Tuesday, 10 February 2015

नाईक साहेब...


आज आठवड्याचा शेवटचा दिवस होता. साहेब काल कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. आणि  काम आटपून ते आज सकाळी निघाले तरी त्यांना ऑफिस मध्ये यायला हमखास बारा वाजणार हे गणित मनात मांडत, साडेसात चं ऑफिस असलं तरीहि थोडंसं रेंगाळतच विनय ऑफिस ला निघाला. 

तेरा वर्षांच्या एक्स्पिरिअन्स च्या जोरावर अकाउनट्स मनेजर च्या पोस्ट पर्यंत पोहोचलेला विनय म्हणजे पस्तिशीत पूर्णतः सेटल्ड लाइफ़ जगणारा आणि आपल्या रिटायरमेंट नंतरचे प्लान्स आत्ताच करू लागलेला तरुण. 

गेलं वर्षभर मात्र त्याच्या ह्या सुखवस्तू विचारांना तडे जायला लागले होते. नवीन नोकरीत रुळायला त्याला तसा काहीच त्रास नव्हता. शिवाय या वेंचरमुळे झालेली पगारवाढ आणि व्हीझीटिंग कार्डवरचं मनेजर हे पद, हे काय कमी होतं? पण सहा महिन्यात कन्फर्म होऊनही तो सतत धास्तावलेला असायचा. आणि याला कारण म्हणजे नवीन ऑफिस मधले नाईक साहेब.

तासभर स्वतः ड्राइव्ह करून, आठच्या मिटिंग ला सात पंचेचाळीस लाचं पोहोचणाऱ्या, साठी उलटून गेलेल्या, नाईक साहेबांकडे बघितलं कि विनय देशमुख ला खरतर भारावल्या सारखं वाटायचं. त्यांचं व्यक्तिमत्वच तसं होतं. ऑफिस ला रोज वेळेआधी हजर. आवाज तर असा कि ते बोलायला लागले कि आजूबाजूचे सगळे फोन बंद. कारण त्यांच्या आवाजात फोनवर बोलणाऱ्याला पलीकडून बोलणाऱ्या माणसाचा आवाज ऐकू येणंच शक्यं नाही. बरं त्यांना केबिन आहे पण तीही नावाला. एकतर केबिन चं दार सतत उघडं आणि इतकी वर्ष झाली तरीहि  त्यांची चेअर कोरीच्या कोरी. कारण हे एका जागेवर बसतंच नाहीत. ऑफिस मध्ये इंटरकॉम ची सोय आहे. पण एकतर हे स्वतः दोनही मजल्यांवरच्या कुठच्याही केबिन मध्ये येउन धडकणार किव्वा  टेबलावरची बेल जोरजोरात वाजवून  कदम ला तडक त्या सगळ्यांच्या मागे, त्यांना बोलवायला पाठवणार.  
इथे जग वाऱ्यापेक्षा जोरात धावतंय आणि नाईक साहेबांचा मात्र कुठच्याही यंत्रावर विश्वास नाही. मग तो फोन असो किव्वा कॉम्पुटर. सगळं काय ते समोरासमोर सोडवायचं. एका दिवसात ऑफिस अकौंटवर येणारी दोन तीनशे इमेल्स सुद्धा, त्यांची सेक्रेटरी रीना प्रिंट काढून त्यांच्या टेबलावर ठेवते. कधी कधी तर मेल चा प्रिंट मारला कि नाही हे लक्षात राहिल्याने त्या मेल च्या दोन तीन कॉपीज हि घेतल्या जातात.   नंतर ती मेल्स नाईक साहेबांच्या टेबलवर जाणार, ते हि साहेबांनी मुद्दाम बनवून घेतलेला स्टाफ च्या नावांचा रबर स्टाम्प मारून. मग नाईक साहेब कंटाळता प्रत्येक कागदावर कुणाला ते मेल द्यायचं ते मार्क करणार. विनय नवीन असल्याने त्याचं नाव या स्टाम्प वर नाही त्यामुळे साहेब प्रत्येक वेळी त्याचं नाव लिहून त्याला मार्क करणार.

हा सगळा प्रकार झाल्यावर शेवटी कदम तो पेपरांचा गठ्ठा घेऊन दिवसभर एकाच्या टेबलवरून दुसऱ्याच्या टेबलवर इन आणि आउट ट्रे चा ताळमेळ manage करत असतो.

हा कदम  हि कौतुक करण्यासारखा होता. म्हणजे ऑफिसच्या साफसफाई पासून स्टेशनरी आणण्या पर्यंत सगळी कामं. त्यात कुणाला स्पेशल टी, कुणाला लेमन असे प्रत्येकाचे चोचले पुरवणं. पेपरलेस ऑफिसकडे जग चाललं असतानाही, इथे इतक्या इमेल्स चे प्रिंट आउट ज्याच्या त्याच्या हातात नेउन देणं. आणि वर दिवसभर चुकचुकणारी ती नाईक साहेबांची बेल हि कसरत तो अगदी लीलया करत असतो.

