Sunday, 15 March 2015

सरला काकू...


भाजीच्या कुकर ची तिसरी शिट्टी झाली. वीणा ऑफिस ला निघायची तयारी करत होती. त्या गडबडीतच ती बटण  बंद करायला धावली.

या रोज सकाळच्या गडबडीत आपण सगळं आटपून घराबाहेर कसं पडतो? याचं कोडं तिचं तिलाच उलगडल नव्हतं. कित्येक वेळा तिनी प्रत्येक कामाला लागणारा वेळ आणि सकाळी उठल्यापासून ट्रेन गाठे पर्यंत असलेला वेळ याचा हिशोब कागदावर मांडायचा प्रयत्न केला. पण ही आखून करायची गोष्टच नाही. वेळेत पोहोचायला हवं, या  प्रेशर मुळे आपोआपच होणारी ती गोष्ट आहे. परीक्षा जवळ आली कि आधी रेंगाळत होणारा अभ्यास कसा आपोआप शिस्तीत होतो तसं. त्याला तेवढं प्रेशर येणं गरजेचंच असतं. अगदी त्या प्रेशर कुकर मध्ये भाजी काही कुरकुर करता शिजते तसं.

हा कुकर बघितला कि वीणाला आठवण होते ती सरला काकूंची. लहानपणापासूनच वीणाला आजोळचा भारी ओढा. जरा कसली सुट्टी मिळाली कि, कुणी सोबतीला असो वा नसो, ती आजोळी पळत असे. तसं तिथे तिच्या वयाचं कोणीच नव्हतं पण त्या हवेची आणि तिथल्या प्रेमळपणाची ओढ तिला आपोआपच खेचून नेत असे. तिथे तिचं नेहेमी जायचं ठिकाण म्हणजे शेजारच्या सरला काकूंचं घर.

सरला काकू भारी प्रेमळ आणि त्यांच्याशी झालेली वीणाची मैत्री म्हणजे... वयाच्या, शिक्षणाच्या कसल्याही अडचणी मध्ये येता, फक्त एका प्रेमळ मनानी दुसऱ्या माया जाणणाऱ्या मनाशी केलेली मैत्री. बऱ्याचदा तिचा अख्खा दिवस काकुंच्या मागेपुढे करत त्यांच्याशी गप्पा मारण्यात जात असे. आजीला आणि मामींनाहि हे माहित होतं. त्यामुळे ती खूप वेळ दिसली नाही तरीही त्या काळजी करत नसत.

" काकू हा कुकर नवीन आणलात?"

"हो, त्यात बघ किती पटकन भाजी शिजते. तू मोठी होशील ना, तेंव्हा कळेल हो तुला अशा छोट्या- छोट्या सोयींच महत्व. घर- नोकरी सगळं सांभाळताना तुलाही असाच कुकर लागेल. देईन मी तुला तुझ्या लग्नात घेऊन."

काकुंचे आणि वीणाचे असे संवाद  एखाद्याला वयाच्या आणि वेळेच्या आधी वाटतील पण त्याचा योग्यवेळी आणि योग्य उपयोग झाला हे मात्र खरं.

स्टेज फिअर घालवायला शाळेत पहिल्यांदा बाईंनी वक्तृत्व स्पर्धेत बोलायची सक्ती केली त्यावेळी काकूंनीच तिला धीर दिला होता.

"तसं मोठं काहीच नसतं . आपण जसे आहोत, तशीच सगळी माणसं, तसाच कमी अधिक विचार करणारी. त्यांचा उगाच बाऊ नाही करायचा. मग टेन्शनहि येत नाही आणि आपोआप सगळं सगळ्यांना आवडेल असंच होतं."

बहुदा लांबी रुंदी आणि खोलीच्या मोजमापातल्या सल्यांपेक्षा अशी साधी सरळ आणि आपलेपणा दाखवणारी मतच काम करून जातात. हलक्या हातानी काटा बरोब्बर निघावा तसं.

एकदा असंच वीणाचा अबोल आणि उदास झालेला चेहरा बघून काकू म्हणाल्या हे चेहऱ्यावर पिंपल्स येतात म्हणून इतकं काही हिरमुसायला नको. आता तू मोठी व्हायला लागलीस. शरीरात वयाप्रमाणे बदल होणारच, प्रत्येकाच्याच होतात. काळजी घ्यायची, कुठचाही त्रास  होत असेल, तर तो कमी कसा होईल ह्याची खबरदारी घ्यायची हे ओघानेच आलं, पण त्याची लाज काही वाटायला नको. आता माझाही एखादा केस पांढरा होतोय म्हणून मी हि बोलणं सोडू का सगळ्यांशी? आणि मी हि असा चेहरा करून बसू कि काय, तुला पांढऱ्या केसांच्या काकूकडे यायला आवडेल का या विचारांनी?"

