खिडकीतून डोकावणार आणि बेडवरच बसुन बघितलेल सकाळच कोवळ उन आणि नवऱ्याने हातात आणुन दिलेला एक कप चहा. बस इतकच भरपूर आहे आठवडा संपून सुट्टी आली हे सांगायला.
सगळ्यात आधी ग्लूकोज बिस्किट आल. त्यावरच बोट चाटणार बाळ बहुतेक चहातुनच बिस्किट खात असाव, म्हणुनच त्याची बोट बरबटली असणार. पण ती मजा वाटायची. ग्लूकोज बोस्किट चहात बुडवुन न मोडता बाहेर काढुन खाता आल की आपण मोठे होउ, अस मला तेव्हा वाटायच. नंतर पटल ते बुडवल्याच नाटक करायला मोठच व्हाव लागत. आणि तरिहि एखाद्या बेसावध क्षणी ते बिस्किट मोडुन चहात पडलच तर मग आली का पंचाईत! शेवटी मग तो कप माझा होता हे कळुच न देण हाच एक मार्ग. म्हणजे पटकन उठून सगळे कप आपणच गोळा करायचे. ही समयसूचकताही वयानुसारच येते.
असो, तर त्यानंतर आल ते मारी बिस्किट. बशीत बिस्किट ठेवल, बरोब्बर हवा तेवढा चहा ओतला, कि ते बिस्किट आपला परिघ वाढवुन दाखवायच. हा माझा आवडता खेळ. त्यामुळे ग्लूकोज बिस्किटा इतक हे गोड नसल तरि या उद्योगाने याची मला गोडी लावली.
मग ओळख झाली ती मस्का खारीची. ते आणखी हव म्हणुन आईला सारखा-सारखा मस्का मारायचा मोह व्हायचा. त्याचे पापुद्रे अलगद न कुस्करता वेगळे करुन, आपण अनेक खारी बिस्किट खाल्ली, हे मीच मला फुशारकी मारुन सांगायचे.
नंतर आल ते बटर, हे खूप कडक, ते कोणाला आवडु शकेल याची जाणीव त्यालाही नसावी बहुदा, इतक ते कोरड. पण आपल अंग फुगवुन दाखवुन, बेडकिने जितक आपल्या पिलाना आश्चर्यचकित केल नसेल, तितक यानी मला भारावल. किती म्हणुन खुमखुमी, कपभर चहा डोक्यावर ओतला तरी तो पिउन हे आपल फुगत जायच.
खरखरीत टोस्टच आणि माझ तेव्हा फार काहि सख्य झाल नाही. पण आता मात्र त्याच्या ' फार नरमहि होणार नाही आणि नको तेव्हा मोडणार तर अजिबात नाहि' या धोरणामुळे, कुणाकडेहि चहाला गेले कि टोस्ट उचलला जातो.
व्वा! आईच्या हातच्या चहाची आठवण झाली. त्यात त्या चहाला महात्म्य आणल ते या मंडळीनी आणि अर्थात सगळ्याच्या मागे असलेल्या आईच्या हातानी.
आणि मग कळली ती सकाळी मस्त हातात आणुन दिलेल्या चहाची एकत्र अनुभवलेली चव. "तू तुझ्या कपातला संपवलास? माझ्यासाठी ठेवलाही नाहिस!" हे वाक्य जेव्हा त्या हातातल्या कपानी पहिल्यांदा ऐकल, त्यानंतर मात्र आतला चहा कधी आधी संपला नाही, आणि तितकावेळ गरमहि राहिला. झोप सुध्दा वाट बघत रहायची, म्हणजे केव्हा कपाचा आवाज होउ न दिल्याचा आवाज येइल आणि मी गाढ झोपेत आहे याचा मला आनंद होइल, यासाठी ती उत्सुक असायची.
सगळ भूतकाळात सांगते आहे, याचा अर्थ तो चहा आटलेला आहे असा अजिबात नाही. हो, हे मात्र खर कि वर्तमानाने शाश्वती कमावली असली तरी त्या चहाच्या नशिबी मात्र बरेच चटके आले आहेत. विक एण्ड हा खरोखरच विक होत जाउन त्याचा एण्ड झाला आहे. चक्कचक्क त्या हक्काने जगण्याच्या एका दिवसावरही मिटिंग नावाच्या सटवीने हक्क सांगायला सुरुवात केली आहे.असो...
परवा आईकडे गेलेले. "चहा घेणार का?" बाबान्नी विचारल. बाबा आता रिटायर्ड आहेत. आता मला आईकडे हमखास बाबांच्या हातचा चहा मिळतो. खारी, ग्लुकोज काहि लागतही नाही.
या वयात, चहा बनवतानाही बाबांचा उत्साह आणि आईच्या चेहर्यावरच समाधान, मला मात्र हल्ली भविष्यातल्या चहाच्या चवीची ओढ लाउन जात हे नक्की.
... भावना