Thursday, 23 April 2015

अट्टाहास...


पृथ्वीलाही आकाराचे बंधन मग पडले
कल्पनेला अमूर्ताचे का जोखड वाटले?

 
अज्ञाताच्या अमर्याद पटावर
कला सुंदर, लाघवी

मोडू नको हि भ्रम समाधी
ध्यानस्थ तेज अनुभवी

 
जे नव्हते माहित तुला तू का उकलले?
कल्पनेला अमूर्ताचे...

 
अट्टाहासी विज्ञानाने
ऱ्हास हा मांडला

सूर सुखाचा शोधताना
स्वरही सांडला

 
निसर्गाने शालीन राहून खूप सोसले
कल्पनेला अमूर्ताचे...

 
अज्ञानाच्या काळोखात
ज्ञान ज्योत तर हवी

अखंड सांगड बांधाया पण
संवेदना तेवत ठेवी

 
शोधिसी अंत पुन्हा पुन्हा, ते तर सत्य नहरले
कल्पनेला अमूर्ताचे का जोखड वाटले?

 
...भावना

Wednesday, 22 April 2015

कुसुमाग्रज


नको हिशेब विचारू आता...


दिल्या क्षणांच्या वैफल्याचे
भार कधी उतरू

नको हिशेब विचारू आता, नको हिशेब विचारू



कथुनि काय सांगू तुजला
दिला जन्म येथे थिजला

थकुनि देह आहे निजला
वेड कसे पांघरू  

नको हिशेब विचारू...

 
एकच मार्गे गेलो आपण
परी न उरले इथे ऋषीपण

नाही मंत्र न धनुष्यबाण
पडझड कशी उभारू

नको हिशेब विचारू...

 
वनात पुष्पे तुझ्या पाऊली
धरी न आता कुणी साऊली

चार टिपे हि नाही गळाली

दुःख कसे सावरू
नको हिशेब विचारू...

 
यत्न होता मी पण केला
स्वार्थ त्यागला, भला आपला

नाही जयंती न पुण्य तिथीला
शून्यच बाकी धरू  

नको हिशेब विचारू आता नको हिशेब विचारू...

 
...भावना

Thursday, 16 April 2015

जीवन म्हणजे...


ओंजळीतल्या प्रतिबिंबातच, चंद्र शोधीत
रमले मन की जोजविले मी,  अजाण मानीत


मध बोटाचे चाटत त्याची, सरे आता रात
खुशीत मी हि गुंडाळले,  ते नाइलाज शांत


मान बाजूला वळे कधी, कडेकोट बंदोबस्त  
बोळा कानामध्ये, ऐकण्या कोणी नसे आर्त     


कशी तेवत राहील, इथली स्वयंस्फूर्ती ज्योत
जीवन म्हणजे, जगणे नुसते फुका संभ्रमात

...भावना

Wednesday, 8 April 2015

बरंच काही...


बरंच काही साचत गेलं
कधी काढून टाकता आलंच नाही

मन मोठं म्हणता म्हणता
रिकामी जागाच उरली नाही

 
तिथेच मग झाले अनेक कप्पे
आतल्या गोष्टींची जागा ठरत गेली

बारीक-सारीक तपशिलासकट
रेटिंग सिस्टीम घडत गेली

 
नवीन आलेला प्रत्येक अनुभव आता
ठरलेल्या सिक्युरिटी चानल मधून येतो 

अतिदक्षता विभाग सध्या
ताक फुंकून प्यायला देतो

 
...भावना

C T Khanolkar


Tuesday, 7 April 2015

राहूनच गेलं...


खूप दिवसांनी लक्षात आलं
खळखळून हसायचं राहूनच गेलं

डोळ्यात पाणी येईपर्यंत हसणं काय असतं
अनुभवायचं, दाखवायचं राहूनच गेलं  

 
खूप दिवसांनी लक्षात आलं
मनसोक्त हुंदडायचं राहूनच गेलं

सोनेरी गवत, चंदेरी पाणी अवेळीच दिसतं
सांगायचं, शोधायचं राहूनच गेलं  

 
खूप दिवसांनी लक्षात आलं
भरभरून बोलायचं राहूनच गेलं

तुझ्यात माझ्यात अंतर नसतं
बोट धरून एकत्र चालायचं राहूनच गेलं

...भावना

निरागस


Thursday, 2 April 2015

अशा ठिकाणी एक घर असावं...


अशा ठिकाणी एक घर असावं
स्वप्नात आणि वास्तवात अंतर नसावं

 
शांतता मनसोक्त ऐकू यावी
एकाग्रता मनाची मनातच असावी

 
चित्रकाराच्या हातांना उसंत नसावी
कवीला ठायी ठायी प्रेरणाच दिसावी

 
गाणं सूर सोबत घेऊनच जन्मावं
समाधान सतत गुणगुणत रहावं

 
दैवत्व देव्हाऱ्यात बंदिस्त नसावं
अशा ठिकाणी एक घर असावं

...भावना