Thursday, 25 August 2016

#दहीहंडी


चारोळी…7



'काहिच घडत नाही', त्यानी तक्रार केली 

देवळा बाहेर त्याची चप्पल चोरीला गेली


----------------------------

चार पावल पुढे जाताना
दोन पावल मागे सरत 

बहुदा नात्याला पुढे जायला
थोडस अंतर खूप वेळ पुरत

----------------------

हात दिले आहेत ते दुसऱ्याचे अश्रू पुसायला
उगाच उगारताना घाल आवर

मनामध्ये विवेकबुद्धी नांदु दे
सत्शीलतेचा असु दे वावर 

------------------------------

जातोय काळ, वाजतोय घड्याळाचा एकेक टोला 

आम्ही फक्त हो म्हणतोय त्याच्या हो ला 

....
भावना




जन्माला आलं
त्याचं रडू फुटेना
कुणी चिंतेत
कुणा काहिच वाटेना

कुणी नेली माया त्याची
पांघरण्याआधी ओरबाडुन
कुणी त्याला पांघरले
स्वतःला उघडं पाडुन

जन्माला आलं
त्याला रडू फुटलं
दोन्ही डोळे मिटलेले
त्याला  काय असेल वाटलं

... भावना

एक बाळ,एकीकडे ज्याची आई त्याला जन्म द्यायच्या आधी अमानुष बॉम्ब हल्ल्यात जवळ जवळ ठार झालेली  आणि  दुसरीकडे कुणा अनोळखी डॉक्टरची  ते जन्माला यावं यासाठी धडपड.

माणुस नेहमी अशा दोनही बाजू घेउन जन्माला येतो. त्याच्या भुतकाळाच्या  त्या दोनहि गोष्टी अविभाज्य घटक असतातमग तो काय विचार करुन भविष्यात वागताना त्यातली एक बाजू निवडत असावा!?!

क्षण इतका मोठा यावा …


क्षण इतका मोठा यावा 
मी कितीतरी लहान, तो सर्वांचा व्हावा II

ते मोठेपण आहे त्याचे 
हे काम नाही तुमचे-आमचे 
निमित्ताला मात्र माझाच लागो सुगावा

क्षण इतका मोठा यावा 
मी कितीतरी लहान, तो सर्वांचा व्हावा II

मन थोडे स्वार्थी व्हावे 
स्वहस्तेच ध्वज उचलावे
डौलाने फडकेल तो जेव्हा 
त्या मान तयाचा द्यावा

