Saturday, 28 February 2015

चला आता परत एकदा घेऊ पत्ते पिसून...


काय उपयोग खेळ उधळून, नशिबावर रुसून
चला आता परत एकदा घेऊ, पत्ते पिसून



पत्त्यांच्या नशिबीहि दोनच रंग
हुकुमाचा कोणालाच लागत नाही थांग

खेळ कसा रंगेल, सगळेच पत्ते दिसून?
चला आता परत एकदा घेऊ, पत्ते पिसून

 
राजा अन राणीलाच तिथे हि वाव
उरलेल्या सगळ्यांना ना चेहेरा, ना नाव

पाय हि नको त्यांना, हवं हातात, आयतं बसून
चला आता परत एकदा घेऊ, पत्ते पिसून

 
मांडलेल्या डावात जिंकायची युक्ती
जोकरच येतो मदतीला घेऊन क्लुप्ती

त्रुटींवर करा मात, विनोदान हसून
चला आता परत एकदा घेऊ पत्ते पिसून

...भावना

देवा कोणाच्याहि घराला खिडकीच नको...


वाट बघायचं दुःख नशिबातूनच चुको
देवा कोणाच्याहि घराला खिडकीच नको

 
दारं हवी तर ठेव जास्त
मोकळी हवा खेळेल मस्त

उंबरठ्यावरची पावलं एकाच दिशेला झुको
देवा कोणाच्याहि घराला खिडकीच नको

 
दे छप्पर मोठ्ठ त्यात 
सगळेच पुरतील आरामात

चणचण आणि वणवण यांनी ना कोणी थको
देवा कोणाच्याहि घराला खिडकीच नको

 
भिंतींचा असुदे मजबूत आधार
टिकवून ठेव त्यांचा कायम निर्धार

तुळस मात्र घरची कधीच ना सुको
देवा कोणाच्याहि घराला खिडकीच नको

...भावना

तुला आठवे ना!!!


तुला आठवे ना, जुनी गोष्ट सारी
तुझे शब्द आता मला पारखे

नसे पूर्वीचा, तो सुसंवाद आता
तुझ्या लेखणी, रात्र-दिन सारखे

तुला आठवे ना...

 
तुझे विश्व आता, स्वतःच्याच भोवती
ना जाणले, मागणे हे मुके

निराधार वाटे, न दिसे किनारा
तुझे हात, नुसतेच रे कोरडे

तुला आठवे ना...

 
असे एकटे, भार वाटे जिवाचा
जसे असुनी, ना कुणाला दिसे

परिचित आता, न उरले जराही
तुझ्या लोचनी जे मला सापडे

तुला आठवे ना...

 
तमातून आता पुढे जात आहे
नसे कौमुदी, चंद्र हि वावडे

तुला आठवे ना, जुनी गोष्ट सारी
तुझे शब्द आता मला पारखे

तुला आठवे ना...

...भावना 

Friday, 27 February 2015

प्रेम गुपित दोघांचे...


प्रेम गुपित दोघांचे, बंध रेशमाचे
का होते? का जडते? कधी मोहरते?


किरणांनी साद दिली फुलल्या रम्य सकाळी 
प्रेमाच्या देशाची गुज गोष्ट ती निराळी

बावरते, सावरते, येते, कधी हे जादू करते?
कधी स्वप्नांच्या हिंदोळ्यावर भान हरपुनी झुलते 

प्रेम विहंग होऊन आकाशात विहरते
कधी क्षणात फिरुनी फुला मागे लपते


श्वासांच्या तालाची जुळते तिथेच भेट
रुसव्यांचा फुगव्यांचा असतो एक समेट

ओलांडून त्या कडे कपारी एकच वाट दिसते  
अन दोघांचे असणे विरुनी एकच नाते उरते

प्रेम अस्तित्वाच्या प्रश्नालाही भिडते
कसे एकटेच ते व्यर्थ-जगाशी लढते

...भावना

मन हे माझेच कि आभास हा...


रोज नव्याने भेटते
मन हे माझेच कि आभास हा



कधी याला सुचे गोड गाणे
कधी एकटेच ते विहरणे

विचारात स्वतःला हरवणे 
मन हे माझेच कि आभास हा


वाट याला रोजची नको असे
कधी जुने बंध हुडकत बसे

अर्थ त्याचे त्याला जे हवे तसे 
मन हे माझेच कि आभास हा


याच्या कोषाची मला भीती
छोटासा शहारा हादारा अती

अशी याला सांभाळू तरी किती 
मन हे माझेच कि आभास हा

...भावना

माझी जखम...


वादळी पाऊस, नभ दाटलं
ढासळलं अवसान, आभाळ फाटलं

 
वाऱ्याने विस्कटले सुंदर चित्र
अवेळी दिसेना झाला मित्र

 
भरकटल्या दिशेला वीज वळली   
माझी जखम त्याच्या मनाला कळली    

...भावना

अंगणाच्या घरी...