आपला प्रॉब्लेम काकूंना कळला कधी आणि त्यांनी तो सोडवला कधी हेही वीणाला जाणवलं नाही. पण ह्या अशा प्रसंगांनीच तिला तिच्या वयाच्या सगळ्या समस्या शेअर करायला एक हक्काचं माणूस मिळालं होतं.

"काकू तुम्ही किती शिकलात?"

सदानकदा घरकामात व्यस्त असलेल्या काकूंना, काका आणि इतरांच्या लेखी असलेली किंमत ओळखून वीणानी हा प्रश्न विचारला. काका तर काकूंची सारखी थट्टा करायचे,  इतकी ती थट्टा नसून, ते आपल्या पेक्षा कोणाकडे काहीतरी कमी आहे याचा आनंद घेणं वाटायचं.

"बीकॉम झाले आहे गं मी. नोकरीहि होती चांगली, रेल्वेत."

काकू ग्रजुएट आहेत! मग तरीही काकांचा अहंकार त्या फुकटचा का सांभाळतात हे वीणाला समजलं नाही.

"पण लग्न झालं आणि 'तुझी घरात मदत कमी होते. अडल्या वेळी काय तुला ऑफिसातून बोलवून आणायची?' या नावाखाली सासूबाई आणि मोठ्या जाऊबाईंनी कटकट करून नोकरी सोडायला लावली."

खरं तर ह्यांचा वकिलीच्या व्यवसायात नीट जमहि बसला नव्हता. पण त्या वेळी माझं ऐकणारं कोणीच नव्हतं आणि मी नोकरी सोडली. तशी ह्यांना व्यवसायात नशिबानं साथ कधीच दिली नाही. व्यवसाय म्हटला कि चढ उतार आलेच. पण ह्यांनी ते मनाला फार लावून घेतलं. आणि मग मला आणि घराला आधार देण्याऐवजी, ते स्वतःच खचत गेले. पुढे दिरांनाही आमचा जाच वाटायला लागला. शिवाय मोठा लाडका लेक एकटाच आपल्याला सांभाळील या खात्रीनी सासुबाईंनी आम्हाला दुसरं घर करण्याची सुचना या ना त्या कारणानी द्यायला सुरुवात केली. दिवस चांगले नसले कि चारही दिशा आपली दारं लाऊन घेतात हेच खरं."

" बरं ते जाऊ दे. तुला जेवणातलं  काय काय करता यायला लागलं सांग बरं?"

आपल्या आयुष्यातली सल वीणाच्या चेहऱ्यावर दिसायला लागल्याच्या जाणीवेनी सरला काकूंनी विषय बदलला.

वीणाचा अभ्यास आणि एक्स्ट्रा करिक्युलर अक्टीविटीज याकडे पहिल्यापासूनच जास्त ओढा होता. शिवाय तिच्या आईचं, तिनी स्वयंपाक घरात लुडबुड करण्यापेक्षा, परीक्षेत चार मार्क जास्त मिळावेत असं मत होतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काकूंना माहित होतं.

"तुला मी एक गम्मत सांगते. आमचं लग्न झालं ना तेंव्हा लगेचच आम्ही दोघं ह्यांच्या काकांच्या गावच्या घरी रहायला गेलो होतो. तिथून ह्याचं कुलदैवत आणि आमचं दैवत जवळच असल्यामुळे, देवदर्शन आणि फिरणं, असा तो बेत होता. काकांचं घर म्हणजे, तिथे कायम मुक्कामाला कुणीच नव्हतं. वर्षातून दोन चार वेळा येउन कोणीतरी घर जागवून जात होतं. आम्ही चार दिवसांसाठी गेलो खरं पण अनेक महिन्यांची  धूळ झाडण्याची जबाबदारी घेऊनच. प्रवासानी दमून जरा पडले होते आणि थोड्यावेळानीच माझ्या लक्षात आलं, इथे दुसरं कोणी येणार नव्हतं आमच्या भुकेची सोय मलाच करायला हवी होती. मी हातपाय हालवले नाहीत तर साधं पाणी देखील मिळणार नव्हतं. माझ्या आईच्या घरी मी सुद्धा अशीच तुझ्यासारखी लाडात वाढलेले बरं का! पण तेव्हा कळली आईची खरी किंमत. हातात हव्यात्या वस्तू मिळतात तोपर्यंत त्या माणसाची किंमत कळत नाही, त्या वस्तूचीही किंमत कळत नाही आणि वस्तूमागच्या खस्तांचीहि जाणीव होत नाही.

कॉलेजच्या पहिल्या वर्षात वीणाच्या आयुष्यात काही सुंदर बदल झाले. विक्रांत तिच्या आयुष्यात आला. अर्थात आयुष्यात आला म्हणण्या एवढा तो टिकलाच नाही कारण तसाच तो दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला.

