Sunday, 14 June 2015

तुझा रंग अंगावर लेवून...


स्वप्न म्हणाले वास्तव सुंदर
चंद्र लाजला अपूर्णतेवर

अजून नाही रात्रीलाही कोडे ते उलगडले
तुझा रंग अंगावर लेवून होते मी पहुडले

 
असंख्य तारा जमू लागल्या
सरी सरींवर झडू लागल्या

भूवर उतरून चांदणे बघे, कसे कुतूहल जडले
तुझा रंग अंगावर लेवून होते मी पहुडले


निशा उषेला हळुच म्हणाली
तुझा रंग घेऊन ये खाली

चित्र देखणे समोर पाहुन पाय तिचेही अडले
तुझा रंग अंगावर लेवून होते मी पहुडले

 
...भावना

Sunday, 7 June 2015

दुःख वाटायला गेले...


दुःख वाटायला गेले
वाटेकरी कोणी नाही

दाराच्या त्या फटीपाशी
कान, डोळे सर्वदाहि


दुःख वाटायला गेले
आप्त मोठे कनवाळू

मोजणीला आले ध्यानी
मागे झाले तेहि हळू


दुःख वाटायला गेले
तोही नुसताच उभा 

कर कटेवर त्याचे
कोणी मार्ग दाखवावा?


दुःख वाटायला गेले
होती कारणे अनेक

सुखाचीच उमटावी
माझ्या हातावर रेख


दुःख वाटायला गेले
थिटा हात हाती आला

माझ्या दुःख करण्याचे
कारण तो पुसे मला 

माझ्या दुःख करण्याचे
कारण ना दिसे मला 


...भावना

Tuesday, 2 June 2015

आजकालची सावित्री


आजकालची सावित्री
तिची छोटी नाही गोष्ट

सत्यवानाबरोबर
तिने उपसले कष्ट

 
आजकालची सावित्री
अजिबात नाही भीत्री

सत्यवाना साथ देई
करे यमाशीही मैत्री

 
आजकालची सावित्री
नाही वड पुजलेला

वडापेक्षा घट्ट तिने
स्वाभिमान बाणलेला

 
आजकालची सावित्री
अपेक्षा तिचीहि काही 

हे बरोबरीचे नाते
सान-थोर कुणी नाही

 
आजकालची सावित्री
जन्मोजन्मीचे मागणे

नको वाटूदे बंधन 
असे एकत्र असणे

 
...भावना

Monday, 1 June 2015

घरी नेहमी येतो जो रात्री...


मिशीवाला एक बुवा
रोज स्वप्नात येई

रात्री आला म्हणून त्याला
आई चोप देई


जाड त्याचा आवाज
आणि मोठे होते हात

मी उठेन म्हणून तो
दबकत चाले घरात


अलगद थोपटून प्रेमाने
तो माझा पापा घेई

कुशीत त्याच्या शिरताना
भीती दूर जाई 


सकाळच्या वेळी मात्र
संपे स्वप्न माझे

उजेडाला घाबरे का?
कारण ना समजे


दिवसा हाक मारून म्हटलं
त्याचा शोध घ्यावा  

आई नेहमी दुध आणे
पण त्याचा ना सुगावा! 


म्हटलं आता आपणच
लाऊ त्याचा छडा

आई आनंदात म्हणाली,
 "रांगतोय थोडा थोडा!"


पहाटेच्या वेळी एकदा
ठरवून जाग आली

पळताना बघून त्याला
मी हाक मारली


धावत येउन, मला उचलून
मोठ्याने तो बोलला

"बाळ आपला बोलू लागला, बाबा म्हटलं मला!"
 

मिशी ओढून त्याची मी मग, करून घेतली खात्री
बाबा म्हणतात त्याला, घरी नेहमी येतो जो रात्री...


...भावना