Tuesday, 27 January 2015

सायकल


रात्रीचे साडे अकरा  वाजले होते. सगळे रस्ते सामसूम होते. काही तुरळक जाग असलीच तरी ती हि फार काळ टिकणार नव्हती. अगदी शेवटपर्यंत रेंगाळणाऱ्या गिराहीकालाहि टिकवू पाहणारे मोट्ठे मॉल सुद्धा अकरा पंचेचाळीसला पेंगायला लागणार हे निश्चित होतं. म्हणजे तशी पाटीच दाराबाहेर लावलेली होती.

आम्ही घाई घाईनि मॉल मध्ये  शिरलो.  ती तीन मजली इमारत आम्ही तीन मिनिटात पालथी घातली. नंतर गाडीतून, आम्ही रस्त्यावरची बंद झालेली दुकानं शोधू लागलो. आणि शेवटी एकदा एक दुकान सापडलं.

 दुकानदार दुकानाबाहेर मांडून ठेवलेल्या वस्तू आत आणून ठेऊन, घरी जायच्या तयारीत होता. तरीही आमच्या तिघांचा उत्साह बघून हिरीरीने तो त्याचं नशीब आजमावू लागला. तसा त्याचा फार वेळ गेला नाही कारण पुढच्या दहा मिनिटातच आम्ही, आलो त्याच वेगात निघालो. फक्त आम्हाला सगळ्यांनाच त्याक्षणी हवी असलेली एक गोष्ट घडली होती, ती म्हणजे निघताना आमच्याबरोबर गाडीत एक सायकल होती.

त्या रात्री आमच्या या उत्साहाला फार साक्षीदार नव्हते पण दुसऱ्या दिवशी दिवसभाराचि सगळी कामं उरकून, आम्ही आणि आमची नवीन सायकल, रात्री दहा वाजता त्याच उत्साहात खाली उतरलो हे मात्र  अनेकांनी पाहिलं.

दिवसभर अभ्यासाचं ओझं होतं तरीही आता सायकल शिकायला माझी मुलगी उत्सुक होती.  तिचा तोल जाऊ नये म्हणून तिच्या सायकल मागे तिचे बाबा धावत होते.  खरतर ऑफिसमुळे झालेली दगदग त्यांना आता विश्रांतीची गरज जाणवून देत होती. पण तरीही लेकीला प्रात्यक्षिक दाखवण्याच्या निमित्ताने किव्वा स्वतःची खूप दिवसांची इच्छा म्हणून त्यांनी स्वतःही चार फेऱ्या मारल्या.

त्यावेळी मी, आजूबाजूची सगळी माणसं आपापल्या घरी जाउन सामसूम कधी होईल, याची वाट बघत होते. आपल्यालाही सायकल चालवणं जमेल ना, हा विचार माझ्या मनात येत होता. त्यांनी समोर आणून ठेवलेल्या सायकलमुळे मी विचारातून जागी झाले.  दोघंही आता माझ्याकडे अपेक्षेने बघत होती. सध्या आमच्या दारात गाडी होती पण माझी सायकलही शिकायची राहून गेली होती. दोघांच्या डोळ्यातला विश्वास बघून मी सायकलवर बसून जमिनीवरचा दुसरा पाय पायडलवर ठेवला. आणि जमलं कि, तो मागे आहे हि जाणीव आणि मुलीचा उत्साह या भांडवलावर मी थोड्याच वेळात  सायकलवर पूर्ण ताबा मिळवला.  माझा तोल मी सांभाळू शकले.

ऐवढ होई पर्यंत आजही साडे अकरा वाजून गेले. आमच्या त्या  अचीव्मेंटला आणि आनंदाला आत्ता आमच्या शिवाय आणखी  कोणीच साक्षीदार नव्हता. पण आमचा आनंद मात्र आम्हाला सांगत होता, नकळत  आता खरंच आयुष्यात ब्यालान्स जमू लागला होता. आपल्या कुटुंबासाठी आपण करतो आहे ते आपलं कर्तव्य  आहे कि त्याग या विचारात भरकटलेल्या आमच्या मनावर आम्ही आता ताबा मिळवला होता. आम्हाला हवी असलेली सायकल सापडली होती.

  ...भावना