Tuesday, 20 September 2016

बंद दरवाजाच्या फटीतून...

कालची संध्या, काळ बनून आली
द्रौपदीचा अपूरा पडला धावा 
घर तिचंच, तरी फिरले वासे
देव्हाऱ्यात कृष्ण, परी वाजेना पावा

जी भिंत आधाराला उभी राहिली 
ती चार भिंतींच्या घरात, पाचवी ठरली 
नाळ झटकन तोडुन दुरावली 
त्याक्षणी नाती ना 'ती' उरली

आपल्याच घरात श्वास कोंडला
बाहेरच्या हवेवरंच रात्र सरली 
मनात उमेद जागवणारी तुळस 
अंगणात बहरली

कालच्या सावल्या रेंगाळताहेत अजुन 
तरीही कोपऱ्यात बसलेली ती हसली 
बंद दरवाजाच्या फटीतून 
जेंव्हा ऊन्हाची तिरीप तिला दिसली


... भावना