दर रविवारी सकाळी, दारात 'दत्त' न-म्हणता नुसताच येऊन उभा राहाणारा कुरुमुर्थी, या रविवारी सकाळी सुद्धा हजर झाला.
जिथे वर्षानुवर्ष राहतो तिथे आपण इतके सेट होतो की आपल्याला वाटतं अख्या जगात फक्त इथेच सगळ्या सोयी सुविधा आहेत. आणि मग ते सोडून सगळा संसार दुसरीकडे जाऊन उभारणं याचा विचारही आपल्याला करवंत नाही. यात आपल्या भोवतालची ती असंख्य माणसंही आली, जी कधी समोरचा इस्त्रीवाला बनून, नाहीतर खालचा भाजीवाला बनून आपल्या आयुष्याचा एक भाग होतात. ज्यांना काही पर्याय असू शकेल अशी शंकाही मग कधी आपल्याला शिवत नाही.
पण तरीही... आम्ही हैदराबादला आलो.. हे जमलं कारण बर्याच वर्षांपूर्वी ओमानला जाऊ म्हणून पाठीवर घेतलेलं घर आम्ही अजून खाली ठेवलंच नाही. तर झालं असं की आम्ही आधी इथे आलो आणि मग विचार केला की आलोच आहोत तर इथे जगतात कसं ते बघू...
आणि सुरुवात झाली ती डिमार्ट आणि स्टार या अत्यावश्यक सेवांपासून. डिमार्ट निअर मी, स्टार निअर मी, हे बोटं चालवून शोधल्यावर आम्ही एकमेव रविवारच्या सुट्टीत कार चालवत रस्त्यातले खड्डे, ट्रॅफिक, पार्किंग हे सगळे गड सर करून इथल्या स्टार च्या रॅक वरची आम्हाला हवी असलेली वस्तू गर्दीतून आरपार अचूक शोधून काढणं सुरू केलं.
पण मग असे दोन रविवार खड्ड्यात घातल्यावर लगेचच, ऑनलाईन ऑर्डर करून सगळ सामान घरीच आणावं यासाठी माझी बोटं शिवशिवायला लागली.
आणि नंतरच्या रविवारी सकाळी दारात उभा राहीला तो कुरुमुर्थी....
दारात आलेल्या माणसाशी दोन शब्द बोलावेत म्हणून मी कुरुमुर्थी बरोबर दोन शब्द बोलतेच. एक म्हणजे 'हिंदी' आणि दुसरा म्हणजे 'थँक्यू'
'हिंदीत बोल' हे हिंदी न बोलणाऱ्या माणसाला कसं सांगायचं ते मला अजून जमलेलं नाही. पहिले दो-तीन रविवार कुरुमुर्थी आल्याआल्या नचुकता त्याच्या भाषेची ट्रेन सुरू करायचा. आणि मग माझा 'हिंदी हिंदी' चा नारा ऐकून थोड्यावेळाने त्याचा ब्रेक लागायचा. नंतर फक्त भरतनाट्यम.
"भाजी जरा ताजी नाही का आणता येत?"
"इतका कडिपत्ता काय थापू नवर्याच्या डोक्यावर!... त्यापेक्षा या मरगळलेल्या मेथीच्या चार काड्यांना आणखी चार सोबती बरोबर आणले असतेस तर!!... "
"मासे काय फक्त गोड्या पाण्यात असतात का रे? समुद्र बघायला ये एकदा आमच्याइकडे मग कळेल, मासे कुठचे खायचे ते.."
"कोकम, गोडा मसाला तुमच्या हैद्राबादी स्टार App वर नाही... App अपडेट करायला सांग जरा त्यान्ना..."
..... हे सगळं मी आता फक्त डोळ्यांनी बोलू शकते. लवकरच तुम्हाला माझ्या अरंगेत्रम् चं निमंत्रण येईल... नक्की या बरं…
.... भावना