"याला प्रेम म्हणत नाहीत ग. या वयात मुलांना आकर्षण असतं. फक्त आकर्षणापोटी झालेली ही एक गफलत आहे. आणि तू मनाला एवढं लावून घेतलंस कि सगळं आयुष्यच हरवल्यासारखी बसून असतेस. पुढे जात रहा. आपोआप जे हवं ते मिळेल"

आणि झालंही तसंच. बीकॉमच्या शेवटच्या वर्षी ती परत एकदा प्रेमात पडली. परत एकदा कसली आता खरोखर प्रेमात पडली. प्रकाश बोलतो कसा, दिसतो कसा, हसतो कसा या शिवाय काकूंना ऐकवायला तिच्याकडे दुसरा विषय नव्हता. आणि काकू सुद्धा तिच्याच उत्साहात ते ऐकत. कधी तिला सल्ले देत. तर कधी, तिला पुढे फायदाच होईल म्हणून एकेका पदार्थाची रेसिपी सांगत.

आता, राजेळी केल्याचे काप केलेना कि त्यांचे वेफर्स कसे मस्त होतात आणि तिखट चणा डाळ घरी सुद्धा कशी बनवता येते, हे चमत्कार वीणा प्रकाशला दाखवू लागली.     

ओघानी सासरच्यांची संमती, पण फिरण्यात वेळ घालवायला घरच्यांचा विरोध वगैरे होत होत....

"काकू घडीच्या पोळ्या कशा करायच्या?"

"का ग?"

"सासूबाई म्हणत होत्या, त्यांच्या घरी फक्त घडीच्याच पोळ्या लागतात."

..झालं मग त्याचीहि प्रात्यक्षिकं झाली.

काकूंच एक वैशिष्ठ्य म्हणजे प्रत्येक दिवसातला प्रत्येक क्षण त्या जगत होत्या, हसत होत्या आणि गुणगुणत होत्या. हो, त्यांचा आवाज सुद्धा असा गोड होता कि त्यांचं बोलणं गुणगुणल्या सारखंच वाटायचं आणि हसणं प्रसन्न करायचं.

"आपण थांबायचं नसतं ग. आपल्याला नेहेमी वाटतं, नंतर सगळं नीट होईल. मी सेटल होईन, मग मी हे करेन आणि ते करेन. नंतर काय होईल आणि काय नाही याचा विचार करत, आज हातातला जातो, हे विसरायला होतं बघ. त्यामुळे जे करायचं आहे ते आज करायला घ्यावं."

"काकू, तुम्ही किती छान सगळं समजावता हो. तुम्ही नसता तर माझं कसं झालं असतं? मला कोणी समजून घेतलं असतं?" या वीणाच्या वाक्याला काकू खळखळून हसल्या.

"असं काही नाही ग. मी माझी गरज म्हणून तुझ्याकडे बघते आणि त्यातच तुझी गरज पूर्ण होते इतकंच."   

पुढे वीणाचं लग्न झालं. काकू लग्नाला काही येऊ शकल्या नाहीत. कारण त्या आजारी पडल्या. आजारपणात, उठवत नसतानाही, त्यांनी भेटायला आलेल्या वीणाची, ओटी भरली. नंतर काही दिवसांनी काकू वारल्याची बातमी वीणाला कळली. दुसरे समजू शकणार नाहीत असं त्यांच्यातलं नातं, ते दुरावल्याचं दुःख तरी कोणाला कळणार आणि सांगणार?

लग्नानंतर दुसऱ्याच वर्षी वीणा गरोदर होती. पण दुसऱ्या महिन्यातच तिचं मिस कॅरेज झालं आणि हातातला आनंद अचानक कोणीतरी  हिरावून घेतला.

पुढे प्रकाश आणि वीणा तिच्या आवडत्या ठिकाणी, म्हणजे आजोळी, काही दिवसांकरता बदल म्हणून रहायला गेले. अजून खणखणीत असलेल्या आजींनी आणि मामींनी नात जावयाला काही कमी पडू दिलं नाही. पण वीणाच्या मनातलं उदास वातावरण काही निवळलं नाही.

दुसऱ्या दिवशी ओसरीत ती अशीच बसली असताना तिला एक छोटीशी मुलगी दिसली. हातात बेल्ट घेऊन, कितीतरी वेळ तो  फ्रॉकच्या बकलात अडकवायच्या प्रयत्नात, ती गुंतली होती. थोड्या वेळानी तिनी वीणाकडे मदतीच्या अपेक्षेनी बघितलं .

"काकू हे लाऊन  दे न!"

कुणीही न दिलेल्या हक्कानी तिचं वीणाशी बोलणं, तिचं हसणं, तिचं असणं सगळंच वीणाला सुखावून गेलं. 

" ही सरला काकूची नात. तिच्या मुलाची मुलगी. इतकी वर्ष आईला विचारलं नाही, आता आला आहे. घरावर लक्ष आहे ना!" आजींनी नेहेमीसारखं कडाडून आपला निषेध व्यक्त केला.

तरीच हे हसणं आणि गोड बोलणं कुठचीतरी ओळख सांगत होतं, आणि कुणाची तरी गरज कुणीतरी नकळत पूर्णही करत होतं. 

...भावना