Monday, 25 May 2015

एक हत्ती...


एक हत्ती आनंदाने साखळीतही जगत होता
कोनाड्यातच झुलण्याला तो वनविहार मानत होता...एक हत्ती...


मालक त्याचा प्रेमळ फार
घेई निगा, ना कामचुकार

दोस्त त्याचा मस्त होता...एक हत्ती...


प्रचंड गर्दी, अनेक प्रेक्षक
मुलं धावती, मागे शिक्षक

ऐटी मध्ये पाहत होता...एक हत्ती...


विचारवंत एकदा आला
पाहून त्याला निराश झाला

थाटात जरी राहत होता...एक हत्ती...


काय म्हणाला तुझे हे जगणे
निरर्थ आहे हत्ती असणे

अर्थ व्यर्थ मग शोधत होता...एक हत्ती...


प्रेमाचा मग झाला जाच
विटाळला गर्दीला हाच

जणू गुलामी सोसत होता...एक हत्ती...


जगण्याचे मग घेऊन कोडे
समाधान कुठे मिळेल थोडे?

उत्तर अजुनी शोधत आहे...एक हत्ती... 


...भावना

मायबोली...


माझ्या बोलीतला बोल
लाल मातीतला पाय

दुज्या बोलीतला बोल
चटके डांबरी खाय

 
माझ्या बोलीतला बोल
अंतरीचा ठोका डोले

दुज्या बोलीतला बोल
बुद्धीचीच भाषा बोले

 
माझ्या बोलीतला बोल
भावनेचा शुद्ध झरा 

दुज्या बोलीतला बोल
वाटे नेहमी अधुरा

 
माझ्या बोलीतला बोल
माय माझी गाते गाणी 

दुज्या बोलीतला बोल
निराधार अनवाणी

 
माझ्या बोलीतला बोल
हाक तो हि तीच जाणे 

दुज्या बोलीतला बोल
दुसऱ्याचे पांघरणे

...भावना

जिंकलेला पक्षी...


झुंजताना दोन पक्षी एकदा मी पाहिले
एक लोभस म्हणून दुसऱ्या लक्ष देणे राहिले

 
एक सोनेरी तुरा तो वाटले हा ना हरो
दुसऱ्याचे रंग कधीही पाहणाऱ्या ना स्मरो

 
सोयरा तो एक, सत्य त्याच बाजूला हवे
पाठ फिरवून दुसऱ्याने नेहमी जाया हवे

 
अभिमाने विजय तो मी तत्क्षणी सम्मानिला
पक्षपाता वाव न होती, भावला तो जिंकला

...भावना

अलीकडची भाषा...



म्हणता-म्हणता बदलली आहे अलीकडची भाषा
तिनी आता पुसल्या आहेत सगळ्याच सीमा रेषा
 

कर्त्याप्रमाणे क्रियापद आता वागत नाही
कर्म नक्की कोणतं याचा पत्ताच लागत नाही

चेहऱ्यावरून अर्थ लावावा, तर दोन तोंडांच्या दोन दिशा
अशीच हळू-हळू बदलली आहे अलीकडची भाषा 

 
तीन अंकांचे दोन करून सगळेच संवाद छाटले
एकपात्रीचाच पर्याय बरा असेही अनेकांना वाटले

हिंग्लिश,  मंग्लिश भेळींनी, भरलेल्या सगळ्या बशा
म्हणूनच वाटतं कळत नाही, हि अलीकडची भाषा

 
अक्षरं, शब्दं, वाक्यांपेक्षा सिम्बॉलच बरे
कुठे, कसे सापडतात? मलाही समजवा रे!

गोट्याला आमच्या असेच मेसेज, करते शेजारची निशा
म्हणूनच म्हणते शिकायला हवी, अलीकडची भाषा  

 
...भावना

तुझ्याविण...


घराच्यात्या कोनाड्यात एक दिवा मिणमिणे
त्यालाही हे नको वाटे असे तुझ्याविण जिणे

 
घराच्यात्या अंगणात एक झुला कुरकुरे
तुझ्या-माझ्या झोक्याचे ते स्वप्न कसे करू पुरे

 
घराच्यात्या छतालाही काळोखाची वाटे भीती
हितगुज झाले नाही कोण जाणे दिस किती

 
घराच्यात्या दारालाहि बघू वाटे वाटसरू
निरोप तो आणेल का कडी लागे हट्ट करू

 
घरच्यात्या परसात एक आंबा हिरमुसे
दूरवर नजरेला त्याच्याहि ना कोणी दिसे

 
घराच्या त्या खोलीतली एक शेज हरवली
दिवसाने रातीलाही दिवास्वप्ने दाखविली

 
घराच्यात्या मधोमध घट्ट उभा खांब म्हणे
थकु नका, शोधू नका आधाराला कोणी येणे

...भावना

Sunday, 24 May 2015

थोडं हरवावं लागतं...


