"एथे थुंकू नवे"…माझ्या रोजच्या जाण्यायेण्याच्या
रस्त्यावरच्या, कळकट्ट हा एकच रंग वर्षानुवर्ष असलेल्या एका
कोपऱ्याला, आज चांगला ऑफ-व्हाइट्ट कलर देऊन त्याच्या
गळ्यात, ही पाटी अडकवलेली होती.
दिवसभर अतरंगी मुलांच्या
शुद्धलेखनाच्या चुका सुधारून आलेल्या मला, त्या पाटीची त्याक्षणी इतकी चीड आली की
याच कोपऱ्यात त्या लिहिणाऱ्याला आयुष्यभर आंगठेधरून उभं केलं तरी कमीच, इतकाच
विचार त्या
क्षणी माझ्या मनात आला.
दुसऱ्या दिवशी सुट्टी. मी
कोपऱ्यावरच्या वाण्याकडे सामानाची यादी दिली होती. आमच्या सारख्यांना नाक्यावरची
मजा अनुभवायची असली तरी तिथे उभं रहायला कारणही सुसंस्कृत लागतं याची त्या वाण्यालाही जाणीव होती बहुदा, कारण माझ्या यादीकडे तो ढुंकूनही बघत
नव्हता आणि ते हि माझ्यावरच उपकार केल्यासारखं.
'अख्खा जन्म गेला इथे आणि आता हे कोण
आम्हाला शिकवणार कुठे थुंकायचं ते?" पाटी खालचीच भिंत रंगवत, पान
खाणारा एक आवाज बोलला.
"बरोबर आहे
तुमचं." आपला बिनविरोध पाठींबा जाहीर करत भिंतीवर आणखी एक शिक्का उमटला.
"हे म्हणजे
स्वच्छतेच्या नावाखाली व्यक्तीस्वातंत्र्य हिरावणं झालं." अशा बोजड वाक्यांना
कधीच विरोध होत नाही याची खात्री असल्याने, दुजोऱ्याची
फिकीरही न करता, त्या पाटीकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून तो आवाज
पुढे गेला आणि…
"बरोबर आहे…. व्यक्तीस्वातंत्र्य…." असं काहीसं पुटपुटत त्या
आवाजाची सावलीही नाहीशी झाली.
त्यांचं मतदान होतं न होतं तोच दोन
माणसं…….. “हल्लीच्या प्राब्लेम्स ना सोल्युशनच नाय!"
या विषयावर तावातावाने बोलत आली आणि त्यातला एक नेमधरुन पाटीवरंच थुंकला. तो
त्याचा नेहमीचा स्पॉट असावा.
इतक्यात कोणीतरी ओरडलं… "अरे पाटी
वाच"
जगाच्या प्राब्लेम्सचं ओझं डोक्यावर
असल्यामुळे पाटी वाचायची तसदीही न घेता त्यानी आधीच तयार असल्या सारखं उत्तर फेकलं,
" आता आम्हाला काय सपान पडणार होतं आज हितं पाटी लावणार त्याचं?"
त्याची गुर्मी बघून ओरडणारा 'आपलीच
चूक झाली बहुदा' याची खात्री पटल्यासारखा खाली मान घालून निघून
गेला आणि….
"सगळी शिकलीसवरली माणसं पन काय उप्येग
न्हाय" म्हणत आधीचे दोघंही 'प्रोब्लेमवर सोल्युशन नाही', हे
आपलं मत अधिकच ठाम मांडत गेले.
"हि पाटी इथे
कुणी लावली? आज नुसती पाटी लावली आहे, उद्या
हक्क सांगतील जागेवर."आणखी एक आवाज तावातावानी म्हणाला.
"अहो पण ती सुचना
आहे. हेतू चांगला आहे त्यामागचा." बरोबरचा साळसूदपणे बोलला.
"तुम्ही आत्तातरी
डोळे उघडून बघा जगाकडे. भावानी घरातून हाकलंल, शेजाऱ्यानी जमीन
हडपली, तुमच्यावर परिणाम काही होत नाही. स्वभावाला औषध नाही म्हणतात ते असं.
" आपलं म्हणणं सप्रमाण पटवता आलं या आनंदात हा, आणि असलेल्या परिस्थितीत बिनविरोध जगणारा दुसरा, दोघेही
तिथून पुढे गेले.
"अरे थुंकू नको!" आणखी एक आवाज म्हणाला.
"आधीच एवढी रंगपंचमी
झाली आहे तर मग आपणच का म्हणून सोडा?" आपल्या कृतीचं ठाम समर्थन देत दुसरा म्हणाला.
"पॉइंट
आहे." असं म्हणत आपलंही मत नोंदवून तिसरा म्हणाला.
"हे सगळं सामान.
एक साबण फ्री आहे नंतर पाठवून देईन. " हा वाणी.
तिथे उभं रहायला दिल्याचे पैसे
घेतल्याच्या थाटात तो आणि फ्री साबण आत्ताच का नाही दिला हा प्रश्न विचारावा कि
नाही या चिंतेत मी असा आमचा हिशोब मिटवला गेला.
"का रे…का थुंकला तू?" आणखी एक जोडी
"आयला भिंतीवर
नाय, आपण थुंकनाऱ्यावर थुंकलो."……. असंही समर्थन असू शकतं याचं समर्थन करत ते
दोघं आणि मी त्या कोपऱ्याचा प्रश्न तिथेच ठेऊन निघालो.
रात्री शतपावली करतअसताना माझं लक्ष
त्या कोपऱ्याकडे गेलं. आपल्या
कळकट कपड्याची जराही परवा न करता एक पंधरा-वीस वर्षांचा मुलगा, तो कोपरा रंगवत होता.
" काय रे कोण तू?
आणि
हा कोपरा का रंगवतो आहेस?" मगाशी भिंत खराब करणाऱ्याना जाब न
विचारणारा माझा आवाज आत्ता प्रश्न विचारायला पुढे. कदाचित आता उलटउत्तर होणार नाही
याची खात्रीच होती मला.
"बाप रंगारी हाय
माजा, समोरच्या गाळ्यात असतो. मी सोताचा दुसरा धंदा करतो भांडवल दे म्हणलं
तर म्हणाला आदुगर माणसं समजून घे. दिवसभर इथच होतो कि, जाता-येता सगळी
भिंत रंगवत होती, मी पाहिलं बी आन ऐकलं बी. " आपलं काम तसंच
चालूठेवत तो म्हणाला.
"काय शिकलास मग
तू?" माझ्यातला शिक्षक उगाचच जागा झाला.
"तुमी बी तिथच
होता कि!" तो मिश्किलपणे माझ्याकडे बघत हसला.
हा मुलगा माणसांची प्रतवारी ठरवण्यात
पारंगत झाला आहे
आणि त्यांनी मलाही त्यातल्या एका तुकडीत बसवलं आहे याची मला जाणीव झाली. त्याचा
बाप हा नुसताच रंगारी नसून मुरलेला शिक्षक आणि मनुष्य स्वभावातल्या सगळ्या छटा
तंतोतंत ओळखणारा आहे हे हि जाणवलं.
"चांगलं काम करतो
आहेस. मोठा होशील." मी कितीही धडपड केली तरी माझ्या तुकडीच्या बाहेरच वाक्य
काही मला सुचलं नाही.
त्या अशुद्ध लेखनाच्या मागे किती मोठा
आणि शुद्ध विचार होता म्हणायचा! एक धडा मलाहि मिळाला आणि मी मनातला एक कोपरा जुने चिवट डाग पुसून स्वच्छ करायचा
प्रयत्न सुरु केला.
...भावना