: - अहो बसा ना उभ्या  का!!...( म्हणत स्वतहा उठत तिची खूर्ची नीट करतो) ( दोघही बसतात)
 
 
ज्योती:- या तुमच्या नोट्स ( परत पुस्तक पुढे करत )

प्रकाश:- अहो ..तुम्ही मला उगाच अहो म्हणु नका प्रकाश म्हणा.
 
ज्योती:- ( लाजत ) अ ..हो ......या तुमच्या ...सॉरी तुझ्या नोट्स. स्पाइक कडुन मिळाल्या.
किती हुशार अहात हो तुम्ही....(हे भीड न ठेवता ... फक्त कौतुकानी)
...
मला काही शंका होती यात. ( हे  आत्ताच  ओळख झाली हे विसरुन )
तुम्हाला ..सॉरी ..तुला वेळ आहे का ? मला जरा ना मदत हवी होती ( हे आता तर हक्कानेच )
या पान नम्बर .....

प्रकाश:- (घाबरुन) एकशे सत्रा का?!

ज्योती:- ( न कळुन ) एकशे सत्रा?

प्रकाश:- ( थोडा धीर करुन ) नाहि त्या एकशे सत्रा वर गुलाबी रंगाच पत्र ( जीभ चाउन ..पट्कन बदलत ) म्हणजे इम्पॉर्ट्नट  नोट्स होत्या ....

ज्योती:- ( काहिच न कळुन )बापरे !!... नाहि....मी अजुन पान नम्बर सत्रातच अडकले आहे

प्रकाश:- आणि मी एकशे सत्रात

ज्योती:- अ ?.....विचारुना?

प्रकाश:- तू???....खरतर मला...विचारायच आहे.....पण सुरुवात कुठुन.....

ज्योती:- कसली...अरे...डाउट विचारु का?

( तेव्हाच उजवीकडुन स्पाइक आत येतो आणि तिथेच थाम्बुन त्यांच निरिक्षण करत असतो. त्या दोघान्ना ही त्याच येण जाणवतही नाही )

 प्रकाश:- ( सलगीने) हो ...विचार ना

ज्योती:- ( पुस्तक टेबलावरच उघडुन प्रकाशकडे थोड सरकवुन )
 
या ओळीत इथे म्हटल आहे......
 
(
प्रकाश खिसा चाचपतो ...आपल पुस्तक सरकवुन उचलुन काहितरी शोधल्यासारख करतो. )

ज्योती:- (त्याला शोधताना बघुन ) अरे हो ...विसरलेच ...पेन शोधतो आहेस का? या तुझ्या नोट्स बरोबर चुकुन आल होत. ( अस म्हणत पर्स मधल पेन त्याच्या पुढे धरते)
 
 
प्रकाश:- ( तिच्या हातातल पेन घेताना तिचा हातही सहज अलगत पकडुन) पेन तर सापडल ....पण मन हरवल आहे त्याच काय ?!!
(
स्पाइक चे डोळे इथे मोठठे झालेले )
 
ज्योती:- ( हात तसाच ठेउन ...लाजत ) इशश्य !!!!
 
स्पाइक :- (त्यांच्याकडे बघत ) ....आयला मानल यार !..म्हणजे N A U T N म्हणजे .....नेहमीच....अभ्यास ...उपयोगी ...ठरतो .....( प्रेक्षकांकडे बघुन ) ......नाही का ?!!!!.
 ...(
त्या दोघान्ना बघुन हसत ओरडतो ) ....अरे रामु ....एक प्लेट वडा पाव ................( पडदा पडतो )

 
...भावना

Thursday, 12 November 2015

तुझी बी बाजू अन माझी बी बाजू


म्होटि म्होटि मानसं
फुड्यात बसली

पन कायबी समजना मला
चवथी डिमेंशान म्हनले

कवाची शोधुनबी सापडना त्यान्ला 


फिरुन फिरुन
चावत हुते

चोथा करुनशान चिपाट
कोनतरी म्हनलं "तुज काम नोव्ह"

"तू धर की घरची वाट"


मी बी हटतो कसा
ध्यानात धर म्हनलं

मी हाय कसलला गडी
चवथी बाजू हुडकना यान्ला

जनु मारुन बसलीया दडी


चार भिंतीच्या घरापायी
हित सारा जनम झिजला

चार टाळकी
नांदना सुखात

कुणी रोज चिडुन निजला


पर चारच कुठ्ल्या गड्या
म्हनलं आहेत बाजू कैक

कान देउन जरा धाही दिशला
सगळ्या गोष्टी ऐक


परत्येक गोष्टीला
बाजू दोन

त्या दोनाला बाजू चार
चाराच्या आठ अन आठाच्या सोळा

तर किती निघतील कर तू इचार


तुझी बी बाजू
अन माझी बी बाजू

आर, निघतील कितेक मिती
उगाच नग तू फंदात पडू 

मोजाया पिसं किती

...भावना