Thursday, 12 February 2015

कोण मार्क्स देणार आहे?...

तू  मला  याचं  गाईड कधी घेणार आहेस?
सांग ना, या परीक्षेला नक्की कोण मार्क्स देणार आहे?

आजी गेली पास होऊन
आजोबांचा झालाय अर्धा पेपर लिहून
दादा म्हणतो सगळ्यांचीच वेळ येणार आहे.
सांग ना, या परीक्षेला नक्की कोण मार्क्स देणार आहे?
 
याची उत्तरं असतील का सोप्पी?
मी तुमचीच थोडी करू का कॉपी?
घाबरू नको तुमचाच पहिला नंबर येणार आहे.
सांग ना, या परीक्षेला नक्की कोण मार्क्स देणार आहे?

रोज तुमची असते धावपळ
कधी वाटते माझीही अडगळ
या पेपरचं इतकं टेन्शन मलाही येणार आहे?  
 या परीक्षेला नक्की कोण मार्क्स देणार आहे?
 
भय्या घालतो दुधात पाणी
काकूंचं भांडण तर मामींची रडगाणी
मग यांना तयारीला वेळ कधी मिळणार आहे?
या परीक्षेला नक्की कोण मार्क्स देणार आहे?
 
गुपचूप मी लक्षात ठेवतोय सगळं
प्रत्येकाकडे प्रश्नाचं उत्तर वेगळं
माझ्या रिझल्ट नंतरंच सिक्रेट तुला सांगणार आहे.
सांग ना, या परीक्षेला नक्की कोण मार्क्स देणार आहे?
...भावना