Monday, 25 May 2015

अलीकडची भाषा...



म्हणता-म्हणता बदलली आहे अलीकडची भाषा
तिनी आता पुसल्या आहेत सगळ्याच सीमा रेषा
 

कर्त्याप्रमाणे क्रियापद आता वागत नाही
कर्म नक्की कोणतं याचा पत्ताच लागत नाही

चेहऱ्यावरून अर्थ लावावा, तर दोन तोंडांच्या दोन दिशा
अशीच हळू-हळू बदलली आहे अलीकडची भाषा 

 
तीन अंकांचे दोन करून सगळेच संवाद छाटले
एकपात्रीचाच पर्याय बरा असेही अनेकांना वाटले

हिंग्लिश,  मंग्लिश भेळींनी, भरलेल्या सगळ्या बशा
म्हणूनच वाटतं कळत नाही, हि अलीकडची भाषा

 
अक्षरं, शब्दं, वाक्यांपेक्षा सिम्बॉलच बरे
कुठे, कसे सापडतात? मलाही समजवा रे!

गोट्याला आमच्या असेच मेसेज, करते शेजारची निशा
म्हणूनच म्हणते शिकायला हवी, अलीकडची भाषा  

 
...भावना