Thursday, 24 August 2023

हेल्थ कॉन्शस...

'माझं समाजात वाढलेलं वजन', हा अंतरराज्यीय प्रश्न झाला असून तो, 'मराठी तेलुगु भाई-भाई' धोरणांतर्गत तातडीने सोडवण्याचा फतवा निघाला असावा, अशी शंका मला सध्या येते आहे. कारण, माझा नवरा तर मिळेलत्या कारणाने मला घराबाहेर काढण्यासाठी आधीपासूनच उत्सुक होता, पण सध्या आता इथे, आमच्या हैद्राबादच्या घराबाहेर पडल्या-पडल्या, 'मी आणि माझे प्रकृतीला घातक वजन' यासाठी पूर्ण प्रकृति च झटंत आहे. 

इथे आमच्या दाराबाहेरंच बिल्डिंगची लिफ्ट आहे. म्हणजे तसा आमचा तिसराच मजला आहे पण  वस्तू वापरात राहिल्या म्हणजे त्यांना गंज चढत नाही, म्हणून मी घराचे दार आणि लिफ्ट यामध्ये असलेल्या पायर्‍या दरवेळेस डावलून, लिफ्टचे दार सुरळीत उघड- बंद होईल याची जबाबदारी, कुणीही न सांगता, स्वतःवर घेतली आहे. आणि या माझ्या कर्तव्यदक्षतेची जाणीव म्हणून की काय, ही आमची लिफ्ट नचुकता, 'प्लीज क्लोज द डोअर' ही सुचना दिल्यानंतर माझ्या डायजेस्टीव सिस्टीमबद्दल, मला सल्ला देते. (डायसेसि गेट् वेयंदि... Meaning please close the door) पण दुर्दैवाने नेहमी तो सल्ला समजून घेण्याआधीच  तळ मजला येतो आणि मी लिफ्टबाहेर पाय टाकणार, तितक्यात लिफ्टच्या दारासमोर आमचा वॉचमन भुलाभाईच्या सौ ने काढलेली रांगोळी मला दिसते. आणि इथे रोजचं माझं 'वेट-लिफ्ट लेक्चर' संपून प्रॅक्टिकल्सना सुरुवात होते. तर हे पहिलं प्रॅक्टिकल म्हणजे, ही, लिफ्ट मधून बाहेर मारलेली लांब उडी. बरं उडीची लांबी कमी होऊ नये म्हणून भुलाभाईनेही सौं बरोबर इतकी दक्षता घेतली आहे की लिफ्टबाहेरच्या तिच्या रांगोळीच्या चांगल्या जाड-जुड पट्ट्यापुढे त्याने तुटलेल्या लाद्यांची एक रांग रचून ठेवली आहे. त्यावर उडी पडलीच तर आधीच तुटलेली लादी तुटल्याचं त्याला दुःख नसेल, पण त्या तुटलेल्या लाद्या हलून जो आवाज होतो ना, त्याने 'मी खाली आले' हे त्यालाच काय अख्या बिल्डिंगला कळावं, म्हणून आखलेली ती सूज्ञ योजना असावी. 

