Saturday, 21 February 2015

गण्याचे वेगळे प्रश्न...


मी म्हटलं गण्याला, चल अभ्यासाला बसू
गण्या म्हणतो बाई, त्याचंच तर येतया हसू!

 
गण्या, आधी सुधारू चल, आपण तुझं मराठी
म्हणाला बाई त्यांना तर हवी, माझ्याच सनदर्भ सपष्टी करणाची काठी

 
गण्या दिल्लीच्या इतिहासातली, पाठ झाली का सगळी सनं?
बा लाच मारलन त्यांनी तरी कळना, का त्यांच्यावर इतकी पानं?

 
गण्या तुला का रे वाटते, भूगोलाची भीती?
झोपडं अन गावही गावंना, यात शोधलं किती!

 
नागरिक शास्त्राचं पुस्तक छोटं, आहेत पानं कमी
बाई कळना अधिकार इतके, तर घरी भांडी का रिकामी?

 
गणितातले पाढे तुला, पाठ नाहीत दहा पुढे
हातावरच्या पोटासाठी, भरपूर आहेत कि मग तेवढे!

 
हिंदी आपली राष्ट्रभाषा, तिचा तुला अभिमान हवा
बाई मग विंग्रजी पेक्षा हिंदीला, गुण तरी जास्त ठेवा!

 
विज्ञानाच्या ज्ञानावरंच सगळे, प्रगती करतो आपण
एखादं औषिध द्या कि मग, माणूस तरी होईल माझा बा पण!

 
गण्याचे सगळे प्रश्नच वेगळे, निरुत्तर करतात मला
निरागस मनाने दिली मात्रं त्याला, माझ्यापेक्षा चांगली चित्रकला 

...भावना