मोठ मोठ्या इमारती
आणि मोठ्ठाले टावर
कोण घालेल त्यांच्या,
महत्वाकांक्षेला आवर
स्क्वेअर फीट च्या
मोहाला, तुम्ही भुलू नका
बालपणीचं तुमचं घर,
तुम्हीच पाडू नका
खेळला असाल त्या अंगणात,
डब्बा ऐसपैस
लिंबू- टिंबू कुणी
म्हणालं असेल...बघत बैस
लगोरी आणि खांब-खांबचा,
मिळेल कसा मोका
म्हणून तरी ते तुमचं
घर, तुम्हीच पाडू नका
सात वाजता त्याच खिडकीतून
आईची येईल हाक
पाढे गाळून म्हटलेत
तर अजूनही आजीचा धाक
बाबांनी फक्त लाडच
केले, जरी तुम्ही केल्या चुका
त्या आठवणींसाठी तरी,
घर पाडू नका
मजल्या मजल्या त भांडणं
झाली, तुमची या चाळीत
तरी दीडशे घरं एकत्र,
एकाच आळीत
एकमेकांच्या नावाची,
होळीला बोंब कशी ठोकाल?
वाटतंय कां ते घर तुम्ही,
सहज पाडू शकाल?
भूतकाळ तुमचाच, नव्हतं
नुसतंच एक घर
दुसऱ्यांनाही वाटू
दे, तुमच्या भावनांचा आदर
आठवणींचा खजिना, असा
लुटू देऊ नका
बालपणीचं तुमचं घर,
तुम्हीच पाडू नका
परत फिरून येणार नाही,
तो निघून गेला काळ
तुम्हीच आता करा, त्या
स्मृतींचा सांभाळ
प्रत्येक विटेला तिची
जागा, तुम्हीच देऊ शकाल
बालपणीचं तुमचं घर,
नव्याने तुम्हीच बांधू शकाल ...भावना