Tuesday, 10 March 2015

आम्ही फक्त…


कितीही रडलो ओरडलो तरी शब्दांना कशी येणार धार
आम्ही फक्त केला चार भिंतीत आमच्या पुरता संसार

 
बाहेर झाला अवेळी गलका आम्ही फक्त घड्याळ पाहिलं
उठून फक्त दार बंद केलं, वाटलं चुकून थोडं उघडं तर नाही ना राहिलं?

कटकट, कंटाळा, कुरकुर एवढ्या पुरतीच मर्यादित आमचे विचार
आम्ही फक्त केला...

 
प्रत्येक वर्षी मात्र आम्ही सगळे दिन करतो साजरे 
गणपतीला दुर्वा आणि हळदी कुंकवाला गजरे

म्हणणं आमचं एवढंच आज बंद नसुदे बाजार
आम्ही फक्त केला...

 
एका मतानी काय होतं, यावर आमचं एकमत पडेल
विषय काढलाच तर सांगतो, आमच्या वाचून काय अडेल?

देशाच्या परिस्थितीवर बोलायला पुढे, कारण फक्त हवा इस्त्रीचा कोट आणि विजार
आम्ही फक्त केला...

 
बातम्याच बघायच्या तर रोज काहीतरी घडायला हवं
नाहीच घडलं तर काय उपयोग त्यापेक्षा छायागीत पहावं

वर्तमानपत्रहि आम्ही केवळ एक सवय म्हणून वाचणार
आम्ही फक्त केला चार भिंतीत आमच्या पुरता संसार

...भावना