Thursday, 26 February 2015

ऋण वजाच ठरले...


आकाशी जलदांच्या, अगणित झाल्या फेऱ्या
नीराचे भार किती, किती फुका चाकऱ्या I

दुर्दैवी त्या श्रमांचे, मोजदाद ना झाले
जीवन गणित हिशेबी, ऋण वजाच ठरले II       

 
वृक्षाच्या छायेला, जात-पात ना कळली
भुकेला घास दिला, अंती लाकडे जळली I

निस्सीम त्या मैत्रीला, वर्मी घाव मिळाले
जीवन गणित हिशेबी, ऋण वजाच ठरले II

 
शौर्याने तळहाती, धरिले सुखाने शीर
निकराने शत्रुचा अन स्वार्थाचा प्रतिकार I

हौतात्म्य प्राणांचे पणती विनाच विझले
जीवन गणित हिशेबी, ऋण वजाच ठरले II

 
वृद्धत्व पूर्णत्व, शेवटचाच ध्यास
अनुभवी हाताने, केले असंख्य प्रवास I

नशिबी त्या सुरकुत्यांच्या अव्हेरणेंच आले 
जीवन गणित हिशेबी, ऋण वजाच ठरले II

...भावना