आज
खूप दिवसांनी एक
सकाळ, माझ्यासाठी झाली
आहे. सकाळीच चक्क रवीनी
बनवलेल्या चहाचा कप माझ्या
हातात आहे आणि
त्या चहाची चव
समजाऊन घेण्याइतका वेळ माझ्याजवळ
आहे.
हे
विचार मनात आले
आणि वाटलं...इतक्या छोट्याश्या गोष्टीचा विचार आज मी का करते आहे?
मी अशी कधीच नव्हते.
का, मी कशी आहे हेच मला कधी समजलं नाही?
शक्यच
नाही, कारण मी
माझं ध्येय, माझं
करिअर, माझी स्वप्न,
माझ्या आवडी निवडी
आणि त्यासाठी माझा
असलेला फोकस्ड विचार सगळं
एकदम विचारपूर्वक ठरवलेलं
होतं.
एका
वाक्यात खूपच 'मी' होता
का? हो, कदाचित हे वाक्यच नाही सगळे विचार आणि माझा सगळा भूतकाळ या 'मी' भोवतीच होता.
'मी' हे सर्वनाम असलं तरी त्यात सर्वांसाठी असं काहीच नाही, बरोबर ना? ते एकटच भक्कम आणि समर्थ वाटतं. स्वतःसाठी जगणारं.
अर्थात त्यात गैर असं काहीच नाही. प्रत्येक माणूस आधी स्वतःचाच विचार करत असेल ना!
मला
आठवते ती शाळेत
जाणारी मी आणि...
'अमृता,
उठ लवकर उशीर
होईल.''ब्रश केलंस का नीट?'
'दप्तर भरलस?'
'मी
पेन्सील शार्प करून ठेवली
आहे bag मध्ये.' ...असा माझा
सगळा दिनक्रम सांभाळणारी माझी
आई.
माझी
आई ग्रज्युएट आहे,
फर्स्ट क्लास. पण त्याची
जाणीव मला, मी
पोस्ट ग्रज्युएशन केलं
तरी झाली नाही.
म्हणजे तिनीच कधी होऊ
दिली नाही. तिचं
विश्व म्हणजे मी,
बाबा आणि आमचं
घर इतकंच.
मला
अजूनही आश्चर्य वाटतं, ती
तिच्या एवढ्याशा जगात कशी
काय रमायची? तसं
बाबा तिला त्यांच्या
ऑफीसच्या बऱ्याच गोष्टी सांगायचे.
तिचं त्यावरचं मत
सुद्धा अगदी सुसंबद्ध
असायचं. पण तरी,
तिचं सगळं लक्ष
आपलं 'आज दोनच
पोळ्या का घेतल्यात?',
'डोकं फार दुखतंय
का?' या गोष्टींकडे.
तसं
म्हणायला गेलो तर
आम्ही दोघंही अनेक
बारीक सारीक गोष्टीं
साठी तिच्यावर अवलंबून
होतो. पण 'आमचं
तिच्यावर अवलंबून असणं' हि
तिची गरज होती
कि आमची?
असो,
मी तेव्हा त्याचा
फारसा विचार केला
नाही. आई चं
आयुष्य हे फार
विचारात घेण्यासारखंच वाटलं
नाही, असं म्हणायलाही
हरकत नाही.
बाबा
इंजिनिअर. त्यांच्या कामात व्यस्त.
पण त्यांची गाडी,
त्यांची ब्रीफकेस सगळं बघून
मी कधीच ठरवलेलं,
मी बाबांसारखी होणार.
मग
अमृता म्हणजे अभ्यास,
हे समीकरणच झालं.
शिवाय माझ्या प्रयत्नांनी
आणि नशिबानी मला
नेहेमी पुढे जायलाच
प्रोत्साहन दिलं. आणि मग
माझी गाडी माझं
घर हे आपोआपच
घडत गेलं.
त्यात
आणखी भर म्हणजे
माझ्या आयुष्यात रवी आला.
आमचं लव्ह marriage. पण
ते हि दोघांची
करिअर च्या बाबतीतली
मतं जुळली म्हणून
जमलेलं.
पुढे
काही वर्ष मी
गोव्याला, एका भल्या
मोठ्या कंपनीत, मोठ्या हुद्द्यावर.
आणि रवी लंडन मध्ये,
त्याच्या कामात व्यस्त. अर्थात
हे सगळं आमच्या
दोघांच्या सम्मतिनॆच घडत गेलं.
मग मी माझ्या सुट्टीत
त्याला भेटायला आणि तो त्याच्या
सुट्टीत
माझ्या बरोबर, असा आमचा
संसार, कोणीच न करता,
चालू राहिला.
काय
वाईट होतं? काहीच
नाही. आम्हाला हव
तेच घडत होतं.
पण
आमची चाळीशी उलटली
आणि मग वाटलं,
आपल्याला एक तरी
मुल हवं…
झालं…
हा विचार आला
आणि मग वेगळ्याच
जगाची जाणीव झाली, वेगळीच चिंता
सुरु झाली. आपलं
मुल, कसं असेल,
कसं दिसेल इत्यादी
इत्यादी.
पण
पुढे खूप प्रयत्न
करूनही मुल झालं
नाही. औषधं, टेस्ट्स,
डॉक्टर्स आणि पदरी निराशा.
म्हणजे उगाचच त्या एका
गोष्टीमुळे आत्तापर्यंत चं सगळं
चुकल्यासारख वाटायला लागलं.
पैसा
हा प्रश्न नव्हता.
त्यामुळे शेवटी आम्ही सरोगसीचा
पर्याय निवडला. आणि आम्हाला
जुळी मुलं झाली,
आर्वी आणि अर्णव.
या
सगळ्या वेळात मी, फक्त
‘माझं मुलं’ या
विषया भोवतीच फिरत
होते. त्याच्या जन्मानंतर एकत्र
रहायचं असा निर्णय
आम्ही घेतला. आज
मी, रवी आर्वी
आणि अर्णव हेच
आमचं जग झालं
आहे. आता आम्ही लंडन
ला सेटल झालो
आहोत. मी जॉब सोडून
आले असले तरी
आता तरी जॉब
शोधणं हि माझी
प्रायोरिटी नाही.
गेल्याच
आठवड्यात माझे आई
बाबा आमच्या मदतीला
इथे आले आहेत.
आणि सध्या मी,
रवी आणि माझे
बाबा सगळेच माझ्या
आईच्या देखरेखीखाली बेबी केअर
चे धडे गिरवतोय.
किती
गम्मत आहे ना,
आयुष्यात प्रत्येक माणूस कसल्या
ना कसल्या तरी
प्रश्नाचं उत्तर शोधायला धडपडत असतो.
पण कुठचं उत्तर
त्याला कधी आणि
का बरोबर वाटलं,
हे तोच काय
कोणीही सांगू शकणार नाही.
प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आणि
त्यासाठी त्यानी निवडलेल्या उत्तराचा
पर्याय वेगळा....त्याचा स्वतःचा!
...भावना