flashback मध्ये
एकदा
जाऊ म्हटलं मनाने
वर्तमानात अजूनही तरी
निष्ठेने होतो तनाने
भुरभुरीत वाळूत मारल्या रेषा
थंड पाण्यात बुडवले पाय
समुद्राच्या लाटा झेलू
फतकल मारल्याशिवाय पर्याय काय!
दुसऱ्यांचे गड-किल्ले
पादाक्रांत करून झाले
आणि माझी अक्षरं बुजवणाऱ्या लाटेला
झोपून देऊन मी अडवले
अजिंक्य उरलेल्या माझ्या किल्ल्यावर
मी फडकवले जिंकलेले निशाण
मान लवून सूर्यानेही
त्याची ठेवली पूर्ण जाण
त्याचा प्रणाम स्वीकारत होतो
तर मध्येच कोण हे हसलं?
रात्रभरच्या मेहनतीच्या चिंध्या करून
त्यावर माझं बाळ होतं बसलं
उगारलेल्या हाताला लगाम घालायला
धावत आलं माझं मन
आणि बाळाच्या वर्तमानाला प्रेमाने
मीही दिली एक गोड पाप्याची आठवण!
...भावना