Saturday, 1 August 2015

थोडक्यात... १


...
सूर्यास्ताकडे प्रसन्न चेहऱ्यानी बघताना तुम्ही म्हणालात...
निसटलेले क्षण मोजत बसलेल्या ठोक्यांना, येणाऱ्या क्षणांसाठी धडधडायला सांग.

...
बदल शोधण्याच्या वृत्तीतही तोचतोपणा आहे...
असं इतकी वळणं घेऊनही त्याच दिशेला जाणारी वाट वळताना कुजबुजली.

...
हातावरच्या रेषांच्या जंजाळात नशीब लिहिणाऱ्या तुला, मी कुठच्या तोंडानी दोष देऊ...
कारण सुरेख बांधणीच्या कागदांवरच्या सरळ रेषांवरही मी कधी अ ते ज्ञ एकाच वळणानी लिहू शकलो नाही.

...
प्रत्येक वाक्यानंतर पूर्णविरामाची अपेक्षाच शुद्धचूक आहे...
तसं नाही तर मग पूर्णविरामानंतर आलेलं वाक्य,  ते कोणासाठी होतं?!!

...
खूप प्रेमानी एकच सूर आयुष्यभर जपला...
त्याला एकसूरी आयुष्य म्हणून हिणवू नका.

...भावना