Thursday, 6 August 2015

आठवतेय का, ही मराठी शाळा?

खूप अभिमान वाटतोय सर, मुलं आता मोठी झाली
दगडीपाटीवरची अक्षर, विदेशातही उठून दिसली

हजेरीपटाला मात्र आता, आलीय फारच अवकळा
सांगा ना सर! मुलांना आपल्या आठवतेय का, ही मराठी शाळा?

तो त्या देशात, हा ह्या देशात, सगळेच तर आता आहेत विखुरले
अखंड भारताच्या बंडासाठी, इथे कुणीच नाही हो उरले!

खेचून आणेल का हो त्यांना परत, या गाभुळलेल्या चिंचांचा लळा
सांगा ना सर! मुलांना आपल्या आठवतेय का, ही मराठी शाळा?

झगमगाटापाठी सगळे, तेवत नाहीये घरची वात
विकृती बाळसं धरू लागलीये, लपून प्रगतीच्या सोंगात

सुविचाराची अक्षर, तरीही जपतोय जुना फळा
सांगा ना सर! मुलांना आपल्या आठवतेय का, ही मराठी शाळा?

अजूनही आशा वाटतेय सर, असेच सगळे धावत येतील
या मातीला ती मऊ पावलं, पुन्हा सुखाचा स्पर्श देतील

इतक्या कठोर होत्या का हो सांगा, शिक्षेच्या त्या कळा
सांगा ना सर! मुलांना आपल्या आठवतेय का, ही मराठी शाळा?

...भावना