संवेदनाहीन संवाद
अख्या दिवसातले,
उगाचच....छोट्या-छोट्या गोष्टीतले वाद
शोधावी म्हटलं एखादी शांत खोली
बातमी खोटी आहे हो ती,
मी नाही तुम्हीच आत्महत्या केली
तसं हे इतकं काही चटकन
ठरवलं नाही बरं!
अनेक वेळा ठोठावलं
पण...
तेंव्हा तुमचीच बंद होती दारं
दोष देत नाही हं पण...
आधी कधी जाणवलीच नाही ना तुम्हाला
हि पापणी ओली!
आता तरी जाणवलं का? मी नाही तुम्हीच आत्महत्या केली
काय म्हणता!
बातमीत नाव, पत्ता
ओळखीचा वाटला नाही?
असू दे कि, पण...
आपण माणसंच, किती जवळचं नातं,
म्हणून आत्ताही कंठ दाटला
नाही??
हेच तर ते लक्षण आहे,
ज्याची कधी तुम्हाला जाणीवच नाही झाली
अहो.........मी नाही तुम्हीच आत्महत्या केली
कालपर्यंत मीही
...याच बातम्यांवर ठेवला होता कि विश्वास!
पण आज हसू आलं,
जेंव्हा...............कंठाशी रेंगाळत होता
श्वास
वाटलं
उद्या कदाचित तुम्हालाच खोलवर धगधग जाणवेल
........बंद डोळे, कान उघडणारा एखादा दिवस उगवेल
इथला पत्ता ठेऊ का?
तुम्हीही जागे व्हाल,
बघा... माझी आशा कधीच नाही मेली
बातमी खोटी आहे हो ती,
....मी नाही तुम्हीच आत्महत्या केली
...भावना