क्षण इतका मोठा यावा 
मी कितीतरी लहान, तो सर्वांचा व्हावा II

....भावना 


शेतकर्याचे आत्मवृत्त


सकाळीच सावकाराची माणस चांदीला ओढत घेउन गेली. चार अजाण पोर, एक खपाटीला गेलेल म्हातर पोट आणि हातावर हात धरुन बसण्याखेरिज काहिच करु शकणारे आम्ही दोघ. चांदीला सगळ्यांची काळजी. एकच दुभती गाय, पण ती ही आज नेली.
पाच वर्ष झाली, बियाण आणायलाहि हातात रक्कम शिल्लक नव्हती आणि सावकाराची पायरी चढावी लागली. तसा माझा फाटका  संसार, ठिगळ जोडायला सावकाराच तोंड बघावच लागत. पण यावेळी निकड जरा जास्त होती. आंगठा लाउन पैसे उचलले, अजुन हिशोब मिटत नाही. व्याजाची रक्कमच फिटली नाही अजूनही. आता आम्ही अडाणी, आकडेमोड जमणार कशी. दोन वेळच पोटात ढकलायला काहि शिल्लक नाही. अक्षर गिरवायची हौस परवडणार कशी.
पोर समजुतदार मोठी धाकट्यान्ना सांभाळतात. त्यांच्या आईला चुलीवर मदत करतात. पण शिक्षण हव. आमच्यासारखी गुलामगिरी नको.
आमच बेभरवशाच जगण. आजानी खपुन जमिनीचा तुकडा घेतला. त्यावर जेमतेम भागायच, पण जमिन आपली होती. पुढे बापाचे हात राबराब राबले पण नशिबाची साथ नाही. तीन वर्ष दुष्काळानी पाण्याचा थेंब बघु दिला नाही. शेवटी डोळ्यातली आसव ही संपली. होती-नव्हती जमीन गेली. आता दिवसाच्या मजुरीवर पोट.
सरकारची लोक वर्षातुन एकदा येतात. एखादा हंडा, एखाद लुगड हातात पडत आणि भरिला ढिगभर नुसती स्वप्न. तरी इमान सोडल नाही. या मातीतला जन्म आमचा, तिचीच सेवा घडावी. हे सोडुन शहरात काम शोधायला गेलो नाही.
आज ना उद्या पाझर फुटेल नशिबाला. पोर आताशा अंगणवाडीत जातात. एक ताई समाजसेवा म्हणुन लेकरान्ना शिकवते. दोन मुठ तांदुळ तिला नेउन देतो. अशी देव माणस जगायला हवी.
यंदाच्या वर्षीचा दुष्काळ खूप भीषण. आठ वर्षापूर्वी परत मिळवलेला जमिनीचा तुकडा पावसाची वाट बघुन थकला. बाजुच्या शेतावर मजुरीच काम मिळेना. कधी कधी  जीव नकोसा होतोपरवा खुंटीवरचा दोर उचलुन झाडावर बांधुन आलो. पण हे हात हरले तर मग तुमची पोट भरणार कशी? हे, त्याच वेळी मनात आल आणि पाय माघारी फिरले ते कायमचे. आता  भविष्य आणखी कितीही भेगाळल तरी हे हात राबतील. तुमच्या तोंडात घास द्यायचा वसा असाच चालू राहिल.
"दोन हातानी, विश्वाला रांधायची होती भूक
पोर तरिही रहातील उपाशी हीच रुखरुख"

प्रसन्न तुलाच भूमाता 
पांग फेडिलेस सर्वार्था 
प्राणीमात्रांचा कैवारी तू 
तूच अमुचा अन्नदाता

सुखे पेरलिस आसवे 
मोत्यांचे फुलतील ताटवे 
घन आनंदच बरसतील 
दु:स्वप्न संपु दे आता 
प्राणीमात्रांचा कैवारी तू 
तूच अमुचा अन्नदाता


 .........भावना

Sunday, 21 August 2016

एक कप चहा...

खिडकीतून डोकावणार आणि बेडवरच बसुन बघितलेल सकाळच कोवळ उन आणि नवऱ्याने हातात आणुन दिलेला एक कप चहा. बस इतकच भरपूर आहे आठवडा संपून सुट्टी आली हे सांगायला.

चहा हा माझ्या 'नरो वा कुंजरो वा' यादीत मोडतो. म्हणजे हवाच, अस कधीच नसत पण समोर आला तर  ' आता आणलाच आहे म्हणुन संपवावा ' असा आविर्भाव नसतो, तर त्या चहाला आणि देणाऱ्याला त्याचा पूर्ण मान मनापासून दिला जातो. मी लहानपणी दूध प्याव म्हणुन माझ्या आईला,' चहा प्यायल्याने काळ व्हायला होत ', अस काहि मला सांगाव लागल नाहि. कारण दुध मला अतिशय प्रिय. त्यामुळे त्यात बोर्नव्हिटा घाल, हॉर्लेक्स घाल असे चोचलेही पुरवावे लागले नाहित. तरिहि चहाची ओळख झालीच ती म्हणजे ' टोस्ट खाणार बुडवुन की खारी बिस्किट हव?' यानी.

