Thursday, 12 March 2015

निसर्गाचे प्रेमगीत...


आकाशाचे अबोल दुःख, धरणी हृदयी सले
धरित्रीला त्या चिंतीत पाहुनी, मेघहि ते व्याकुळले

 
जलदांच्या मग उमाळ्याने, सरीस आले रडू
धारांचे ते अश्रू पुसाया, लागे कोंब धडपडू  

 
कोंबाला त्या कुशीत घेऊन, प्रेम पाझरे माती
माती-वेडे गाणे गाता, परिमळे समीर किती

 
तालावरती पवनाच्या मग, धुंद नाचल्या वेली
वेलीला खेटून वृक्ष तो, जोडी अभंगलेली

 
लकाकणारी किरणे करिती, वृक्षावरती माया   
किरणे पाहुनी प्रसन्न हसला, आला रवि उदया 

 
तेजःपुंज तो सूर्य बघोनी, दाही-दिशा खुलल्या
दाही-दिशा प्रेमाने, इंद्रधनू-रंगी नभी हसल्या 

...भावना