Wednesday, 25 February 2015

बाबांच्याही मनात एक नाजूक कोपरा


रागीट डोळे, जाड मिशा
घट्ट हात, खरखरीत भाषा

नुसताच पेहेराव, तो नसतो खरा
बाबांच्याही मनात एक नाजूक कोपरा


इवलंस बाळ कसं मी धरू?
मान त्याची आता कशी सावरू?

भीतीनी त्यांनाच भरतो कापरा
बाबांच्याही मनात एक नाजूक कोपरा


अफाट जग नसतं सुरेल
पोर माझी त्यात कशी तरेल?

माझीच सावली तिच्यावर धरा
बाबांच्याही मनात एक नाजूक कोपरा


सासरी जाण्याचा एक क्षण
त्यासाठी त्यांचीच वणवण

पण निरोपाची वेळ तुम्हीच सावरा
कारण बाबांच्याही मनात एक नाजूक कोपरा

...भावना