सगळ्यात आधी ग्लूकोज बिस्किट आल. त्यावरच बोट चाटणार बाळ बहुतेक चहातुनच बिस्किट खात असाव, म्हणुनच त्याची बोट बरबटली असणार. पण ती मजा वाटायची. ग्लूकोज बोस्किट चहात बुडवुन मोडता बाहेर काढुन खाता आल की  आपण मोठे होउ, अस मला तेव्हा वाटायच. नंतर पटल ते बुडवल्याच नाटक करायला मोठच व्हाव लागत. आणि तरिहि एखाद्या बेसावध क्षणी ते बिस्किट मोडुन चहात पडलच तर मग आली का पंचाईत! शेवटी मग तो कप माझा होता हे कळुच देण हाच एक मार्ग. म्हणजे पटकन उठून सगळे कप आपणच गोळा करायचे. ही समयसूचकताही वयानुसारच येते

असो, तर त्यानंतर आल ते मारी बिस्किट. बशीत बिस्किट ठेवल, बरोब्बर हवा तेवढा चहा ओतला, कि ते बिस्किट आपला परिघ वाढवुन दाखवायच. हा माझा आवडता खेळ. त्यामुळे  ग्लूकोज बिस्किटा इतक हे गोड नसल तरि या उद्योगाने याची मला गोडी लावली

मग ओळख झाली ती मस्का खारीची. ते आणखी हव म्हणुन आईला सारखा-सारखा मस्का मारायचा मोह व्हायचा. त्याचे पापुद्रे अलगद कुस्करता वेगळे करुन, आपण अनेक खारी बिस्किट खाल्लीहे मीच मला फुशारकी मारुन सांगायचे

नंतर आल ते बटरहे खूप कडक, ते कोणाला आवडु शकेल  याची जाणीव त्यालाही नसावी बहुदा, इतक ते कोरड. पण आपल अंग फुगवुन दाखवुन, बेडकिने जितक आपल्या पिलाना आश्चर्यचकित केल नसेल, तितक यानी मला भारावल. किती म्हणुन खुमखुमी, कपभर चहा डोक्यावर ओतला तरी तो पिउन हे आपल फुगत जायच

खरखरीत टोस्टच आणि माझ तेव्हा फार काहि सख्य झाल नाही. पण आता मात्र त्याच्या ' फार नरमहि होणार नाही आणि नको तेव्हा मोडणार तर अजिबात नाहि' या धोरणामुळे, कुणाकडेहि चहाला गेले कि टोस्ट उचलला जातो.

व्वा! आईच्या हातच्या चहाची आठवण झाली. त्यात त्या चहाला महात्म्य आणल ते या मंडळीनी आणि अर्थात सगळ्याच्या मागे असलेल्या आईच्या हातानी

आणि मग कळली ती सकाळी मस्त हातात आणुन दिलेल्या चहाची एकत्र अनुभवलेली चव. "तू तुझ्या कपातला संपवलास? माझ्यासाठी ठेवलाही नाहिस!" हे वाक्य जेव्हा त्या हातातल्या कपानी पहिल्यांदा ऐकलत्यानंतर मात्र आतला चहा कधी आधी संपला नाही, आणि तितकावेळ गरमहि राहिला. झोप सुध्दा वाट बघत रहायची, म्हणजे केव्हा कपाचा आवाज होउ दिल्याचा आवाज येइल आणि मी गाढ झोपेत आहे याचा मला आनंद होइल, यासाठी ती उत्सुक असायची.

सगळ भूतकाळात सांगते आहे, याचा अर्थ तो चहा आटलेला आहे असा अजिबात नाही. हो, हे मात्र खर कि वर्तमानाने शाश्वती कमावली असली तरी त्या चहाच्या नशिबी मात्र बरेच चटके आले आहेत. विक एण्ड हा खरोखरच विक होत जाउन त्याचा एण्ड झाला आहे. चक्कचक्क त्या हक्काने जगण्याच्या एका दिवसावरही मिटिंग नावाच्या सटवीने हक्क सांगायला सुरुवात केली आहे.असो...

परवा आईकडे गेलेले. "चहा घेणार का?" बाबान्नी विचारलबाबा आता रिटायर्ड आहेत. आता मला आईकडे हमखास बाबांच्या हातचा चहा मिळतो. खारी, ग्लुकोज काहि लागतही नाही

या वयात, चहा बनवतानाही बाबांचा उत्साह आणि आईच्या चेहर्यावरच समाधान, मला मात्र हल्ली भविष्यातल्या चहाच्या चवीची ओढ लाउन जात हे नक्की.
 
...
भावना