उंच उडायचं ठरवलं, तर जमिनीवर रहावं लागतं
जसं तुला, तसंच थोडं मलाही

 
गोड बोलायचं ठरवलं, तर कडू गिळाव लागतं
जसं तुला, तसंच थोडं मलाही

 
हसत रहायचं ठरवलं, तर रडू थांबवावं लागतं
जसं तुला, तसंच थोडं मलाही

 
विसरून जायचं ठरवलं, तर थोडं आठवावं लागतं
जसं तुला, तसंच थोडं मलाही

 
पुढे जायचं ठरवलं, तर थोडं थांबावं लागतं
जसं तुला, तसंच थोडं मलाही

 
आठवणी जपायचं ठरवलं, तर थोडं हरवावं लागतं
जसं तुला, तसंच थोडं मलाही

...भावना

Saturday, 23 May 2015

चण्याच्या पुडीचा कागद...


"सोशिक स्वभावाची एक मजा असते." विकास

"मजा?"… हरीश

"नाही तर काय? काही लोकांना वाटतं, हा माणूस बावळट आहे. काही लोकं त्याला मूर्ख समजतात. काहींना तो बिच्चारा वाटतो. तर काही लोकांना वाटतं हा शेपूट घालणारा आहे. पण यातलं काहीच खरं नसतं. तो माणूस फक्त सोशिक असतो. त्याला सगळं कळत असतं, समजत असतं पण तो परिस्थिती सहन करतो. याचा अर्थ पचवतो, अक्सेप्ट करतो असंही नाही हं! फक्त सहन करतो. स्वभाव प्रत्येकाचा, वी ऑल आर जस्ट बायोलोजीकल मशिन्स!" विकास

"बायोलोजीकल मशिन्स?"… हरीश

"हो, जसं घडवलंय तसं वागतो. फक्त आपलं वायरिंग इतकं कॉम्पलीकेटेड आहे ना की आपल्या वागण्याचं परम्युटेशन कॉम्बीनेशन शोधून त्याची प्रोबाबिलीटी काढणं आणि तीही दुसऱ्यांच्या वागण्याच्या प्रोबाबिलीटी ला अनुसरून, हे अशक्य वाटतं." विकास

"कुठचं पुस्तक वाचताय सध्या?"… हरीश

"स्टीफन हॉकिन्स" विकास

"कसं जमतं रे तुला, इतक्या सगळ्या गोष्टी करायला? दिवसभर तर ऑफिस मधेच जातो. तरीही हौस म्हणून इथे आमच्या ग्रुपला जॉईन केलंस आणि आता चक्क आमचा मोस्ट वॉनटेड लेखक कम दिग्दर्शक झालास. आता तुझ्याशिवाय पानही हालत नाही इथलं." हरीश 

"चला आता, मी झाडावर नंतर चढतो, आधी आपण सगळ्यांनी जमिनीवर येउया. प्रकाश कुठे आहे? विवेक आला नाही अजून त्याला घेऊन? दोन आठवड्यावर आली आहे प्रयोगाची तारीख आणि अजून ग्रीप बसत नाही आहे. गेले चार दिवस ओरडतो आहे लास्ट सीनमध्ये फिलिंग ओता, पण उपड्या घड्यावर पाणी. दुःख कसं काळजाला चीर पाडणारं हवं. तुम्ही म्हणजे नवीन कपडे जाउन जुने घालायला दिल्यासारखे चेहरे करता." विकास

 
चोट कभी दिलपे खाई होती तो समझते
के चोट देनेवालाही मरहम था I

हम तो अभी बस चोट संभाले हुए है
के उसका दिया हर एक निशान मोहब्बते रहम था I … विकास

 
"वाह वा वाह वा!! कोणाचा?"… हरीश

"काय कोणाचा? आत्ता आला तो आतून! प्रकाश कुठे आहे?"… विकास

"पण विकास तुझ्या त्या चोट चं फिलिंग आता कसं येणार? प्रकाश तर आता प्रेमात पडलाय. पडलाय कसला उडतोय!" हरीश

(इतक्यात प्रकाशला घेऊन विवेक येतो)

"बॉस, हा बघ प्रकाश. लाटा मोजत बसला होता समुद्रावर. आणला पकडून. असा झापला आहे ना...आता येतं की नाही बघ तुझं फिलिंग!" विवेक

"चला रे, सुरुवात करू या."  विकास

(नाटकाच्या तालमीला सुरुवात होते. आज प्रकाश नाटकात पूर्ण उतरल्यासारखा परफेक्ट अभिनय करतो. )

(अजूनही नाटकातलं दुःखच जगत असल्यासारखे भकास भाव प्रकाशच्या चेहऱ्यावर असतात.)