असं आजूबाजूला सगळं हव्या त्या तालासुरात चाललं असलं तरीहि एखादा जरी कणसूर लागला कि झालं, नाईक साहेब आपल्या पहाडी आवाजात समोरच्यावर अक्षरशः तुटून पडतात. मग तो समोरचा सप्लायर असो, कस्टमर असो कि आणखी कोणी. बरं साहेब रजा टाकून बाहेर गावी जरी गेले तरी ऑफिस मध्ये त्यांचा रोज फोन आणि मग फोन वरून हजेरी सुरूच.

अर्थात हि सगळी आजूबाजूची परिस्थिती असली तरी विनय अजून तसा डायरेक्ट तोफेच्या तोंडी आला नव्हता. मागे एकदाच त्याने साहेब कामात असतील असा विचार करून त्यांना फोन न करता एक इम्पोरटन्ट मेसेज sms करून कळवला होता. झालं, मग काही वेळानी साहेबांचं बोलावणं. तरीही, घाबरत घाबरत का होईना विनय नि तोंड उघडायचा प्रयत्न केला आणि सांगून बघितलं कि sms पाठवला होता. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. sms वगेरे बघायची साहेबांना सवयच कुठे होती. आणि त्यामुळे त्यादिवशी, वेळेवर हवीती माहिती मिळाली नाही, याचा राग मग काय विचारता!    

ह्या विक्षिप्त साहेबांचा आपण इतका विचार का करावा? आपलं हि काही मत आहे कि नाही? असा विचार करून विनय आता  साहेबांच्याही रिटायरमेंट चे प्लान्स आखू लागला.

खूप दिवसांनी काल अक्खा एक दिवस सगळं ऑफिस शांत होतं. कामं होत होती पण रेंगाळत. ती आपली म्हणून कोणीच अंगावर घेत नव्हतं. तो निवांत दिवस अजूनही संपला नव्हता  कारण दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली तरीही विनय आणखी अर्धा दिवस तरी कसा छान जाइल याचा विचार करत होता. 

शेवटी आपल्याच नादात साडेसात चे सातचाळीस कधी झाले हे त्याच्या घड्याळाला हि  कळलं नाही आणि व्हायचं तेच झालं....  

   "मस्टर कुठे आहे?"... विनय

"केबिन मध्ये"...कदम
 
"काय, साहेब आले?" ...विनय
" हो, काल काम लवकर आटपल म्हणून रात्रीच निघाले पुण्याहून,  वर सकाळी सात पंचवीस लाच ऑफिस ला हजार."...कदम  हसत म्हणाला.
विनय नि आत डोकावत चाचरत विचारलं ," मे आय काम इन सर?"
उशीर झाल्याने दहावीचा पेपर बुडतो कि काय! ..या भीतीपेक्षा जास्त भीती आता त्याला वाटत होती.
"येस, कम इन." साहेब इमेल्स च्या गाठ्यात बुडाले होते पण तरीही विनयच्या नावाभोवती लेट मार्क चं लाल सर्कल काढायचं विसरले नव्हते.
"सॉरी साहेब जरा उशीर....."
"मिस्टर विनय, तुम्ही उद्या विथ family  आमच्या घरी येऊ शकाल? सत्यनारायणाची पूजा आहे."
विनय ला पेपर देताच पास झाल्यासारखा वाटलं. बेल च्या चूकचूकण्यानी तो भानावर आला.
"हो, येऊ ना!"
"कदम, रीना ला बोलाव."
"येस सर".. रीना
"तो आमच्या घराचा पत्ता जरा प्रिंट करून दे."
"येस सर"
मग लगेच कदम प्रिंट घेऊन आला. त्यात नकाशा सकट घराचा पत्ता इतका व्यवस्थित होता कि डोळे बंद करून सुद्धा कोणीही अगदी बरोब्बर पोहोचलं असतं. पण तरीही साहेबांनी लाल पेननी नकाशावरचं आपलं घर आणखी ठळक केलं.
"मगाशी तुमच्या केबिनशी  आलेलो, आमंत्रण द्यायला. पण तुम्ही नव्हता."
" ... हो, आज थोडा....."
"उद्या संध्याकाळी सहा ला या. तुमच्या मिसेस आणि मुलीला सुद्धा घेऊन या. काय नाव तिचं?"
"राधिका"
दुसऱ्या दिवशी दोन तीन तास देवापुढे एकाच जागी शांतपणे बसून साग्रसंगीत पूजा करणारे आणि गुरुजींनी सांगितलेलं ऐकणारे साहेब बघून विनय च्या मनात आलं, हे ते नाईक साहेब नाहीतच! 
पूजा झाली. सवाष्ण म्हणून नाईक माडम नी विनय देशमुखांच्या सौ ची कुंकू लाऊन ओटी भरली. वाकून नमस्कार केला. विनय च्या हातात कापड आणि नारळ देऊन साहेबांनी जेव्हा हात जोडले तेव्हा पाटावर बसलेला विनय ताडकन उठून उभा राहिला.
"साहेब!??!"
"आज तुमचा मान, देशमुख. प्रत्येक आसनाचं एक एक कर्तव्य आणि मान असतो. त्या आसनावर बसणाऱ्यानी ते कर्तव्य आपल्यापरीनी करत रहायचं आणि त्या आसनाचा मान ठेवायचा. आणि दुसऱ्यानी त्याची भूमिका समजून घेऊन ते कर्तव्य करायला मदत करायची. काय?"
"काय ….राधिका बाळ... मोठी होऊन बाबां सारखी हुशार होणार ना!"
भावना