Tuesday, 20 September 2016

चायनीज दिवाळी #diwaliskit

निवेदन ....याच वर्षी बदलापूरला रहाणारे मिस्टर जोशी  चायनात नोकरी निमित्त आले... सोबत जोशी काकु... म्हणजे मिसेस जोशी हो. त्या काय तिथे घर सांभाळायच... त्या इथे आल्या.
इथे आल्या आल्या दिवाळी ... बघूयात तर कशी काय साजरी करणार आहेत ते ...चायनीज दिवाळी

काकु :- अहो हे वाचा काय लिहिलंय
" The Chinese usually do not like to do business with strangers, and will make frequent use of go-betweens....frequent use of go-between??"
म्हणजे त्यान्ना मधे- मधे.... ( करंगळी थोडीशी हलकेच आतल्या खोलीकडे दाखवत )

काका :-
"
अग अग ... बाई, गो बिटवीन म्हणजे मध्यस्थ... मध्यस असेल तर बरं वाटत त्यान्ना ...असा अर्थ आहे त्याचा"

काकु :-
"
इश आता आणखी मध्यस्थ कशाला... इथे काय कुणाची लग्न जुळवायची आहेत?...पण do not like to do business with strangers
म्हणजे हो आता? .... मी तर माझा बदलापूरचा येवला साड्या डायरेक्ट फ्रॉम येवला या बिझनेसचं लगेचंच  उद्घाटन करायचं म्हणत होतं "

काका:-
"
अग तुझ्या येवला साडी from येवलाला इथे येवलाहि ( हातानी जरास दाखवत ) sorry येवढाही प्रतिसाद मिळणार नाही. अग एका सहावारी साडीत अक्खा चीनी परिवार गुंडाळता येइल....

काकु :-
ह्म्म आणि नऊवार शोभायला तर काय अस्सा ठसठशीत बांधा हवा"

काका:-
"
पेहेलवानी"

काकु:-
"
काय म्हणालात....

काका:-
"
काहिनाही जरा ....

काकु:-
" hmmm


काका:-
"
अग उगाचच जराशी मस्करी ... बाकि इथे लागल्या लागल्या दिवाळी आली आणि त्यानिमित्ताने बॉसला घरीच  जेवायला बोलवायची तुझी कल्पना म्हणजे अगदी वाखाणण्याजोगी आहे ... आता आज इतका चायना आणि चायनीज बॉसवर म्हणजे माणसावर होमवर्क करु की मग  आपण इंप्रेशन मारायला मोकळे "

काकु:-
"
घरी बोलवणारंच आहोत तर पहिलं प्रमोशन वगैरे सगळं जरा नीट ...

काका:-
अग थांब थांब आधी मला कामावर जरा रुजु होउ दे ... आणि मुख्य म्हणजे घरी येतील का ते?

काकु:-
ते काय बोलावताही येतात

काका:-
अग

काकु:-
"
बरं हे काय लिहिलंय.... तुम्ही दोन कॉप्या का नाही हो काढल्यात याच्या...?"

काका:-
"
अग Office ला जाउन बॉस कोण कळायच्या आधी दिवाळी आली. तरि बरं पहिल्याच दिवशी office चा प्रिंटर वापरुन हि १२ पानं तरि प्रिंट केलीआणि तू आणखी वर ... "
(
बोलता बोलता काकुंच्या हातातली दोन पानं घेतात )

काकु:-
"
बरं ... Always stand up when being introduced and remain standing throughout the introductions..
काय झालं इतकं हसायला

काका :-
"They are taught not to show excessive emotion,
म्हणे .... इतक्याशा फटीतून कसली कप्पाळ इमोशन्स दिसणार ... शिकवून तरी काय फायदा.

काकु:-
तुम्हाला हे बरंच आहे म्हणा office मधे केलेल्या चुका पटकन नजरेस येणार नाहीत"
..
नाव काय म्हणालात हो तुमच्या बॉसच ..

काका:-
अग ते काय ... लिहिलंय कागदावरच
....W a n g


काकु:-
"
वांग ?! ... वांग म्हणजे नाव कि आडनाव हो .... कारण हे बघा इथे काय म्हणताहेत Never call someone by only his or her last name. हे तरी काय विचित्रच आता दुसऱ्यान्च्या नावानी यान्ना कशी हाक मारणार ....( परत काका काकुंच्या हातातला वरचा कागद घेतात )

काका:-
Unless specifically asked, do not call someone by his or her first name....


