Saturday, 26 August 2023

पीप होल...

 "अगं कित्ती कामं करशील. सगळीच कामं स्वतःवर ओढवून घेऊ नयेत. आपल्याला स्वतःसाठीही काही वेळ हवा की नको..." मी पुढ्यातलं दुसरं केळं उचलून शांतपणे सोलंत असताना माझ्यासमोर बसलेल्या आमच्या शेजारच्या काकू म्हणाल्या. त्यावेळी माझ्या हातातलं केळं आणि त्यांच्या हातात सापडलेली मी हे दोघं एकाच विवंचनेत होते. 


मला, सेफ्टी डोअर वगैरे वायफळ खर्च वाटतात. सेफ्टीच्या या प्रोलाँग्ड प्रक्रियेची पाहिली पायरी म्हणजे कोणीही दाराची बेल वाजवली की आधी ते पीपहोल नामक भोक, बुजवण्यासाठी लावलेल्या काचेतून बघणं आलं. आता बघणार्‍याला यातून काय आणि कितपत दिसतं याबद्दल भाष्य न केलेलंच बरं. एकवेळ, बा सी मर्ढेकरांच्या 'पिपात मेले ओल्या उंदीर' चा अर्थ मी सांगेन, पण पीपून बघितलेला समोरचा 'तो', ओला आहे का सुका आणि माणुस आहे का उंदीर हे मला कधीच कळलेलं नाही. मग दारा आडून सेफ्टी चेन लावून डोकावून पाहाणं आलं. मला वाटतं की आपले डोळेच इतके बोलके आहेत की, भीतीपासून, घृणा या उच्चारताही न येणाऱ्या भावनेपर्यंत सगळं जे काही आपल्या मनाला वाटणं असतं, त्याच्या बाकीच्या अवयवांबरोबर वाटण्या न करता, आपले डोळेच सगळं बोलून दाखवत असतात. मग, चेन आडून डोकावून, ते डोळे समोरच्याला दाखवून आपण समोरच्याची ओळख पटवून घेत असतो, की आपली खरी ओळख त्याला दारातच करून देतो. माझ्या बाबतीत म्हणायचं तर हा इतका सोपस्कार करायच्याऐवजी, दार पूर्ण उघडल्यावरच कदाचित, अख्खी दिसू शकणारी मी आणि अशा बेसावध क्षणी बहुतेक वेळा माझ्या हातात असलेला झाडू किंव्वा कपडे वाळत घालायची काठी, नाहीच तर आत्ताच कणिक तिंबताना वळलेल्या मुठी किंव्वा हातातलं पूर्ण पिळलेलं आणि जीव वाचवण्यासाठी धडपडणारं लादी-पुसणं, हे बघुन समोरच्याचे डोळेच, मला 'खरा 'तो' कसा आहे', हे पटकन सांगतात. 


पण तरीही या सेफ्टी फीचर्स ची मला गरज भासायला कारण म्हणजे, आमच्या शेजारच्या देशमुख काकू. या सौ चंद्रभागा दत्तात्रेय देशमुख काकूंना फक्त नावातच एका 'I' ची गरज आहे. कारण त्या CD देशमुख काकू नसून CID देशमुख काकू आहेत. आणि हा 'आय' त्यांच्या नावात नसला तरीही, त्यांच्या पासष्टी नंतरही दूरचा आणि जवळचा असे त्यांचे दोन्ही आयीज् त्यांचा 'आय'त्म विश्वास कॉलनीमधल्या प्रत्येक भानगडीगणिक वाढवत असतात. 


