Sunday, 1 March 2015

मी नाही म्हणायला शिकले...


वय झालं माझं, आता अर्धे केस पिकले
जमलं इतकंच कि, मी नाही म्हणायला शिकले

 
डिस्काउंट च्या ऑफर ला, हल्ली भुलत नाही
दोनावर एक फ्री, मी खुलत नाही

शोकेस मध्ये भारी कपड्यात सगळे पुतळे थकले
जमलं इतकंच कि, मी...

 
बुफे डिनर मेनू, मला आता खुणवत नाही
अनलिमिटेड थाळी, माझं लिमिट ठरवत नाही

भूक किती ठरवणाऱ्या जिभेला, मी रोखले
जमलं इतकंच कि, मी...

 
टीव्ही रिमोट आहे, पण कंट्रोल माझ्या हाती
रंजक तसं कमीच, तिथे जाहिरातीच अती

कित्येक प्रोडक्ट्स त्यांनी, असेच मुर्ख बनवून विकले
बरं झालं, आता मी नाही म्हणायला शिकले!!

 
नाही म्हणणं कठीण आहे, हवं म्हणणं सोपं
नवीन-नवीन गोष्टींचं, सगळ्यांनाच अप्रूप

ठायी-ठायी गळ, मायाजाळाने टाकले
जमलं इतकंच कि, मी...

...भावना