मिशीवाला एक बुवा
रोज स्वप्नात येई
रात्री आला
म्हणून त्याला
आई चोप देई
जाड त्याचा आवाज
आणि मोठे होते
हात
मी उठेन म्हणून
तो
दबकत चाले घरात
अलगद थोपटून
प्रेमाने
तो माझा पापा घेई
कुशीत त्याच्या
शिरताना
भीती दूर
जाई
सकाळच्या वेळी
मात्र
संपे स्वप्न माझे
उजेडाला घाबरे का?
कारण ना समजे
दिवसा हाक मारून
म्हटलं
त्याचा शोध
घ्यावा
आई नेहमी दुध आणे
पण त्याचा ना
सुगावा!
म्हटलं आता आपणच
लाऊ त्याचा छडा
आई आनंदात
म्हणाली,
"रांगतोय थोडा थोडा!"
पहाटेच्या वेळी
एकदा
ठरवून जाग आली
पळताना बघून
त्याला
मी हाक मारली
धावत येउन, मला उचलून
मोठ्याने तो
बोलला
"बाळ आपला
बोलू लागला, बाबा म्हटलं मला!"
मिशी ओढून त्याची
मी मग, करून घेतली खात्री
बाबा म्हणतात
त्याला, घरी नेहमी येतो जो रात्री...
...भावना