"अगं कित्ती कामं करशील. सगळीच कामं स्वतःवर ओढवून घेऊ नयेत. आपल्याला स्वतःसाठीही काही वेळ हवा की नको..." मी पुढ्यातलं दुसरं केळं उचलून शांतपणे सोलंत असताना माझ्यासमोर बसलेल्या आमच्या शेजारच्या काकू म्हणाल्या. त्यावेळी माझ्या हातातलं केळं आणि त्यांच्या हातात सापडलेली मी हे दोघं एकाच विवंचनेत होते.
मला, सेफ्टी डोअर वगैरे वायफळ खर्च वाटतात. सेफ्टीच्या या प्रोलाँग्ड प्रक्रियेची पाहिली पायरी म्हणजे कोणीही दाराची बेल वाजवली की आधी ते पीपहोल नामक भोक, बुजवण्यासाठी लावलेल्या काचेतून बघणं आलं. आता बघणार्याला यातून काय आणि कितपत दिसतं याबद्दल भाष्य न केलेलंच बरं. एकवेळ, बा सी मर्ढेकरांच्या 'पिपात मेले ओल्या उंदीर' चा अर्थ मी सांगेन, पण पीपून बघितलेला समोरचा 'तो', ओला आहे का सुका आणि माणुस आहे का उंदीर हे मला कधीच कळलेलं नाही. मग दारा आडून सेफ्टी चेन लावून डोकावून पाहाणं आलं. मला वाटतं की आपले डोळेच इतके बोलके आहेत की, भीतीपासून, घृणा या उच्चारताही न येणाऱ्या भावनेपर्यंत सगळं जे काही आपल्या मनाला वाटणं असतं, त्याच्या बाकीच्या अवयवांबरोबर वाटण्या न करता, आपले डोळेच सगळं बोलून दाखवत असतात. मग, चेन आडून डोकावून, ते डोळे समोरच्याला दाखवून आपण समोरच्याची ओळख पटवून घेत असतो, की आपली खरी ओळख त्याला दारातच करून देतो. माझ्या बाबतीत म्हणायचं तर हा इतका सोपस्कार करायच्याऐवजी, दार पूर्ण उघडल्यावरच कदाचित, अख्खी दिसू शकणारी मी आणि अशा बेसावध क्षणी बहुतेक वेळा माझ्या हातात असलेला झाडू किंव्वा कपडे वाळत घालायची काठी, नाहीच तर आत्ताच कणिक तिंबताना वळलेल्या मुठी किंव्वा हातातलं पूर्ण पिळलेलं आणि जीव वाचवण्यासाठी धडपडणारं लादी-पुसणं, हे बघुन समोरच्याचे डोळेच, मला 'खरा 'तो' कसा आहे', हे पटकन सांगतात.
पण तरीही या सेफ्टी फीचर्स ची मला गरज भासायला कारण म्हणजे, आमच्या शेजारच्या देशमुख काकू. या सौ चंद्रभागा दत्तात्रेय देशमुख काकूंना फक्त नावातच एका 'I' ची गरज आहे. कारण त्या CD देशमुख काकू नसून CID देशमुख काकू आहेत. आणि हा 'आय' त्यांच्या नावात नसला तरीही, त्यांच्या पासष्टी नंतरही दूरचा आणि जवळचा असे त्यांचे दोन्ही आयीज् त्यांचा 'आय'त्म विश्वास कॉलनीमधल्या प्रत्येक भानगडीगणिक वाढवत असतात.
