Tuesday, 17 March 2015

निरोप...



निघताना घरातून, मन मागेच गेलं राहून
पहावलं नाही त्याला, आज उशाशी पाणी ठेवलेलं स्वतःहून

 
निघताना घरातून, निघतही नव्हता पाय
उद्या चहा कोण देईल, गाळून साय?

 
निघताना घरातून, डोळ्यात पाहिलं होतं पाणी
खिशात रुमालही नाही ठेवला, विसरलेच त्या क्षणी!

 
निघताना घरातून, खूप जड होतं झालं
आपलं घर, डोळेभरून पहायचच राहिलं

 
निघताना घरातून, देवाशी लावलाच नव्हता दिवा
आता भेटूनच सांगेन त्याला, माझं मन तिथेच जपून ठेवा!

 
निघताना घरातून, दाटून आले होते आठवणींचे ढग 
आयुष्य यापूर्वीचं आपलं, कधीच नव्हतं विलग


निघताना घरातून, राहूनच गेलं सांगायचं
जन्मोजन्मीच्या पुण्याईनीच भाग्य हे लाभायचं!


निघताना घरातून, खांदा तुम्ही दिलात  
समजू नका आताही तुम्ही, एकटे राहिलात

 
निघताना घरातून, कबुल करते माझी चूक
पण साथ मी सोडली म्हणून, लागून राहिली आहे रुखरुख  

...भावना