Sunday, 22 February 2015

माझा शेवटचा प्रवास...

वेदनेच्या जागी दिसला मला, जेंव्हा त्या डोळ्यात निश्वास
सुखावह कसा होईल आता, माझा शेवटचा प्रवास?

गुंतलेल्या मनानं दिलं, मलाच दूषण
शेवटची धग नाकारत होती, आता उरलेले क्षण

माझ्याचसाठी होता का मग, माझा जगण्याचा हव्यास?
सुखावह कसा होईल आता, माझा शेवटचा प्रवास?

याच हातांनी, होते बाळलेणे सजले
याच कुशीत, ते डोळे निःशंक निजले

इवले पाउल पुढे पडले, हीच धरून कास
सुखावह कसा होईल आता, माझा शेवटचा प्रवास?

माझेही जगणे, नव्हते निस्वार्थ
त्या प्रगतीत, मिळाला माझ्याच जगण्याला अर्थ

पण मायाही होती, होते वात्सल्य, ते झिडकारण्याचा जणू अट्टाहास
सुखावह कसा होईल आता, माझा शेवटचा प्रवास?

उद्या घेऊन येईल इथे, परत छोटी पावलं
त्या ओढिनी, मन पुन्हा गहिवरलं
होईल सुखावह आता, माझा शेवटचा प्रवास

फक्त आहे, इथेच परतीची आस.

...भावना