देशमुख काकू आणि मी यात मात्र गेले कित्येक वर्ष एक अभेद्य भिंत टिकून उभी आहे. पण ती आमच्या घरातल्या नवीन सेफ्टी फीचर्स मुळे नाही तर माझ्या नवर्‍याच्या नोकरी निमित्ताने एका जागी स्थिर नसलेल्या माझ्यामुळे. काकू आमच्या ठाण्यातल्या शेजारच्या घरात रहातात. माझ्यामते तर त्या, बिल्डिंग बांधण्यापूर्वी पासून तिथे असाव्यात. कारण बिल्डिंगच्या प्रत्येक घरातल्या मुळ मालकाच्या मनात इसवीसनापूर्वी काय होतं, इथपासून ते बिल्डिंगच्या पायाखाली काय दडलेलं आहे याची इत्थंभूत माहिती त्यांना आहे. त्या पूर्ण बिल्डिंगमधल्या प्रत्येक घरात काकूंचा स्वैर संचार आहे. चार महिन्याने जरी मी माझ्या घरात परतले तरी, इतके दिवस बंद असलेल्या माझ्या घराला मी आल्याचा सुगावा लागायच्या आधी, देशमुख काकू आमच्या घरात प्रवेश करतात. केवळ यावर उपाय म्हणूनच मी, माझ्या नवर्‍याच्या घराच्या जुन्या दाराला पीपहोल आणि बाहेर एक सेफ्टी डोअर बसवून घेण्याच्या निर्णयला संमती दिलेली. त्यामुळे मी त्याला सोडून ठाण्यात एकटी आले की बायकोपासून लांब असुनही आपण तिचं रक्षण वगैरे करतो आहे हे फील नवर्‍याला आनंद देत असेल पण ते दार काकूंना काही अडवू शकालं नाही. कितीही पहाटे आणि वॉचमनच्या झोपेच्या वेळेत जरी मी आमच्या ठाण्याच्या घरी गुपचूप आले तरीही, काकूंना माझ्या येण्याचा सुगावा लागतोच आणि दरवाजाची बेल वाजल्यावर काकूंना दाराबाहेरुन, पीपहोल मागचा माझा डोळाही दिसतो. त्यामुळे दार न उघडता तसंच मागे फिरण्याचा विचार जरी मी केला, तरी काकू आणखी दोनदा बेल वाजवतात. 


आज तर त्यांनी मला सेफ्टी डोअर पुसतानाच पकडलं. एकतर आदल्याच दिवशी ट्रेनने केलेला तेरा तासांचा प्रवास, त्यात सकाळपासून उपाशी पोटीच सुरू केलेली स्वच्छता मोहीम आणि गेला एक-दीड तास काकूंची माझ्याप्रति अती आस्थेने सुरू असलेली चौकशी, यामुळे मी आता तिसरं केळं उचललं...

"आता आजच बघ, हे सगळं घरकाम तुला कशाला करायला हवं? मी म्हणते बाई ठेवायला काय होतं?? ....... पगार तर बराच असेल ना नवर्‍याचा???" 

...आपल्या बोलण्यात जागोजागी असे बरेच सेनसीटीव प्रश्न पेरून काकूंची माहिती यंत्रणा डेटा गोळा करत असते. पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. 'केळ्याने भुक भागात आहे रे, आणखी केळीची पाहिजे' म्हणत मी जिभेवर ताबा मिळवला होता. 


"मोलकरीण सांभाळून ठेवणं हेही जमलं पाहिजे बाईला..".... काकूंनी भात्यातला आणखी एक बाण काढला. आणि इथे मी, संपलेलं तिसरं केळं आणि माझ्या कर्तुत्वावर घेतली गेलेली शंका, यामुळे रागाने उफाळून तोंड उघडलं...

"मोलकरीण न टिकायला कारण मी नाही, नवरा आहे माझा..." 

..... का माहीत नाही पण माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच काकू अचानक उठून गेल्या. खरंतर पुढे मी, माझ्या नवर्याच्या फिरतीच्या नोकरीबद्दल आणि त्यामुळे नक्की कुठच्या घरात मोलकरीण ठेवावी या माझ्या नसुटणार्‍या त्रांगड्याबद्दल त्यान्ना बरीच माहिती देणार होते. 