मनानी घेतली सहज भरारी
गावाच्या वाटेकडे, अंगणाच्या घरी

 
दारात तुळस दिसली सकाळी
भोवतीन सडा, शेजारी रांगोळी

गोठ्यात वासर गाय ती गोंजारी
गावाच्या वाटेकडे, अंगणाच्या घरी

 
आंब्याला मोहर, जसवन्दि कळी
टपोर मोगर, नाजूक पाकळी

प्रेमाने विहीर डोकावे किनारी
गावाच्या वाटेकडे, अंगणाच्या घरी

 
कुंपणी बाभुळ, परसात केळी
हसली बघून खिडकी या वेळी

झोपाळा बोलावे कुरकुर करी
गावाच्या वाटेकडे, अंगणाच्या घरी


...भावना

Thursday, 26 February 2015

ऋण वजाच ठरले...


आकाशी जलदांच्या, अगणित झाल्या फेऱ्या
नीराचे भार किती, किती फुका चाकऱ्या I

दुर्दैवी त्या श्रमांचे, मोजदाद ना झाले
जीवन गणित हिशेबी, ऋण वजाच ठरले II       

 
वृक्षाच्या छायेला, जात-पात ना कळली
भुकेला घास दिला, अंती लाकडे जळली I

निस्सीम त्या मैत्रीला, वर्मी घाव मिळाले
जीवन गणित हिशेबी, ऋण वजाच ठरले II

 
शौर्याने तळहाती, धरिले सुखाने शीर
निकराने शत्रुचा अन स्वार्थाचा प्रतिकार I

हौतात्म्य प्राणांचे पणती विनाच विझले
जीवन गणित हिशेबी, ऋण वजाच ठरले II

 
वृद्धत्व पूर्णत्व, शेवटचाच ध्यास
अनुभवी हाताने, केले असंख्य प्रवास I

नशिबी त्या सुरकुत्यांच्या अव्हेरणेंच आले 
जीवन गणित हिशेबी, ऋण वजाच ठरले II

...भावना

The Red fairy


One day my mood was very sad

As the whole day went so bad

At last I threw myself in the bed

Which had flowers pink and red

 

Suddenly my soft toy moved in the dark

Also it sounded like small-dog’s bark

I brought that poor puppy home in the morning

My Mom didn’t allow and gave me warning

 

Red fairy smiled and saved the puppy, as she knew to care

My father also knew, but in front of Mom he didn’t dare

 

Next morning I woke up with smile, to tell “My Little Puppy’s Dream”

Father looked at Mom, as she gave me extra cream

 

Puzzled When I saw, the same  puppy in a small bed

My Fathers eye’s twinkled and Mother smiled like the fairy red

…Bhavana

इथेच थांब

 
 

रंग लहरी गगनाला या, पाहून डोले वन बेभान
वारा हि त्या सोबत करतो, नक्षीदार घेऊन तान.
 
छटांच्या त्या वेडातच मग, मिसळू पाहे नित्तळ पाणी
त्याला हि ती सुचू लागली, ताला मधली तरंग गाणी.
 
सांधू पाही दोन तटांना, शिवधनुष्य पेले पूल एकटा...
पाहून त्या ते व्रत आचरता, आठवे मज कुणी धाकटा.
 
लोभस विभ्रम विलोभानांचे, कर्तृत्वाचे निरखून खांब
छोटीशी एक वाट सांगे, उबदार घर हे इथेच थांब!!

भावना

आठवणी जगण्याची 'सोय'


रणांगणात उतरलेल्या आवेशातल उन
साधं बाहेर डोकावूही देत नाही.

AC ची facility आहे...पण त्यामुळे
वाऱ्याला मोकळं बोलताही येत नाही.

24 hours water supply .... म्हणून इथे ...
भांड्णाचाही आवाज नाही.

FM ला हल्ली गुणगुणणाऱ्या मनाशी
tunning साधणं जमत नाही.

लिफ्ट मधून उतरून कारमध्ये चढण्याखेरीज
दोन पायांकडे काम नाही.

100 and 120 च्या स्पीडला
दृष्टी कुठे रेन्गाळूही शकत नाही.

Dish TV वर पाऊस कोसळतोय...पण
इथली माती काही भिजत नाही.

branded बाटलीतल्या famous अत्तारालाही
पहिल्या सरींनी शिंपडलेल्या सुगंधाची सर नाही.

हे इतके 'नाही' तरीही एक 'होय' आहे..
अजूनही त्या आठवणी जगण्याची माझ्याकडे 'सोय' आहे.

…भावना




Wednesday, 25 February 2015

बाबांच्याही मनात एक नाजूक कोपरा


रागीट डोळे, जाड मिशा
घट्ट हात, खरखरीत भाषा

नुसताच पेहेराव, तो नसतो खरा
बाबांच्याही मनात एक नाजूक कोपरा


इवलंस बाळ कसं मी धरू?
मान त्याची आता कशी सावरू?