भुला भाई चं खरं नाव काय? या प्रश्नाचं उत्तर भुला भाईने स्वतः दिलं तरीही ते समजून घेण्याची आमची लायकी नसल्याने, आम्ही विल्यम शेक्सपिअर ची मदत घेतली आणि 'what's in a name' म्हणत त्याच्या नावाच्या उच्चाराला शोभेल असं, आणि आम्हाला उच्चारता येईल, असं नाव आम्ही स्वतः च त्याला दिलं. हा भुला, त्याची अती फिट बायको आणि त्यांचा पंचविशीच्या जवळपास असलेला मुलगा यांचं घर, तळमजल्यावर, तिथेच लिफ्टच्या दाराबाजूला आहे. हा आमचा वॉचमन सकाळपासून पूर्ण दिवस एक तर झोप झाली नसावी किव्वा जास्त झाली असावी तसा तारवटलेल्या डोळ्यांनी बिल्डिंगच्या आवारात कुठेतरी उभा राहुन,  मानही न हालवता  नुसते डोळे चारही दिशांना फिरवून, वॉचमनगिरी करतो. आणि त्याची बायको, त्याच्यावर लक्ष ठेवत, कायम हाय अलर्टवर असते. तिच्या खणखणीत आवाजात म्हटलेलं 'मॅडsम', म्हणजे मला 'हाक कमी आणि धमकी जास्त' वाटते. आणि केवळ त्या भीतीनेच लिफ्ट बाहेरची माझी ती उडी 'एक वेळ पाय मोडेल पण रांगोळीला धक्का लागता कामा नये', या इर्षेने लिफ्टमधून थेट आमच्या गाडीसमोर पडते. आमचं कार पार्किंग भुलाच्या दारासमोर आहे. त्यामुळे रोज माझ्या नवर्‍याच्या पार्किंग स्किल्सची अग्निपरीक्षा घेतली जाते. भुला आणि त्याची बायको रोज पार्किंग एरियात  चपला, स्टूल, तुटके स्टँड, पुठ्ठ्याचे ढीग पेरून, माझा नवरा रिव्हर्स घेऊन गाडी कशी बरोब्बर त्या सगळ्या वस्तुंच्या कोंदणात बसवतो, हे डोळ्यात तेल घालून बघत असतात. आत्तापर्यंत, गाडीच्या बंद काचे मागेही माझ्या नवर्‍याला भुलाच्या बायकोची 'सssर' ही हाक ऐकून आता ब्रेक मारलाच पाहिजे हे कारच्या रिअ(र्‌) व्ह्यू कॅमेऱ्यात बघण्याआधीच समजायला लागलं आहे. कारण नाहीतर गाडीच्या चाकाखाली आलेल्या एखाद्या फुटक्या डब्याच्या, आणखी फुटण्याची शिक्षा म्हणून, त्या वॉच वूमनच्या जहाल कटाक्षाला सामोरा जावं लागेल ही भीती त्याला आहे. 

तर...  इतकी परफेक्ट, बरोब्बर गाडीच्या समोर उडी मारूनसुद्धा, माझा काहीच फायदा होत नाही कारण हे दाम्पत्य माझ्या नवर्‍याचं ड्रायव्हिंग न्याहाळताना मलाच पुढे जाऊन बिल्डिंग गेट उघडावं लागतं. हे कदाचित माझ्यासाठी ठेवलेलं दुसरं प्रॅक्टिकल असावं. बरं इथेच ते संपत नाही तर त्या गेटसमोर रांगोळीचा आणखी जाडा पट्टा काढलेला असतो. म्हणजे मी गेट उघडताना खाली पाय न टेकता, गेटबरोबर झोका घेत एक्दम रस्त्यावर उडी मारावी, म्हणून ही शक्कल. बरं घाबरून माझ्या नवर्‍याची गाडी सुद्धा बरोब्बर रांगोळी न पुसता गेट बाहेर येते त्यामुळे मलाही उडी मारण्या वाचून गत्यंतर नसतं. 

आमच्या बिल्डिंगपासून अगदी कित्तीही लांब, गाडीने जाऊन, 'आता पाय मोकळे करू' म्हणून  खाली उतरले, तरी माझ्या लांब उड्या काही संपत नाहीत. माझ्या मते अख्खा दक्षिण भारत, 'रोज सकाळी रांगोळी स्पर्धेत भाग घेणं' आणि 'इस्रोत जाऊन शोध लावणं', हे सारख्याच सहजतेने करतो. 

मलाही कधी कधी या वातावरणात स्फुरण चढतं आत्तापर्यंतच्या माझ्या 'उडी स्किल' वर  मी स्वतः च   खुश झाले होते आणि त्यात भर म्हणून परवा चंद्रयान 3 ची झेप आणि त्याही पेक्षा, नंतर आलेले फॉरवर्ड वाचून सळसळलेलं रक्त, याच्या ओघात मी काल नवर्‍याला म्हटलं 'चल जिन्याने वर जाऊ' . तसंही लिफ्टबाहेर उडी मारण्यापेक्षा, परतताना बाहेरून लिफ्टमध्ये आत उडी मारणं, हे, मला नसलं तरी लिफ्टला घातक ठरू शकेल, याची जाणीव लिफ्ट मला हल्लीच्या लेक्चर्स मध्ये करुन देत होतीच. तर काल वर चढताना या जोशी काकू जिन्याच्या पाहिल्या पायरीसमोर आल्या, आणि स्वतःलाही कळायच्या आधी त्यान्नी उडी मारली, ती डायरेक्ट तिसर्‍या पायरीवर. आजची  सरप्राईज टेस्ट म्हणुन पाहिल्या दोन पायर्‍यांवर रांगोळी काढली गेली होती... आत्ता मॅडम बेडवर झोपून घटनाक्रमाचे सांधे जोडण्याचे प्रयत्न करत आहेत.. 

... भावना