असो....... पण आता इथल्या लोकांमध्ये बरेच बदल झाले आहेत. यावेळी तर वॉचमनने झोपेतून उठून चक्क मला सलाम ठोकला आणि नसांगता माझ्या हातातली बॅग हिसकावून घेऊन दारापर्यंत आणुन दिली. मी विचार केला दिवाळीचे वेध याला श्रावणापासूनच लागले का काय. ते एक वेळ परवडलं पण काहीही नघडता हल्ली सगळी बिल्डिंग माझ्याकडे फारच सहानुभूतीच्या नजरेने का बघत असते याचं कोडं काही सुटलेलं नाही... 


... भावना

Thursday, 24 August 2023

हेल्थ कॉन्शस...

'माझं समाजात वाढलेलं वजन', हा अंतरराज्यीय प्रश्न झाला असून तो, 'मराठी तेलुगु भाई-भाई' धोरणांतर्गत तातडीने सोडवण्याचा फतवा निघाला असावा, अशी शंका मला सध्या येते आहे. कारण, माझा नवरा तर मिळेलत्या कारणाने मला घराबाहेर काढण्यासाठी आधीपासूनच उत्सुक होता, पण सध्या आता इथे, आमच्या हैद्राबादच्या घराबाहेर पडल्या-पडल्या, 'मी आणि माझे प्रकृतीला घातक वजन' यासाठी पूर्ण प्रकृति च झटंत आहे. 

इथे आमच्या दाराबाहेरंच बिल्डिंगची लिफ्ट आहे. म्हणजे तसा आमचा तिसराच मजला आहे पण  वस्तू वापरात राहिल्या म्हणजे त्यांना गंज चढत नाही, म्हणून मी घराचे दार आणि लिफ्ट यामध्ये असलेल्या पायर्‍या दरवेळेस डावलून, लिफ्टचे दार सुरळीत उघड- बंद होईल याची जबाबदारी, कुणीही न सांगता, स्वतःवर घेतली आहे. आणि या माझ्या कर्तव्यदक्षतेची जाणीव म्हणून की काय, ही आमची लिफ्ट नचुकता, 'प्लीज क्लोज द डोअर' ही सुचना दिल्यानंतर माझ्या डायजेस्टीव सिस्टीमबद्दल, मला सल्ला देते. (डायसेसि गेट् वेयंदि... Meaning please close the door) पण दुर्दैवाने नेहमी तो सल्ला समजून घेण्याआधीच  तळ मजला येतो आणि मी लिफ्टबाहेर पाय टाकणार, तितक्यात लिफ्टच्या दारासमोर आमचा वॉचमन भुलाभाईच्या सौ ने काढलेली रांगोळी मला दिसते. आणि इथे रोजचं माझं 'वेट-लिफ्ट लेक्चर' संपून प्रॅक्टिकल्सना सुरुवात होते. तर हे पहिलं प्रॅक्टिकल म्हणजे, ही, लिफ्ट मधून बाहेर मारलेली लांब उडी. बरं उडीची लांबी कमी होऊ नये म्हणून भुलाभाईनेही सौं बरोबर इतकी दक्षता घेतली आहे की लिफ्टबाहेरच्या तिच्या रांगोळीच्या चांगल्या जाड-जुड पट्ट्यापुढे त्याने तुटलेल्या लाद्यांची एक रांग रचून ठेवली आहे. त्यावर उडी पडलीच तर आधीच तुटलेली लादी तुटल्याचं त्याला दुःख नसेल, पण त्या तुटलेल्या लाद्या हलून जो आवाज होतो ना, त्याने 'मी खाली आले' हे त्यालाच काय अख्या बिल्डिंगला कळावं, म्हणून आखलेली ती सूज्ञ योजना असावी. 

