Wednesday, 9 December 2015

निसर्गाची रांगोळी...


कैक तास, मी झटुन काढले ते ठिपके त्या ओळी
रंग संगती, किनार भोवती, पुरी झाली रांगोळी

 
अल्लड वारा पाहत होता वाट होऊन अधीर
सुसाट वेडा धावत सुटला, जसा धनुतुन तीर

 
मी हि चिडले, बरीच रडले, हळुच म्हणाले पान
फेर धरूनी आम्ही नाचलो, ही रांगोळी छान

 
पान फुलांनी सडा घातला, किती ठिपके अन ओळी
वरून केली आभाळाने रिती रंगांची झोळी

 
पंख चिमुकले बसत फुलावर हसत म्हणाले तेव्हा
तुझ्या स्फूर्तीने हि रांगोळी, हा निसर्गहि करतो हेवा


..भावना

तो तेंव्हाचा निवांत वेळ...


कुठे हरवल्या त्या दिनरात्री
तो तेंव्हाचा निवांत वेळ

 
कुस बदलली फक्त कधीतरी
नको जराही बदल हवेत

थंडी मध्ये चादर ओढुन तुझी
पहुडलो जरी झाली अवेळ

कुठे हरवल्या त्या दिनरात्री
तो तेंव्हाचा निवांत वेळ

 
रात्रींवर तर फार जिव्हाळा
सवे पाहिला चांदण सोहळा

वेड पांघरून जरी हळवा झालो
तरी घेतले मला कवेत

कुठे हरवल्या त्या दिन रात्री
तो तेंव्हाचा निवांत वेळ

 
भरकटलेली नव्हती वहाण

कुठेही गेलो तेच ठिकाण
शांततेला ऐकु शकलो तिथे

जिथे ऊन सावल्यांचा खेळ

कुठे हरवल्या त्या दिन रात्री

तो तेंव्हाचा निवांत वेळ

 
..भावना

लक्ष्य...


उडायचंय तुला
जर या सगळ्याच्या वर

पंखांना बळकटी येऊ दे
असु दे स्थीर नजर

 
दिशाहिन वाऱ्याची
घेऊ नको तू सोबत

त्याचे स्वतःचेहि
भरकटलेलेच गलबत

 
तुझ्या ध्येयाची
नसेल जर कुणा चाड

पाशहि येऊ देऊ नको
तर मार्गा आड

 
भोवती फक्त
माजलेले खुरपटले रान

उंच वाढल्या वृक्षाची मात्र
सदैव ताठ मान

 
..भावना

विश्रांती मोड...


आज रविवार नका घेऊ कामाचं लोड
एक दिवस तरी ऑन असुदे विश्रांती मोड

 
आठवडाभर काम म्हणजे नुसती धबडघाई
कशासाठी आटापिटा उत्तर कुठेच नाही

झाड कसं फळ धरेल मजबुत होण्याआधी खोड?
म्हणुनच...

एक दिवस तरी ऑन असुदे विश्रांती मोड

 
जीवनाची शर्यत इथे फिनिश लाइन अभावी
सुखाची रेसिपी यांना मॅगीहुन सोप्पी हवी

शोध घेताय आनंदाचा पण बरोबर आहे का रोड?
थोड थांबा..

विचार करा ..
आणि त्यासाठिच...

एक दिवस तरी ऑन असुदे विश्रांती मोड
 

...भावना

उमेद...


  
प्रचंड सागर पुढे  पसरला.

तरीहि त्याने न बुजलेला.

बांधत होता उंच मनोरा, एकग्रतेने गढुन
स्वप्न त्याचे, 'सागर मापु, त्यावरती चढुन'

 
पाठ टेकुन विहिर होती
सोबत, परंतु स्वतंत्र व्यक्ती

सागराचा थांग शोधता, तीहि झाली खोल
हात तिचेहि अथक चालले, न ठरो यत्न फोल

 
सागराला त्याचे धोरण
कुणी न टिकला ठेउनहि तारण

लाट एकच करुन गेली, सगळी भुई सपाट
तीच उमेद घेउन त्यांनी, घातला पुन्हा तोच घाट

...भावना