Thursday, 19 February 2015

पासिंग द पार्सल…


" तू पासिंग पार्सल खेळला आहेस का कधी?"........
" का???"...............

..........गेले दोन तास तो समोर बसून मला जे काय सांगत होता त्यामुळे माझ्या मनात अनेक विचार येऊन गेले. एक तर हा खरा आहे का? याचा हेतू खरा आहे का? आणि सगळ्यात कहर म्हणजे मी आत्ता जागा आहे कि झोपेत?.........

...दुपारी अकराची गोष्ट. आज शनिवार म्हणून,  दिवस मी मस्त माझ्या पद्धतीनी सुरु केला होता. आणि हा जर आला नसता तर आजचा दिवस असाच माझा झाला असता. पण......

....तर मी काय सांगत होतो, शनिवारचा दिवस आणि दुपारी अकराची वेळ. मी माझ्या बाल्कनीतल्या बागेतल्या झाडांना वेळ देत होतो. माझा आवडता छंद. शिवाय बग्राउन्ड ला जुन्या हिंदी गाण्यांची सीडी वाजत होती. आता अक्खी दुपार फक्त माझी होती आणि दारावरची बेल वाजली

"मी आत येऊ शकतो का?"...समोरचा
"कोण हवं आहे आपल्याला?"

"तुम्हीच....देशपांडे"....तो

...आपल्या दारावर आपण आपल्या नावाची पाटी लावतो हे चूक कि बरोबर याचा मी विचार करायला लागलो. कारण समोरच्या सदगृहस्थाला मी अजिबात ओळखत नव्हतो. आणि तरीही तो, (बहुदा दारावरची पाटी वाचून), मला माझंच नाव सांगत होता...

"काय काम आहे आपलं? कळू शकेल का मला?"... त्यानी दार ढकलून आत यायचा प्रयत्न केला तर आपण काय काय करू शकतो याचा विचार मी एकीकडे करायला सुरुवात केलेली.

"घाबरू नका. मी दार ढकलून आत येणार नाही."...आता खरतर माझी घाबरायची पाळी होती. याला माझ्या मनातले विचार कसे कळले?

"wifi ऑन आहे ना!... जाऊ दे. स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे विश्वास ठेवा माझ्यावर, इतकंच म्हणू शकेन"

...का कोणास ठाऊक, त्याच्यावर खरंच विश्वास ठेवावा असं वाटलं आणि मी त्याला आत घेतलं...

"आपलं नाव?"...मी पाण्याचा ग्यास पुढे करत विचारलं.

"WhatsApp "...आता मला पाण्याची गरज होती.

"नाही, समजलो नाही मी. काय काम आहे जरा सांगाल का?"

"मी WhatsApp ...तुमचा पटकन विश्वास बसणार नाही. पण मी खरं बोलतोय. तुमच्याकडे माझं मन मोकळं करावं म्हणून आलो. "

माझा गोंधळ आणखीनच वाढायला लागलेला बघून त्यानी सविस्तरच सांगायला सुरुवात केली. 

" कदाचित तुम्हाला नसेल, पण मला कल्पना आहे, या पृथ्वीवर तुम्ही एकटेच असे आहात ज्याच्याकडे आज मोबाइल फक्त फोन करण्यापुरता वापरला जातो. तुमच्याकडे चौवीस तास नेट नाही, अनलिमिटेड डेटा डाउनलोड फासिलीटी नाही आणि WhatsApp नाही. तुमच्या मोबाईलवर नाही, पीसी वर नाही, अगदी लांबून सुद्धा तुमचा WhatsApp शी संबंध नाही.”

“हं!”

“मी तुम्हाला तू म्हटलं तर चालेल का? ...माझ्या उत्तराची वाट बघता त्यानी पुढे सुरुवात केली.

" तुला सांगू? खूप मस्त वाटायचं मला. माझं नेटवर्क इतकं मोठ्ठ आहे. इतकी माणसं आहेत ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे. ज्यांचं एकमेकावर प्रेम आहे. ज्यांचा प्रत्येक क्षण, फक्त दुसऱ्याला काहीतरी छान देण्यात जातो. अगदी मग ते दोन शब्दातलं गुड मॉर्निंग असेल, नाहीतर एखादा मोठ्ठा लेख असेल, ते आपल्या मित्र मैत्रिणीची आठवण काढतात आणि त्यांना पाठवतात"

"मग!!!?"

"मला हि वाटलं, त्यांना आपल्या तर्फे दोन ओळीत का होईना, Thanks  म्हणूया. मला त्यांच्या माझ्यावरच्या आणि आपापसातल्या प्रेमाबद्दल काय वाटतं ते त्यांना सांगुया."

"हं!!!?"