भीतीनी त्यांनाच भरतो कापरा
बाबांच्याही मनात एक नाजूक कोपरा


अफाट जग नसतं सुरेल
पोर माझी त्यात कशी तरेल?

माझीच सावली तिच्यावर धरा
बाबांच्याही मनात एक नाजूक कोपरा


सासरी जाण्याचा एक क्षण
त्यासाठी त्यांचीच वणवण

पण निरोपाची वेळ तुम्हीच सावरा
कारण बाबांच्याही मनात एक नाजूक कोपरा

...भावना

घरच्या फुलाला..


प्रेमळ माती, निर्मळ पाणी
मोकळे अंगण फुलून ये

घरच्या फुलाला ऊनाची झळ वेळेच्या आधी लागू नये

 
उनाड वारा, घिसाड पाऊस
डोकावे कधी शोधून संधी

पुरे अळ्याची लक्ष्मणरेषा, कुंपण काटेरी होऊ नये
घरच्या फुलाला...

 
कोमल कळी, वळणी पाकळी
वेगळेपण शोभते हे

देवाच्या घराचे, थोराच्या मानाचे
भाग्य तयाला लाभते हे

विनयाचा त्याच्या अव्हेर, कधी अशक्त मानून करू नये
घरच्या फुलाला ऊनाची झळ वेळेच्या आधी लागू नये


...भावना

डायरी त ली शायरी ...... ३


* दूर उस टिले की तरफ देखू तो सोचू,
  के तू खेलता था वहा, आएगा अभी, बड़ी देर रुकी I


  बूढी आँखे ही शायद उस टिले की जगह ठीक से याद रख न सकी II

 

* कागज़ के टुकड़ों ने जो मेरे दिलकी दास्ताँ सुनी,
  दर्द की स्याही में वो भी डूब गए I

 
  तुमने तो पलट के भी न देखा,
  उसे रौंदकर तेरे पैर भी क्या खूब गए II

 


* काम के बोज से थका हुआ मन ये सोचे के,
  कब उसे आराम मिले I

 
  बैठे हे मगर कई ऐसे और,
  सोचके, के कभी तो उन्हें काम मिले II

...भावना

Tuesday, 24 February 2015

तुझी नि माझी बट्टी...


मुलीत मुलगा वेगळा काढू 
बाबांना आपण एकटं पाडू

जमवू दोघी गट्टी, तुझी नि माझी बट्टी

 

गुपित माझं तुझ्याच कानात 
तुलाच कळलं, काय माझ्या मनात

बाकी सगळ्यांना सुट्टी, तुझी नि माझी बट्टी

 

तुझंच म्हणणं बरोबर धरू
बाबांवर आपण सरशी करू

बाबा फारच हट्टी, तुझी नि माझी बट्टी

 

बाबांना काही समजत नाही
मीच खरी परी ना ग आई?

म्हणाले ते मला छोट्टी, तुझी नि माझी बट्टी

 

बाबा बसलेत हताश होऊन
वेळ घालवतात पेपरात पाहून

त्यांची सोडूया का कट्टी?... तुझी नि माझी तर बट्टी 
...भावना

कवितेत मी मला पहाते....


छायाचित्रे नको तसबिरी,
हवा कवितेचा संग

तिने बनविले मला सक्षम,
बनले मी अव्यंग

 
तसबिरितले चित्र माझे,
दाखवते मज वर्ष

कवितेत मी मला पहाते
होतो फक्त हर्ष

...भावना

त्याची कविता...


हे चराचर उजळी मित्र
नभ हे बरसती धारा

वृक्ष उभा वर धरून छाया
अव्याहत वाहे वारा

 
ओळींतून या चमकून जातो, रोज निराळा अर्थ
तो कविता ही मांडून बसला, समजण्यास मी असमर्थ

...भावना

Monday, 23 February 2015

एकटाच चालतो मी...


एकटेपणाचं ओझं घेऊन, गर्दीत चालतो
एकटाच चालतो मी, नुसताच वाहतो

 
हात नाही मदती साठी
नाही बोल प्रेमापोटी

कडांमध्ये डोळ्यांच्या, ओलावा शोधतो
एकटाच चालतो...

 
रस्ते हे नुसतेच धावती, घेऊन गर्दी सगळी
आज-उद्याच्या व्यवहारांची, यादी त्यांच्या भाळी

दिशाहिन  वाटेला त्या ध्येय मानतो
एकटाच चालतो...

 
शाप या गर्दीला आहे, एकटेपणाचा
माणूसपण नाही उरला, धर्म माणसाचा

मीच माझ्या अस्तित्वाला कबरीत गाडतो
एकटाच चालतो मी, नुसताच वाहतो

...भावना