Tuesday, 17 February 2015

ज्याचा- त्याचा रोल...


नवरा घासतोय भांडी आणि बायको आरामात
सांगा ना हे चित्र असतं का कुठच्या घरात ?

 
समोर असलेला रुमाल, टाय कधीच दिसत नाही 
उशीर झाला म्हणून फक्त आरडा-ओरडा आणि घाई

 
सकाळी लवकर उठावं पण ऐकेल तरी कोण?
एकाच साच्यातले बाप -लेक, ठोकळे आहेत दोन

 
दोन मिनिटं याला आणि दोन मिनिटं त्याला
दोन तास जातात माझे दोघांना उठवायला

 
दहा वेळा केला गरम, चहा परत गार
डोकं थंड  ठेवायचं वर, कसं जमणार?


सगळा राग निघतो मग बिचाऱ्या कणकेवर  
कारण नुसतीच ओर्डर येते, लवकर डबा भर


संध्याकाळीहि कशातच काहीच बदल नसतो
हातात फक्त laptop किव्वा मोबाइल असतो


घरात पाउल, पण दारातच हे विसरतात  शिस्त
सगळा पसारा आवरायची नेहमी माझ्यावरच भिस्त


कामाचा पाढा समोर जाउन मलाच म्हणावा लागतो
तेव्हाच, तेही कधीतरी हात मदतीला येतो

 
शेवटी ठरवते सगळं सोडून आता निघून जाऊ
तेव्हाच बरोब्बर ऐकू येतं… आज नाटक पाहू  

 
नाटकात हि लेखकाला असेच विनोद सुचतात
नवरा घासतोय भांडी आणि प्रेक्षक हसतात


मीही त्याच प्रेक्षकात,  विचार मनात येतो
ज्याचा रोल त्यालाच खरा  नेहमी शोभतो

...भावना