"मी एक छान मेसेज पाठवला रे. प्रत्येक वेगवेगळ्या भाषेत लिहून, ती भाषा येणाऱ्या एकेका माणसाला."

"वा!!!?"

" तू पासिंग पार्सल खेळला आहेस का कधी?"........

" का???".

" मला मेसेज पाठवे पर्यंत अंदाजच नव्हता, माझा शेवटच्या भाषेतला मेसेज, त्या एका माणसाला पाठवून होण्याआधीच, सगळ्या भाषेतले सगळे मेसेजेस प्रत्येकाच्या अकौंट ला आलेले होते"

" चांगलं आहे कि मग!! पासिंग पार्सल चा याच्याशी काय संबंध??"

"कळलं नाही तुला. मला खूप पर्सनली सांगायचं होतं सगळ्यांना. म्हणून मी प्रत्येकाला मेसेज पाठवणार होतो"

"पण तुझाच वेळ वाचला ना?"

"त्या माणसाचं नाव सुद्धा होतं त्या मेसेजमध्ये."

"ओह!!!!! म्हणजे आपल्यासाठी असलेला मेसेज त्यानी दुसऱ्याला फोरवर्ड केला?! आणि इतकंच नाही दुसऱ्यानी तो तिसऱ्याला पाठवून आत्ता तो सगळ्यांकडे आहे!!?"

"हो, शिवाय आपली भाषा कुठली, दुसऱ्याची कुठली, कसलाही विचार करता आता सगळ्या भाषेतले मेसेजेस सगळ्यांकडे आहेत."

"चल, काही तरीच काय, मला पटत नाही. कोणीच कसा वाचला नाही मेसेज?"

"अरे, मी मेसेज च्या सुरुवातीला एक छान स्माईली, जो मला आणि सगळ्यांना आवडतो, तो टाकलेला आणि बाजूला एक छान फुलाचं चित्र. त्यावरून तो एखादा छान मेसेज आहे हे कोणालाही कळू शकत होतं. तेवढंच बघून तो मेसेज, एकानी दुसऱ्याला पाठवला. ते पासिंग पार्सल मध्ये कसं, झटकन आपल्या कडच पार्सल दुसऱ्याकडे फेकतात, तसं. झटकूनच टाकतात म्हण ना. आणखी एक विनोद म्हणजे प्रत्येकानी पाठवणाऱ्याला एक एक स्माईली पाठवला आहे."

" हल्ली वेळ नसतो रे कोणाकडे." ....मी उगाचच त्याची समजूत घालायला म्हणालो. आत्ता पर्यंत त्याच्या बद्दल मला खात्री नाही, पण हळहळ नक्कीच वाटायला लागलेली.

"इतकी छोटी गोष्ट नाही आहे हि. तुम्ही इतका वेळ या गोष्टी घालावता. नक्की कशासाठी? एकाला तरी कळलं आहे का? तूच उरला आहेस आज. कदाचित तू तरी आधी याचं उत्तर शोधशील आणि मगच असं बाकीच्यांन सारखं सतत बिझी होशील, उगाचच."

"बाबा, मला नेहा चिडवत होती."...माझी दहा वर्षांची मुलगी कम्प्लेन्ड घेऊन आली.

"काय झालं सोनू?"

"तिनी मला विचारलं, तुझा WhatsApp चा नंबर काय? मी तिला विचारलं, त्याला नंबर असतो? तर मला काहीच माहित नाही म्हणून चिडवायला लागली."

"ओक्के, सांगेन हा मी तुला ते काय असतं ते"...तिला समजाऊन मी वळलो. पण तो गायब झालेला. तिथेच माझ्यासाठी कागदावर एक स्माईली काढलेला होता.

"मला हवा, मला हवा"..... मी दिलेला कागद घेऊन माझी मुलगी आनंदात पळाली.

"अहो, हा मोबाइल बिघडला आहे का? बघा ना जरा. WhatsApp  वर चे सगळे स्माईली गायब झाले आहेत. शी!! आत्ता कसं कळवू मैत्रिणीला, मला तिचा मेसेज आवडला ते?"…… तितक्यात बायको किचन मधून येताना म्हणाली.

"अग मग, ‘छान आहे’, असं लिहून कळव कि!"

" जाऊ दे, तुम्हाला यातल काहीच कळत नाही"...बायको वैतागून निघून गेली.

माझ्या मनात विचार आला, कदाचित आत्ता या जगात मी एकटाच हसू शकत असेन, कारण माझ्याकडे माझा स्माईली आहे. आणि माझी मुलगीहि कायम हसू शकेल, कारण तिला मी स्माईली दिला आहे. भेट म्हणून, नुसतंच पासिंग द पार्सल नाही!

...भावना