देशमुख काकू आणि मी यात मात्र गेले कित्येक वर्ष एक अभेद्य भिंत टिकून उभी आहे. पण ती आमच्या घरातल्या नवीन सेफ्टी फीचर्स मुळे नाही तर माझ्या नवर्याच्या नोकरी निमित्ताने एका जागी स्थिर नसलेल्या माझ्यामुळे. काकू आमच्या ठाण्यातल्या शेजारच्या घरात रहातात. माझ्यामते तर त्या, बिल्डिंग बांधण्यापूर्वी पासून तिथे असाव्यात. कारण बिल्डिंगच्या प्रत्येक घरातल्या मुळ मालकाच्या मनात इसवीसनापूर्वी काय होतं, इथपासून ते बिल्डिंगच्या पायाखाली काय दडलेलं आहे याची इत्थंभूत माहिती त्यांना आहे. त्या पूर्ण बिल्डिंगमधल्या प्रत्येक घरात काकूंचा स्वैर संचार आहे. चार महिन्याने जरी मी माझ्या घरात परतले तरी, इतके दिवस बंद असलेल्या माझ्या घराला मी आल्याचा सुगावा लागायच्या आधी, देशमुख काकू आमच्या घरात प्रवेश करतात. केवळ यावर उपाय म्हणूनच मी, माझ्या नवर्याच्या घराच्या जुन्या दाराला पीपहोल आणि बाहेर एक सेफ्टी डोअर बसवून घेण्याच्या निर्णयला संमती दिलेली. त्यामुळे मी त्याला सोडून ठाण्यात एकटी आले की बायकोपासून लांब असुनही आपण तिचं रक्षण वगैरे करतो आहे हे फील नवर्याला आनंद देत असेल पण ते दार काकूंना काही अडवू शकालं नाही. कितीही पहाटे आणि वॉचमनच्या झोपेच्या वेळेत जरी मी आमच्या ठाण्याच्या घरी गुपचूप आले तरीही, काकूंना माझ्या येण्याचा सुगावा लागतोच आणि दरवाजाची बेल वाजल्यावर काकूंना दाराबाहेरुन, पीपहोल मागचा माझा डोळाही दिसतो. त्यामुळे दार न उघडता तसंच मागे फिरण्याचा विचार जरी मी केला, तरी काकू आणखी दोनदा बेल वाजवतात.
आज तर त्यांनी मला सेफ्टी डोअर पुसतानाच पकडलं. एकतर आदल्याच दिवशी ट्रेनने केलेला तेरा तासांचा प्रवास, त्यात सकाळपासून उपाशी पोटीच सुरू केलेली स्वच्छता मोहीम आणि गेला एक-दीड तास काकूंची माझ्याप्रति अती आस्थेने सुरू असलेली चौकशी, यामुळे मी आता तिसरं केळं उचललं...
"आता आजच बघ, हे सगळं घरकाम तुला कशाला करायला हवं? मी म्हणते बाई ठेवायला काय होतं?? ....... पगार तर बराच असेल ना नवर्याचा???"
...आपल्या बोलण्यात जागोजागी असे बरेच सेनसीटीव प्रश्न पेरून काकूंची माहिती यंत्रणा डेटा गोळा करत असते. पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. 'केळ्याने भुक भागात आहे रे, आणखी केळीची पाहिजे' म्हणत मी जिभेवर ताबा मिळवला होता.
"मोलकरीण सांभाळून ठेवणं हेही जमलं पाहिजे बाईला..".... काकूंनी भात्यातला आणखी एक बाण काढला. आणि इथे मी, संपलेलं तिसरं केळं आणि माझ्या कर्तुत्वावर घेतली गेलेली शंका, यामुळे रागाने उफाळून तोंड उघडलं...
"मोलकरीण न टिकायला कारण मी नाही, नवरा आहे माझा..."
..... का माहीत नाही पण माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच काकू अचानक उठून गेल्या. खरंतर पुढे मी, माझ्या नवर्याच्या फिरतीच्या नोकरीबद्दल आणि त्यामुळे नक्की कुठच्या घरात मोलकरीण ठेवावी या माझ्या नसुटणार्या त्रांगड्याबद्दल त्यान्ना बरीच माहिती देणार होते.
असो....... पण आता इथल्या लोकांमध्ये बरेच बदल झाले आहेत. यावेळी तर वॉचमनने झोपेतून उठून चक्क मला सलाम ठोकला आणि नसांगता माझ्या हातातली बॅग हिसकावून घेऊन दारापर्यंत आणुन दिली. मी विचार केला दिवाळीचे वेध याला श्रावणापासूनच लागले का काय. ते एक वेळ परवडलं पण काहीही नघडता हल्ली सगळी बिल्डिंग माझ्याकडे फारच सहानुभूतीच्या नजरेने का बघत असते याचं कोडं काही सुटलेलं नाही...
... भावना