भुला भाई चं खरं नाव काय? या प्रश्नाचं उत्तर भुला भाईने स्वतः दिलं तरीही ते समजून घेण्याची आमची लायकी नसल्याने, आम्ही विल्यम शेक्सपिअर ची मदत घेतली आणि 'what's in a name' म्हणत त्याच्या नावाच्या उच्चाराला शोभेल असं, आणि आम्हाला उच्चारता येईल, असं नाव आम्ही स्वतः च त्याला दिलं. हा भुला, त्याची अती फिट बायको आणि त्यांचा पंचविशीच्या जवळपास असलेला मुलगा यांचं घर, तळमजल्यावर, तिथेच लिफ्टच्या दाराबाजूला आहे. हा आमचा वॉचमन सकाळपासून पूर्ण दिवस एक तर झोप झाली नसावी किव्वा जास्त झाली असावी तसा तारवटलेल्या डोळ्यांनी बिल्डिंगच्या आवारात कुठेतरी उभा राहुन,  मानही न हालवता  नुसते डोळे चारही दिशांना फिरवून, वॉचमनगिरी करतो. आणि त्याची बायको, त्याच्यावर लक्ष ठेवत, कायम हाय अलर्टवर असते. तिच्या खणखणीत आवाजात म्हटलेलं 'मॅडsम', म्हणजे मला 'हाक कमी आणि धमकी जास्त' वाटते. आणि केवळ त्या भीतीनेच लिफ्ट बाहेरची माझी ती उडी 'एक वेळ पाय मोडेल पण रांगोळीला धक्का लागता कामा नये', या इर्षेने लिफ्टमधून थेट आमच्या गाडीसमोर पडते. आमचं कार पार्किंग भुलाच्या दारासमोर आहे. त्यामुळे रोज माझ्या नवर्‍याच्या पार्किंग स्किल्सची अग्निपरीक्षा घेतली जाते. भुला आणि त्याची बायको रोज पार्किंग एरियात  चपला, स्टूल, तुटके स्टँड, पुठ्ठ्याचे ढीग पेरून, माझा नवरा रिव्हर्स घेऊन गाडी कशी बरोब्बर त्या सगळ्या वस्तुंच्या कोंदणात बसवतो, हे डोळ्यात तेल घालून बघत असतात. आत्तापर्यंत, गाडीच्या बंद काचे मागेही माझ्या नवर्‍याला भुलाच्या बायकोची 'सssर' ही हाक ऐकून आता ब्रेक मारलाच पाहिजे हे कारच्या रिअ(र्‌) व्ह्यू कॅमेऱ्यात बघण्याआधीच समजायला लागलं आहे. कारण नाहीतर गाडीच्या चाकाखाली आलेल्या एखाद्या फुटक्या डब्याच्या, आणखी फुटण्याची शिक्षा म्हणून, त्या वॉच वूमनच्या जहाल कटाक्षाला सामोरा जावं लागेल ही भीती त्याला आहे. 

तर...  इतकी परफेक्ट, बरोब्बर गाडीच्या समोर उडी मारूनसुद्धा, माझा काहीच फायदा होत नाही कारण हे दाम्पत्य माझ्या नवर्‍याचं ड्रायव्हिंग न्याहाळताना मलाच पुढे जाऊन बिल्डिंग गेट उघडावं लागतं. हे कदाचित माझ्यासाठी ठेवलेलं दुसरं प्रॅक्टिकल असावं. बरं इथेच ते संपत नाही तर त्या गेटसमोर रांगोळीचा आणखी जाडा पट्टा काढलेला असतो. म्हणजे मी गेट उघडताना खाली पाय न टेकता, गेटबरोबर झोका घेत एक्दम रस्त्यावर उडी मारावी, म्हणून ही शक्कल. बरं घाबरून माझ्या नवर्‍याची गाडी सुद्धा बरोब्बर रांगोळी न पुसता गेट बाहेर येते त्यामुळे मलाही उडी मारण्या वाचून गत्यंतर नसतं. 