काकु:-
अरेच्चा मग बोलवायचं तरी कसं म्हणते मी"

काका:-
"
हो अगं ते सगळं बघुच आपण पण दिवाळीला जेवायला बोलावतो आहोत घरी बॉसना ... बेत काय ठरवला आहेस...तसं तू मनावर घेतलं आहे म्हणजे काळजीच नाही म्हणा ....

( थोड्या गेय लयीत )
या दिवाळीला चायनीज बॉस आपल्या घरी जेउन तृप्त मनानी जाईल बोटं चाटत ...
sorry
बोटं नाही म्हणायला हवं का
. ...
काड्या

काकु:- ( त्याच लयित यमक जुळवून)
आणि पहिल्या पगारा आधीच घरात येइल दिवाळीचा भरघोस बोनस आणि मिठाईत  मिळतील  चायनीज काजूच्या वड्या

... भावना

उंबरठ्या बाहेरची एक संध्याकाळ...

इथे घराचा उंबरठा ओलांडला कि लगेच गाडीचा प्रवास सुरु होतो. मग संपणारा लांबलचक रस्ता आणि त्याला येउन मिळणार्या रस्त्यांचं जाळं लागतं. हे विणकाम सुबक दिसावं म्हणुन  जाणीवपूर्वक उभारलेलेल्या  प्रत्येक चौकात   ( राउंड अबाउट ) असलेल्या प्रेक्षणीय कलाकृती, पुढचं प्रत्येक वळण नेत्र-सुखद करतात.

या रस्त्यांची आखणी, भव्यता एखाद्या प्रगल्भ जीवनपटाच्या कथेसारखी वाटते मलापण रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या मात्र फास्ट ॲंड फ्युरिअसच्या पुढच्या भागाचं शुटिंग चालु आहे असं वाटावं, अशा जुमानणार्या वेगात जात असतातमधुनच मग , कानठळ्या बसाव्यात इतका प्रचंड आवाज करत, सुसाट बाईकस येतातअशी बाईकही कधी एकटी नसते. त्या नेहमी ताफ्यानी येतात आणि गाड्यांच्या गर्दीतून शिताफीने मार्ग काढून, कळायच्या आधी निघुनहि जातात.

हा रस्ता मग एखादं वळण घेतो आणि रस्त्याच्या लगतंच, मिळेल त्या जागेत उभी राहिलेली, परदेशी कामगारांची वस्ती लागतेया कामगारांच्या सोयीसाठी, आणि खरं म्हणजे त्यांच्यामुळे विक्री होण्याची शक्यता असल्याने, इथे दुतर्फा बरीच लहान लहान दुकानही  दाटिवाटिनी उभी राहुन आपलं काम साधत असतात.

सुट्टीचा दिवस असल्याने आज इथे कोपऱ्या कोपऱ्यात बरेच कामगार उभे दिसतात.हे सगळे कामगार आपलं कुटुंब सोडुन या लांबच्या आखाती देशात येताना बरोबर फक्त उद्याचं स्वप्न घेउन आलेले असतात. चार चाकांवरच चालु शकणाऱ्या या महागड्या देशात या कामगारांकडे स्वत: वाहन नसतं. त्यात सार्वजनिक वहातूक व्यवस्था शून्य. त्यामुळे, विरंगुळा म्हणुन वापरायला, हा रस्त्याचा इतका तुकडा तरि  आपला असावा असं त्यान्ना वाट्ण आणि सगळे नियम धुडकावुन लावुन त्यान्नी इथे  वाटेल तसा, वाट्टेल तिथुन, रस्ता ओलांडण स्वाभाविक वाटायला लागतं

त्या वस्तीतुन आपली सुटका करुन घेउन जेव्हा आमची गाडी बाहेर पडते तेव्हा तिला आत्तापर्यंत अनेक वेळा वेग मंद करावा लागला ते असह्य झालेलं असतं. आणि मग बंड करण्यावाचुन गत्यंतर नाही म्हणून वेग मर्यादा दर्शक बिप बिप करत असतानाही ती त्याला जुमानत नाही. अशीच एखादी समदुःखी गाडी जेव्हा सिग्नल तोडते, तेव्हा खांबावर बसलेले कॅमेरे शिताफिने फोटो काढतात. इतक्या झर्- कन फोटो येतो, पावती फाडुन पैसे पगारातुन वजाहि होतात की कळतहि नाहि. ते बघुन मला आपल्याकडच्या  आधार कार्डावरचा फोटो आठवतो. उजवीकडे बघा, डावीकडे बघा, वर बघा, खाली बघा करत वेळ लाउन काढलेला फोटोही कोणाचा आहे हे ओळखता येण्या इतका असु शकतो हे नवलंच.