काय सगळं ठीक ना? आयुष्यात आपल्या वाटेला आलेलं स्क्रिप्ट म्हणजे हातात आलेल्या चण्याच्या पुडीच्या कागदावर खरडलेलं मटेरीअल असतं रे. कधी कधी ते नकोसं हि असतं पण म्हणून त्यात चण्याचा काय दोष किव्वा चणेवाल्याचा? आणि त्या पुडीच्या कागदाचाही नाही. करेक्ट?”...विकास    

 
किसीने हमेभी सिर्फ एक पन्ना समझकर मोड़ दिया I

लेकिन   हमने तो उसी मुड़े हुए पन्नेकी नाव बना डाली I … विकास

 
"आत्ता सुचलं?"… हरीश


जिंदगी के गीले शिकवे तुम्हे क्या बताऊ ए मेरे दोस्त
तुमने अभी जिंदगी देखि ही कहा है I

हम तो बहुत आगे निकल चुके है सबके
बस एक रस्सी, एक नाव रखी हुई वहा है   I   विकास

 
"चला उद्या भेटू. टील देन बाय!!!" विकास

 
हातातल्या चुरगळलेल्या चण्याच्या पुडीच्या कागदावरचं, काही तासांपूर्वीपर्यंत त्याच्याअसलेल्या प्रियाने दुसऱ्याच कुणाला तरी लिहिलेलं प्रेमपत्र बघत  प्रकाश विचारात पडला...त्याचं प्रेम प्रियानी असं चुरगळलं होतं कि त्यांनीच स्वतः या एका  शुल्लक कागदावरून काही क्षणात तिच्याबद्दल इतके टोकाचे विचार केले होते?...आणि हे सो- कॉल्ड स्क्रिप्ट त्याच्या वाटेला आलं कसं?... शिवाय आपल्या खिशातल्या कागदावरच स्क्रिप्ट स्वतःच लिहिल्यासारख, हा विकास बोलला कसं?... आणि हे विचार करता-करताच नकळत प्रकाशनी त्या कागदाची होडी केली...


...भावना 

Monday, 18 May 2015

तो मूक लढा...


तो मूक लढा,
मी बघितलाच नाही 

काय होणार होतं बघून?

 

तो मूक लढा,
मी धड ऐकलाही नाही

सांगण्या-सांगण्यात तफावत असते म्हणून

 

तो मूक लढा चालूच होता
फरक पडावा हे मागणं मागत होता

फरक पडेल हे विश्वासानं सांगत होता

 

मी होतो, मी आहे, मी नुसताच असेन
पण तो लढा आज म्हणाला,

"उद्याहि मी लढतानाच दिसेन!"  


...भावना

Wednesday, 13 May 2015

आशावंत...


भविष्याची सतावे चिंता,
कधी पंख पसरले स्वप्न घाले रुंजी

विश्वासाने, आशावंत तो,
जमवत होता एक पुंजी


झेलला पाउस, झेलला वारा
दिला चढ-उतारालाही थारा

उसवलेल्या, फाटलेल्या वर्तमानाला
सांधत होता तो बिचारा 

विश्वासाने, आशावंत तो,
बांधत होता एक किनारा 

 
राहिलास का तू त्रयस्थ, कोरडा?
का दिलास तुझ्यावरच्याच विश्वासाला तडा?

फुल नको होते का तुला?
का, हवा होता अश्रुंचा सडा!

तरी करुणा तुझीच मागतो आहे 
विश्वासाने, तो आशावंत वेडा!

विश्वासाने, तो आशावंत वेडा!!

...भावना

Monday, 11 May 2015

कोलाज...



"आई आपल्याकडे भूकंप येणार आहे?"...मिनू

 "कधी?"

 "उद्या किव्वा परवा"...मिनू

"कोणी सांगितलं तुला?"
 "म्हणजे तुला माहित नाही? शाळेत मी सोडून सगळ्यांना माहित आहे."...मिनू

 "अगं, पण तुला कोणी सांगितलं?"

"वर्गात सगळे म्हणत होते आणि बसमध्ये लक्ष्मी सुद्धा म्हणाली. तू आधी नेटवर बघ"...मिनू

 आम्ही नोकरीनिमित्त या देशात येउन आता चार वर्ष होतील. मिनू इथे चांगलीच रुळली आहे. आमच्यापेक्षा इथे तिच्याच मैत्रिणी आणि मित्र जास्त आहेत.