आमच्या बिल्डिंगपासून अगदी कित्तीही लांब, गाडीने जाऊन, 'आता पाय मोकळे करू' म्हणून  खाली उतरले, तरी माझ्या लांब उड्या काही संपत नाहीत. माझ्या मते अख्खा दक्षिण भारत, 'रोज सकाळी रांगोळी स्पर्धेत भाग घेणं' आणि 'इस्रोत जाऊन शोध लावणं', हे सारख्याच सहजतेने करतो. 

मलाही कधी कधी या वातावरणात स्फुरण चढतं आत्तापर्यंतच्या माझ्या 'उडी स्किल' वर  मी स्वतः च   खुश झाले होते आणि त्यात भर म्हणून परवा चंद्रयान 3 ची झेप आणि त्याही पेक्षा, नंतर आलेले फॉरवर्ड वाचून सळसळलेलं रक्त, याच्या ओघात मी काल नवर्‍याला म्हटलं 'चल जिन्याने वर जाऊ' . तसंही लिफ्टबाहेर उडी मारण्यापेक्षा, परतताना बाहेरून लिफ्टमध्ये आत उडी मारणं, हे, मला नसलं तरी लिफ्टला घातक ठरू शकेल, याची जाणीव लिफ्ट मला हल्लीच्या लेक्चर्स मध्ये करुन देत होतीच. तर काल वर चढताना या जोशी काकू जिन्याच्या पाहिल्या पायरीसमोर आल्या, आणि स्वतःलाही कळायच्या आधी त्यान्नी उडी मारली, ती डायरेक्ट तिसर्‍या पायरीवर. आजची  सरप्राईज टेस्ट म्हणुन पाहिल्या दोन पायर्‍यांवर रांगोळी काढली गेली होती... आत्ता मॅडम बेडवर झोपून घटनाक्रमाचे सांधे जोडण्याचे प्रयत्न करत आहेत.. 

... भावना

Sunday, 20 August 2023

शांत

मी शांत राहुन शांत होईन 

शांत झोप मला तुला


केलेल्या प्रत्येक कृतीचा 

हिशोबच चुकला 


मी लांब राहुन जगेन 

तेच जगवेल मला


जगण्यातल्या छोट्या मोठ्या 

मरण यातना ठेवते बाजुला


मी निराश होउन संपवेन

विचार हा तुम्ही केला


जगणं हे नाहीच नव्हतेच

अर्थ जरा उशीराच कळला


.... भावना

शोध

मी शोधंत होते 

शोधंत आहे

पण कुठे आणि काय


समोर दिसतोय नुसताच आकार 

पण त्यात माणुस कुठंय 


जगात येताच 

रडु लागले मोकलून धाय

तेंव्हाच होतं माहित 

काय फोल आणि आभासी काय 


सत्य नाही दडलेलं 

त्याला मीच ताटकळंत ठेवलंय


मी शोधंत गेले 

शोधंत राहिले 

मिळालंही... पण ते आधीच संपलंय


समोर दिसलं प्रेम 

पण त्याच्या सुरुवाती आधीच शेवट सापडलाय 


.... भावना

स्वप्न

 छोटंय का मोठंय म्हणतो

त्याच स्वप्न खोटंय


स्वप्नाला नसते परिमिति

क्षेत्रफळाची नसते भूमिती


ते उडतं आपल्याच नादात 

ना तुझं-माझं च्या वादात


ते कुढंत नाही 

ते लुडबुडंत नाही 

ते विहरत राहतं

कधीच खाली पडत नाही


कधी ते गाव बदलतंं

कधी ते नाव बदलतं

तरीही त्याला नसतो पत्ता 

ते फक्त पेहराव बदलतं 


नसतो आकार 

तरीही  दिसतं

नसतं हातात 

तरीही  हसतं 


त्याचा दरवळ खोलवर पसरतो 

वारा लागत नाही 

त्याच्या नादात तो सारं विसरतो 

खेरीज संस्मरणीय काहीच घडंत नाही 


... भावना

कुरुमुर्थी

 दर रविवारी सकाळी, दारात 'दत्त' न-म्हणता नुसताच येऊन उभा राहाणारा कुरुमुर्थी, या रविवारी सकाळी सुद्धा हजर झाला. 


