Monday, 11 May 2015

कोलाज...



"आई आपल्याकडे भूकंप येणार आहे?"...मिनू

 "कधी?"

 "उद्या किव्वा परवा"...मिनू

"कोणी सांगितलं तुला?"
 "म्हणजे तुला माहित नाही? शाळेत मी सोडून सगळ्यांना माहित आहे."...मिनू

 "अगं, पण तुला कोणी सांगितलं?"

"वर्गात सगळे म्हणत होते आणि बसमध्ये लक्ष्मी सुद्धा म्हणाली. तू आधी नेटवर बघ"...मिनू

 आम्ही नोकरीनिमित्त या देशात येउन आता चार वर्ष होतील. मिनू इथे चांगलीच रुळली आहे. आमच्यापेक्षा इथे तिच्याच मैत्रिणी आणि मित्र जास्त आहेत.

 आज सकाळी नेटवर पेपर बघायचा राहून गेला म्हणून मी लगेच कॉम्पुटर सुरु केला.  काल नेपाळमध्ये झालेला भूकंप तर भयानक होताच पण त्या आधी चार दिवस आमच्या इथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले.

"काय झालं? येणार आहे का भूकंप?"...मिनू

 "नाही ग बाई. पेपरात आलं आहे, ती अफवा आहे. आज फेसबुक वगैरे सगळीकडे आपल्या इथे भूकंप येणार अशी बातमी आहे पण ती खोटी आहे. भूकंप कधी येणार ते आधी कळत नाही. पण तुला इतकं काय झालं? भीती वाटली का?"  

 "हो, म्हणजे मी भूकंप बघितला नाही ना कधी. आणि मोठा येणार असं सांगितलं लक्ष्मीनी सात-आठ रिश्टरपेक्षा जास्त. मग इथे सुनामी सुद्धा आली असती ना! आपण समुद्राच्या जवळ रहातो. मी तिला म्हटलं भूकंप प्रेडीक्ट करता येत नाही."...मिनू

"तुला हे माहित होतं? आणि भूकंपामुळे काही होत नाही. बिल्डींग पडली तर, त्यामुळे लागतं आपल्याला. आणि आपल्याकडे फार मोठ्या बिल्डींग्स नाहीतच मुळी. शिवाय मी आहे ना. माझ्या इतक्या वजनाचा उपयोग होईलच कि, बिल्डींग त्या साईडला पडायला लागली तर मी या साईडला उभी राहीन"...मी उगाचच वातावरण हलकं करायचा प्रयत्न केला. पण त्याची काहीच गरज नव्हती कारण काहीच न झाल्यासारखं, मिनू आधीच जेवणाचं ताट घेऊन टीव्ही समोर जाउन बसली होती. 

मनात विचार आला, मुलांना या अशा आपत्तीचं खरं भयानक स्वरूप इतक्या लवकर जाणवू द्यायची गरज नाही पण थोडं तरी सामाजिक भान हवं. नेपाळमध्ये लोकांची आता कशी अवस्था असेल या विषयी मिनूशी नंतर बोलायचं ठरवून मी माझ्या कामाला लागले.  

"काय ग आज काही नोटीस आहे का? काही प्रोजेक्ट किव्वा प्रिंट्स हव्या आहेत का?" ...मिनू शाळेतून आल्यावर तिला विचारायचे काही प्रश्न मी अगदी ठरवूनच ठेवल्यासारखे आहेत.  रोज नेटवर काहीतरी शोधा, प्रिंट्स आणा हे चालूच असतं. आणि ते वेळेत पूर्ण व्हावं यासाठी आपल्याला लक्ष घालावंच लागतं.   

"हो, प्रेसिडन्ट आणि वाइस प्रेसिडन्ट, एक एक पासपोर्ट साइज फोटो हवा आहे. वाइस प्रेसिडन्ट आहेत आपल्याला? नाव काय त्यांचं? काय काम करतात ते? आणि हो भूकंपाचे फोटो हवे आहेत."...मिनू

"आई, कोलाज म्हणजे काय?"...मिनू

"कोलाज म्हणजे अनेक छोटी चित्र चिकटवून बनवलेली एक छान कलाकृती"...मिनूच्या मते आई हे सगळ्यात फास्ट आणि सर्वज्ञ सर्च इंजिन आहे. आमच्या या रोजच्या प्रश्नोत्तराच्या संवादांमुळे हल्ली माझाही स्पीड आणि आत्मविश्वास वाढला आहे.

"भूकंपाचे फोटो? कशाला?"

"जी के साठी हवे आहेत. टीचर नी सांगितलं आहे. बुकमध्ये कोलाज करायचं आहे."...मिनू


"कसलं? भूकंपाच्या फोटोचं? कोलाज??"...

एखाद्या घटनेचा प्रत्येकावर काय परिणाम व्हावा, त्यांनी स्वतः ती घटना कशी स्विकारावी आणि दुसऱ्याला कशी सांगावी याची उदाहरणं मला वाटतं, व्यक्ती तितक्या प्रकृती, अशीच असतील.
 

भूकंपाच्या फोटोचं कोलाज!?!! माझ्या मनात आश्चर्य, राग, असहाय्यता अशा अनेक भावनांचं कोलाज झालं. पण शेवटी मी शांतपणे भूकंपाचे चांगले?’  फोटो प्रिंट करायला घेतले.
...भावना