 आज सकाळी नेटवर पेपर बघायचा राहून गेला म्हणून मी लगेच कॉम्पुटर सुरु केला.  काल नेपाळमध्ये झालेला भूकंप तर भयानक होताच पण त्या आधी चार दिवस आमच्या इथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले.

"काय झालं? येणार आहे का भूकंप?"...मिनू

 "नाही ग बाई. पेपरात आलं आहे, ती अफवा आहे. आज फेसबुक वगैरे सगळीकडे आपल्या इथे भूकंप येणार अशी बातमी आहे पण ती खोटी आहे. भूकंप कधी येणार ते आधी कळत नाही. पण तुला इतकं काय झालं? भीती वाटली का?"  

 "हो, म्हणजे मी भूकंप बघितला नाही ना कधी. आणि मोठा येणार असं सांगितलं लक्ष्मीनी सात-आठ रिश्टरपेक्षा जास्त. मग इथे सुनामी सुद्धा आली असती ना! आपण समुद्राच्या जवळ रहातो. मी तिला म्हटलं भूकंप प्रेडीक्ट करता येत नाही."...मिनू

"तुला हे माहित होतं? आणि भूकंपामुळे काही होत नाही. बिल्डींग पडली तर, त्यामुळे लागतं आपल्याला. आणि आपल्याकडे फार मोठ्या बिल्डींग्स नाहीतच मुळी. शिवाय मी आहे ना. माझ्या इतक्या वजनाचा उपयोग होईलच कि, बिल्डींग त्या साईडला पडायला लागली तर मी या साईडला उभी राहीन"...मी उगाचच वातावरण हलकं करायचा प्रयत्न केला. पण त्याची काहीच गरज नव्हती कारण काहीच न झाल्यासारखं, मिनू आधीच जेवणाचं ताट घेऊन टीव्ही समोर जाउन बसली होती. 

मनात विचार आला, मुलांना या अशा आपत्तीचं खरं भयानक स्वरूप इतक्या लवकर जाणवू द्यायची गरज नाही पण थोडं तरी सामाजिक भान हवं. नेपाळमध्ये लोकांची आता कशी अवस्था असेल या विषयी मिनूशी नंतर बोलायचं ठरवून मी माझ्या कामाला लागले.  

"काय ग आज काही नोटीस आहे का? काही प्रोजेक्ट किव्वा प्रिंट्स हव्या आहेत का?" ...मिनू शाळेतून आल्यावर तिला विचारायचे काही प्रश्न मी अगदी ठरवूनच ठेवल्यासारखे आहेत.  रोज नेटवर काहीतरी शोधा, प्रिंट्स आणा हे चालूच असतं. आणि ते वेळेत पूर्ण व्हावं यासाठी आपल्याला लक्ष घालावंच लागतं.   

"हो, प्रेसिडन्ट आणि वाइस प्रेसिडन्ट, एक एक पासपोर्ट साइज फोटो हवा आहे. वाइस प्रेसिडन्ट आहेत आपल्याला? नाव काय त्यांचं? काय काम करतात ते? आणि हो भूकंपाचे फोटो हवे आहेत."...मिनू

"आई, कोलाज म्हणजे काय?"...मिनू

"कोलाज म्हणजे अनेक छोटी चित्र चिकटवून बनवलेली एक छान कलाकृती"...मिनूच्या मते आई हे सगळ्यात फास्ट आणि सर्वज्ञ सर्च इंजिन आहे. आमच्या या रोजच्या प्रश्नोत्तराच्या संवादांमुळे हल्ली माझाही स्पीड आणि आत्मविश्वास वाढला आहे.

"भूकंपाचे फोटो? कशाला?"

"जी के साठी हवे आहेत. टीचर नी सांगितलं आहे. बुकमध्ये कोलाज करायचं आहे."...मिनू


"कसलं? भूकंपाच्या फोटोचं? कोलाज??"...

एखाद्या घटनेचा प्रत्येकावर काय परिणाम व्हावा, त्यांनी स्वतः ती घटना कशी स्विकारावी आणि दुसऱ्याला कशी सांगावी याची उदाहरणं मला वाटतं, व्यक्ती तितक्या प्रकृती, अशीच असतील.
 

भूकंपाच्या फोटोचं कोलाज!?!! माझ्या मनात आश्चर्य, राग, असहाय्यता अशा अनेक भावनांचं कोलाज झालं. पण शेवटी मी शांतपणे भूकंपाचे चांगले?’  फोटो प्रिंट करायला घेतले.
...भावना