जिथे वर्षानुवर्ष राहतो तिथे आपण इतके सेट होतो की आपल्याला वाटतं अख्या जगात फक्त इथेच सगळ्या सोयी सुविधा आहेत. आणि मग ते सोडून सगळा संसार दुसरीकडे जाऊन उभारणं याचा विचारही आपल्याला करवंत नाही. यात आपल्या भोवतालची ती असंख्य माणसंही आली, जी कधी समोरचा इस्त्रीवाला बनून, नाहीतर खालचा भाजीवाला बनून आपल्या आयुष्याचा एक भाग होतात. ज्यांना काही पर्याय असू शकेल अशी शंकाही मग कधी आपल्याला शिवत नाही. 


पण तरीही... आम्ही हैदराबादला आलो.. हे जमलं कारण बर्‍याच वर्षांपूर्वी ओमानला जाऊ म्हणून पाठीवर घेतलेलं घर आम्ही अजून खाली ठेवलंच नाही. तर झालं असं की आम्ही आधी इथे आलो आणि मग विचार केला की आलोच आहोत तर इथे जगतात कसं ते बघू... 


आणि सुरुवात झाली ती डिमार्ट आणि स्टार या अत्यावश्यक सेवांपासून. डिमार्ट निअर मी, स्टार निअर मी, हे बोटं चालवून शोधल्यावर आम्ही एकमेव रविवारच्या सुट्टीत कार चालवत रस्त्यातले खड्डे, ट्रॅफिक, पार्किंग हे सगळे गड सर करून इथल्या स्टार च्या रॅक वरची आम्हाला हवी असलेली वस्तू गर्दीतून आरपार अचूक शोधून काढणं सुरू केलं. 


पण मग असे दोन रविवार खड्ड्यात घातल्यावर लगेचच,  ऑनलाईन ऑर्डर करून सगळ सामान घरीच आणावं यासाठी माझी बोटं शिवशिवायला लागली.


आणि नंतरच्या रविवारी सकाळी दारात उभा राहीला तो कुरुमुर्थी.... 


दारात आलेल्या माणसाशी दोन शब्द बोलावेत म्हणून मी कुरुमुर्थी बरोबर दोन शब्द बोलतेच. एक म्हणजे 'हिंदी' आणि दुसरा म्हणजे 'थँक्यू' 


'हिंदीत बोल' हे हिंदी न बोलणाऱ्या माणसाला कसं सांगायचं ते मला अजून जमलेलं नाही. पहिले दो-तीन रविवार कुरुमुर्थी आल्याआल्या नचुकता त्याच्या भाषेची ट्रेन सुरू करायचा. आणि मग माझा 'हिंदी हिंदी' चा नारा ऐकून थोड्यावेळाने त्याचा ब्रेक लागायचा. नंतर फक्त भरतनाट्यम. 


"भाजी जरा ताजी नाही का आणता येत?"


 "इतका कडिपत्ता काय थापू नवर्‍याच्या डोक्यावर!... त्यापेक्षा या मरगळलेल्या मेथीच्या चार काड्यांना आणखी चार सोबती बरोबर आणले असतेस तर!!... "


"मासे काय फक्त गोड्या पाण्यात असतात का रे? समुद्र बघायला ये एकदा आमच्याइकडे मग कळेल, मासे कुठचे खायचे ते.."


"कोकम, गोडा मसाला तुमच्या हैद्राबादी स्टार App वर नाही... App अपडेट करायला सांग जरा त्यान्ना..."


..... हे सगळं मी आता फक्त डोळ्यांनी बोलू शकते. लवकरच तुम्हाला माझ्या अरंगेत्रम् चं निमंत्रण येईल... नक्की या बरं… 


.... भावना