आज
खरेदी करायचा मूड होता. खूप दिवस बाजूला पडलेली खरेदी, म्हणजे तसं विशेष काही नाही.
एक नॉन-स्टिक तवा घ्यायचा होता. जुन्या तव्याचा वर्ख कधीच निघून गेला होता. त्याच्यावर
टाकलेला प्रत्येक डोसा व्यवस्थित तेल पीत होता आणि तरीही फार हट्टानी तव्यावरून सोडवावा
लागत होता.
हल्ली
एखादी छोटीशी गोष्ट जरी विकत घ्यायची असली तरी मॉल ला पर्याय नाही. मी माझ्या नेहेमीच्या
सवई प्रमाणे मॉल मध्ये शिरताना एक मोठ्ठी ट्रोंली घेतली. खर्च वाचवताना नसला तरीही
खर्च करताना मी भविष्याचा विचार नेहेमीच करते. त्यामुळे आलोच आहोत तर अशीच एखाद-दुसरी
खरेदी होऊ शकेल म्हणून मी ट्रोंली घेऊन ठेवलेली.
माझी
आणखी एक चांगली
सवय म्हणजे मी
कुठचीही वस्तू विकत घेण्या
आधी त्याच्या वर
लिहिलेल्या सूचना, कुठे बनली
आहे, कशी बनवली
आहे इत्यादी गोष्टी
कितीही अगम्य असल्या तरीही
मनापासून बघते. आज अशीच,
मी माझा भावी
नॉन- स्टिक तवा
निवडण्यात, व्यग्र होते आणि
माझ्या लक्षात आलं माझी
ट्रोंली गायब झालेली.
रिकामी का असेना
पण मी ती
स्वकष्टांनी इथपर्यंत आणलेली!
स्वतःचं
खूप काहीतरी गमावल्या
सारखी कावरीबावरी होऊन
मी आजूबाजूला बघितलं.
माझ्या बाजूलाच एक सहा
फुटापेक्षा उंच आणि
मी कितीही प्रयत्न
केला तरीही मेक-
अप करू शकणार
नाही इतका गोरा
इंग्रज नॉन-स्टिक
कढई घेण्यात मग्न
होता. त्याचं प्लान्निंग माझ्या इतकं परफेक्ट
नसल्यामुळे त्यानी एक लहान बास्केट आणलेली. आणि, आत्तापर्यंत केलेली खरेदी त्याच्या
खिशाला आणि त्याच्या हातांना परवडणारी असेलही, तरीही त्या छोट्या बास्केट ला पेलवत नव्हती,
त्यामुळे त्यानी बाजूची रिकामीच असलेली माझी ट्रोंली सोयीस्करपणे आपल्या ताब्यात घेतलेली.
पाहताक्षणी खरंतर त्या इंग्रजाच्या व्यक्तिमत्वामुळे मी दबून गेलेहोते. पण माझी ट्रोंली
घेतल्यामुळे किव्वा कदाचित आज सव्वीस जानेवारी असल्यामुळे माझा स्वाभिमान आणि देशाभिमान
अचानक जागे झाले. मी आत्तापर्यंत लिहिलेलं,
वाचलेलं सगळं इंग्लिश पणाला लाऊन आणि शाळेतल्या बापट बाईंना स्मरून त्याला म्हटलं,
" एक्स्क्युज मी!...माय ट्रोंली!". त्यांनी माझ्याकडे बघून हसून सॉरि म्हटलं
आणि माझ्या ट्रोंलीतून आपली बास्केट काढून घेतली.
मनात
आलं किती सोप्पं झालं असतं ना सगळं, अशीच तेंव्हा जर यांनी आपली गोष्ट दीडशे वर्ष न लावला परत केली असती! असो….आता त्याच्या हातात त्याची नॉन- स्टिक कढई
होती आणि मलाही तोपर्यंत माझा नॉन- स्टिक तवा सापडला होता आणि आम्ही दोघं एकमेकाकडे
बघून छान हसलोही होतो.
पण
खरंच अशी कुठचीही गोष्ट करपेपर्यन्त मनाला चिकटू नं देणारा नॉन-स्टिक तवा सापडेल का?!!
…भावना