Wednesday, 11 March 2015

माझी सुंदर पेटी…


माझ्याकडे होती, एक सगळ्यात सुंदर पेटी
उशाशी घेऊन तिला, व्ह्यायची रात्रही छोटी


आत तिच्या होती, खूप भली मोठ्ठी जागा
कुठचीही गोष्ट ठेवताना, तिनी कधीच केला नाही त्रागा


एक होता चंदेरी कागद आणि होता एक तुकडा काचेचा
त्यातून नेहेमीच दिसायचा हसरा, चेहरा किडा-मुंगीचा


भिंग होतं एक जादूचं, त्यात दडली होती आग
आणि एक घड्याळ आजीचं, त्याला कधीच यायची नाही जाग


एक मोरपीस होतं, ते कानात गम्मत सांगायचं
कधीही कोणाशी कुजबुजलं, तरी त्याला हसूच यायचं


दोन मजबूत दोरे, आणि होता एक बिल्ला  
खूप कष्टांनी मिळवलेल्या नकाशात, होता एक अद्भुत किल्ला


अगदी जपलेली, छान आणि रंगीत, होती एक गोटी
तिच्याच पोटात खरतर लपलेली, आपली पृथ्वी होती


किल्ली खजिन्याची होती, कुलुपाचा शोध होतो लावत
पण हल्ली, त्या पेटीत काहीच का नाही मावत?

...भावना