आजच्या सुट्टीच्या दिवशी गाडी एखाद्या बागेकडे वळणार असते. तशी इथे सुट्टीत फिरायची ठिकाणं दोनच एक म्हणजे मोठ्ठाले मॉल आणि दुसऱ्या विस्तीर्ण बागा. इतक्या उन्हाळ्यातही, वाळवंटी देशात बघाव तिथे फुललेल्या बागा. अगदी आखिव रेखिव. शिवाय  कुठचिहि वेळ असो तशाच बंद काचेत जपुन ठेवल्यासारख्या स्पर्शही झाल्यासारख्या स्वच्छ.

सुट्टीच्या दिवशी इथल्या बागेत जरा माणसं दिसतात तरी पण अजुनहि नको तितकी मोकळी जागा शिल्लक असतेच. पण शहरात मध्यवर्ती भागात  असलेल्या बागेत प्रवेश मिळणं तरिहि महाकठीण. कारण माणशी एक आणि त्या  सुद्धा अती अवाढव्य गाड्यान्नी पार्किंगची जागा अडवलेली असते. कितीहि दूरदृष्टी ठेवून शहर उभारलं तरिहि माणसाला माणसाचाच अंदाज लागण कठीण हे मला या भरलेल्या पार्किंग एरियाकडे बघितलं कि नेहमी  वाटतं.

एखादी जागा प्रसन्न होइल का हि आशा सुटत नाही तो पर्यंत इथेच  3-4 प्रदक्षिणा घालुन मग मात्र आम्ही निराश होउन घरी परतायच्या विचारात असतोपण मधेच कुठेतरी दडलेला धीर जागा होतो आणि आम्ही इतके आठवडे इथे घालवुन अजुनही  बघुन झालेली एखादी नवीन बाग असेल का हे शोधायचं ठरवतो.

चारही बाजुन्नी डोंगरान्नी वेढलेलं हे शहर. प्रशस्त समुद्रकिनारा. आमची गाडी आता दोन्ही बाजूला वाळूच्या डोंगरांची किनार असलेल्या एका रस्त्याने जाते. मधेच हा रस्ता खोलगट होतो. इथे समुद्र दिसावा म्हणुन एका बाजुचे डोंगर थोडेसे बाजुला सरल्यासारखे दिसतात. रस्त्याच्या विरूध्द बाजुला चार गाड्या आणि एक गेट इतकंच दिसतं. आम्ही घाईघाईने गाडी पार्क करुन आत जातो.

आत स्वत: रमलेलं फक्त एकच मोठ कुटुंब असतं. प्रथमदर्शनी लहान वाटणारी ती बाग आम्ही आणखी थोडं आत शिरुन, फिरुन बघतो. डोंगर रांगेत आत असल्याने  जाणवत नसली तरी बरिच मोठ्ठी बाग असते ती. आता आमच्या सगळ्या बाजुने वेढा घालुन उभे डोंगर, इथुन दिसत नसला तरि हवेतल्या आर्द्रतेत जाणवणारा समुद्र, भरपूर हिरवळ आणि गेला एक तास इतक्या तुरळक मनुष्य वस्तीतहि एकांत शोधणारे आम्ही तिघं इतकंच उरतं. मग तिथेच थोडा खेळ होतो. घामाने चिंब भिजायला होतं. पण आठवडाभर असह्य  उन्हाळ्यामुळे येणाऱ्या घामापेक्षा आत्ताचा हा घाम नक्कीच वेगळा असतो.

एक दिवशाची सुट्टी अशीच येते आणि यायच्या आधी संपते. दुसऱ्या दिवशीच्या जाणीवेने आमची पावलं अजिबात रेंगाळता परत गाडीकडे वळतात. वाटेत नेहमीच्या मॉल मधे जाऊन यंत्रवत पुढच्या आठवड्याची खरेदी केली जाते. आता इतक्या आठवड्याच्या सवयीमुळे, इतक्या मोठ्या मॉलमधेही हवी असलेली वस्तू लगेच सापडते.

परत तोच मोठ्ठा ऱस्ता संपवायचा असतो. गाडीलाहि आता वेग नको असतो पण जबाबदारीने ती उशीर टाळण्याचा प्रयत्न मात्र करत रहाते . समोर दिसत असतो तो फक्त आणखी एक कोरडा आठवडा. पण डोंगरात दडलेल्या आजच्या  या नवीन शोधलेल्या बागेतलं दव, या वाळवंटात आमच्यातला ओलावा नक्कीच वाढवुन जातं.

.... भावना