Thursday, 14 January 2016

काचेची बांगडी...


बरोबरची मुलं खेळत होती लंगडी

'ती' गेलीच नाही...

कारण, हातात काचेची बांगडी



आईनी दिलेल्या सूचनाच अती

त्यात उपमांच्या आड काचा

आणि परिणामांच्या भीतीची माती



कुणाचा तरी लागला धक्का,

चुकून की मुद्दाम?

पण बांगडी तिचीच,

तिलाच चुकवावा लागला दाम



बाकीच्यांचा रंगला मस्त चर्चेचा फड

तिला मात्र तुकड्यांचा गोलही सांधेना धड



तिच्याच बांगडीनी का रुतवली काच तिच्या हातात?

दडपण आलं तिला

असे व्रण कधी आणि कसे जातात?



आई कशीबशी पेलवत होती

स्वतःच्या बांगड्यांचा वाढणारा भार, दररोज मण-मण

गोड किणकिणाट कधीच संपला होता

आता फक्त उरलेले, घट्ट मागे सारलेल्या बांगड्यांचे व्रण



बरोबरची मुलं खेळत होती लंगडी

'ती' गेलीच नाही...

कारण, तिच्याकडे आता नव्हती काचेची बांगडी...

भावना