Monday, 3 August 2015

मैत्रीचं नातं...


या डोळ्यांतलं पाणी
जेंव्हा त्या डोळ्यांतून ओघळलं

तेंव्हाच म्हणावं
इथे मैत्रीचं नातं जुळलं...


आकाशात असंख्य ढग
इथे-तिथे जात असतात

वाऱ्याबरोबर असंख्य गोष्टी
जिथे-तिथे वहात असतात


एकत्र आल्या असतीलही
दोन क्षण असेलही कदाचित कुणी-कुणाकडे वळलं...

पण या डोळ्यांतलं पाणी
जेंव्हा त्या डोळ्यांतून ओघळलं

तेंव्हाच म्हणावं
इथे मैत्रीचं नातं जुळलं...


उरत नाही तेंव्हा अंतर
गरज नसते वाटाड्या, निरोप्याची नंतर


कावरा-बावरा होतो श्वास
दूरच्या श्वासाच गाणं

थोडं जरी लयीला ढळलं...
म्हणून या डोळ्यांतलं पाणी

जेंव्हा त्या डोळ्यांतून ओघळलं
तेंव्हाच म्हणावं

इथे मैत्रीचं नातं जुळलं...


मैलोंमैल प्रवास हा
भेटतात वाटेत कित्येक जण

थांबून बोलून त्यांच्याशीही 
सोपी होते वणवण


भली-बुरी संगत-साथ
हवीच, पण मिळावा

घट्ट मैत्रीचा हात
मनाच्या तळाशी खोलवर

कधीतरी कळेल कोणाला काय जळलं...
या डोळ्यांतलं पाणी

जेंव्हा त्या डोळ्यांतून ओघळलं
तेंव्हाच म्हणावं

इथे मैत्रीचं नातं जुळलं...
तिथेच मैत्रीचं नातं जुळलं!!!


...भावना